पुणे आकाशवाणी केंद्राच्या सभागृहामध्ये नुकतेच शासकीय अधिकारी व इतर मान्यवरांना ‘सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात‘ पर्यावरण संवर्धन पुरस्कार’ प्रदान करून हरित मित्र परिवार आणि गुरुकृपा संस्थेच्या वतीने गौरवण्यात आले.
या पुरस्कारांद्वारे पर्यावरणासाठी आपापल्या क्षेत्रांमध्ये योगदान देणारे शासनाच्या विविध विभागांमधील अधिकारी, तसेच समाजाच्या वेगवेगळ्या घटकांमधील अनेक निवडक मंडळींचा सन्मान करण्यात आला.
पुरस्कार प्राप्त व्यक्ती पुढील प्रमाणे आहेत :
१) श्री. सुनील फुलारी, (IG )इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस, कोल्हापूर परिक्षेत्र.
२) श्री. एम्. श्रीनिवास राव ( IFS) , व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपूर.
३) दंडकारण्य अभियान (जयहिंद लोकचळवळ, संगमनेर संचलित).
४) श्री. बाळासाहेब दशरथ उंबरकर, कार्यक्रम समन्वयक, दंडकारण्य अभियान, संगमनेर.
५) प्रा. बाबासाहेब बाजीराव खरात सर, संगमनेर महाविद्यालय, संगमनेर.
६) प्रा. डॉ. तुकाराम शिंदे, ए. आर . बुर्ला महिला महाविद्यालय, सोलापूर.
७) प्रा. डॉ.दयानंद गोगले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर.
८) श्री. मनोज बन्सीलालजी टावरी, चेअरमन, रेनबो ग्रीनर्स, नागपूर.
९) पातोंडा परिसर विकास संस्था, पातोंडा, जळगाव.
१०) श्री.अनंत घरत, संपादक- पाक्षिक पर्यावरण निर्णय, पुणे.
११) सौ. गौरी नरेंद्र लागू, आकाशवाणी, पुणे केंद्र.
१२) श्री. अशोक काळभोर, पिंपरी-चिंचवड, पुणे.
१३) श्रीकृष्ण मंडळ ट्रस्ट, खंडुजीबाबा चौक, डेक्कन जिमखाना, कर्वे रोड कॉर्नर, पुणे.
१४) श्री. विकास म्हस्के, प्राणीमित्र व पर्यावरण संवर्धक, लोणी, ता. राहाता, जि. अहमदनगर.
या कार्यक्रमात उत्कृष्ट निवेदन आणि वक्तृत्व या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा विचार मांडणाऱ्या कु. सिद्धिका ज्ञानेश्वर घुमरे या रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, सोमठाणे, ता. सिन्नर , जि. नाशिक येथील सजग विद्यार्थिनीला विशेष पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनात पारंपारिक पद्धतीप्रमाणे दीपप्रज्वलन न करता, एका रोपाच्या कुंडीला मान्यवरांच्या हस्ते पाणी घालण्यात आले.
सौ. मंजुषा नरवाडकर यांनी ‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे’ गाऊन वातावरणात प्रसन्नता आणली. तर श्री. संजय मरळ यांनी ‘हिरवा निसर्ग हा भोवतीने’ हे गीत गाऊन श्रोत्यांना निसर्गाच्या सन्निध नेले.
स्वागताध्यक्ष श्री. इंद्रजित बागल, कार्यक्रम प्रमुख, दूरदर्शन एवं आकाशवाणी यांनी सर्वांचे स्वागत केले. आपल्या भाषणात ते म्हणाले “पर्यावरणाच्या उपक्रमांना लगेच फळ येत नाही. त्यासाठी सातत्याने दीर्घकाळ परिश्रम करणे गरजेचे असते.
हरित मित्र परिवाराचे अध्यक्ष डॉ. महेंद्र घागरे यांनी गेल्या चाळीस वर्षांत केवळ निसर्ग आणि पर्यावरण हितासाठी केलेली वाटचाल सर्वांसमोर मांडली. ” आम्हांला कोणाकडून काही घ्यायचं नाही. पण पर्यावरण संवर्धनासाठी, वृक्ष लागवडीसाठी जे कोणी पुढे येतील; त्यांना दोन्ही हातांनी मदत करण्याची आणि मोफत बियाणे तसेच मार्गदर्शन देण्याची आमची तयारी आहे.” असे प्रतिपादन केले.
गुरुकृपा संस्थेचे पुणे कार्यवाह श्री. प्रशांत थोरात यांनी १९९४ पासून गेली तीसेक वर्षे गुरुकृपा संस्था राबवित असलेले धार्मिक व सामाजिक उपक्रम यांची माहिती दिली. तसेच सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात यांनी अगदी उतारवयात हाती घेतलेल्या दंडकारण्य प्रकल्पातून उजाड माळरानावर सांघिक कार्याच्या माध्यमातून प्रचंड संख्येने फुलवलेल्या वृक्षराजीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
प्रा. बाबासाहेब खरात यांनी सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात यांच्या जीवनकार्याचा पट उलगडला; आणि त्यांच्या नावाने पर्यावरण संवर्धन पुरस्कार दिला जाणं किती संयुक्तिक आहे, हे दाखवून दिलं. तसेच त्यांनी निसर्गाशी जवळीक साधणारे एक स्वरचित गीत गाऊन आपला संदेश प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचवला.
प्रा. डॉ. तुकाराम शिंदे, प्रा. डॉ. दयानंद गोगले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
मुख्य अतिथी श्री. अधीर गडपाले, उपमहानिदेशक व केंद्रप्रमुख (दूरदर्शन व आकाशवाणी) यांनी प्लास्टिकचा धोका किती भयंकर आहे हे स्पष्ट केलं; तसेच स्वच्छतेच्या बाबतीत आपण परदेशी माणसांचं अनुकरण करायला हवं, हे सांगून माणसाने आपणही निसर्गाचाच एक भाग आहोत, हे विसरू नये, असं प्रतिपादन केलं.
मुख्य पुरस्कारार्थी, श्री. सुनील फुलारी ( IG), इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस, यांनी “तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असलात, तरी पर्यावरणाच्या रक्षणामध्ये कमी पडू नका, “हा संदेश आपल्या सत्काराला उत्तर देताना दिला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. विवेक खांडेकर (IFS), अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, यांनी सांगितले की, “आपण निसर्गासोबत राहणे हेच नैसर्गिक आहे . त्यायोगे आपले मानसिक स्वास्थ्य टिकायला मदत होते. वाढत्या लोकसंख्येवर काबू केल्यास माणसाचे जीवन अधिक आनंदी होणे शक्य आहे.”
आभारप्रदर्शन करताना गुरुकृपा संस्थेचे पुणे कार्यवाह श्री. प्रशांत थोरात यांनी आपल्यापैकी प्रत्येकाने पर्यावरणासाठी काम करायलाच हवे, ही अपेक्षा व्यक्त केली.
श्री. संजय भुजबळ यांनी अतिशय नेटके सूत्रसंचालन केले. श्री. प्रसाद कराडकर, श्री. विजय सोनवणे आदींनी तांत्रिक बाजू सांभाळली.
आकाशवाणीच्या कर्मचाऱ्यांनी तसेच श्री. रूपेश बाहेती, श्री. प्रसाद लोणकर, सौ. विजया नकाते,
सौ. स्वाती नवले, सौ. रोहिणी तावरे, सौ. मंजुषा नरवाडकर, सौ. सुजाता चौहान इत्यादींनी कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा, म्हणून अपार परिश्रम घेतले.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800