सिंगापूर इथे ‘ऋतुगंध शिशिर‘ या ई अंकाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला.
या अंकाची मुख्य संकल्पना ‘आई’ आहे. शिशिर ऋतू हा जसा वसंत ऋतूची चाहूल गर्भात घेऊन नवीन पालवीच्या स्वागताची तयारी करतो अगदी तशीच प्रत्येक ‘आई’ ही आपले सर्वस्व देऊन येणाऱ्या नवीन पिढीच्या स्वागताच्या तयारीला सज्ज असते.
शिशिर ऋतू हा सृजनशीलतेचे द्योतक आहे. म्हणून ऋतुगंध शिशिर अंक आणि ‘आई’ हा विषय असे यांचे मिलन या ऋतुगंध अंकाचे वैशिष्ठ्य म्हणता येईल.
या सोहळ्याचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिका माधवी कुंटे यांच्या ऑनलाईन मनोगताने झाले. सिंगापूरमध्ये राहून, आपल्या मायभूमीच्या ओढीने मराठी बांधवांनी मराठी भाषेचा वैभवशाली वारसा पुढे नेला आहे. हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. मराठी नियतकालिके बंद पडत असताना महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या, ऋतुगंध संपादक मंडळाने ही अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली आहे असे त्या आपल्या मनोगतात म्हणाल्या.
त्यांच्या शुभेच्छा ऋतुगंध-शिशिर या अंकाला देताना त्या पुढे म्हणाल्या, “सिंगापूर स्थित आणि विविध देशातील लेखकांची साहित्य संपदा या अंकाला लाभली आहे. अंकाचा ‘आई’ हा विषय हृदयस्थ आहे आणि शिशिर ऋतूच्या गारव्याची कळा सोसून नवसृजन करणारी आई आणि तिची विविध रूपे ही या अंकाची मूळ संकल्पना आहे, ही अतिशय हृद्य आहे.”त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉ निशीगंधा वाड यांनी ऋतुगंध शिशिर अंकाला शुभेच्छा देताना सांगितले की, हा उपक्रम स्पृहणीय आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. याप्रसंगी त्यांनी त्यांची ‘आई’ ज्येष्ठ साहित्यिका डॉ विजया वाड यांची आठवण काढली आणि आई आणि मुलीचे नाते किती दृढ असते, वेगळे असते याचा उल्लेख केला. जे ईश्वर पूर्ण करू शकला नाही ते आई या इहलोकात पूर्ण करते.
या वर्षी ऋतुगंधचे वसंत, ग्रीष्म, शरद आणि शिशिर असे चार अंक प्रकाशित झाले. “या अंकांचे संपादन करणे हा एक भरीव सुंदर अनुभव होता असे संपादिका या नात्याने मला वाटते, असे सांगून अनेक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ साहित्यिकांच्या शुभेच्छा आणि साहित्य या अंकाला लाभले आणि हेच या अंकाचे भाग्य असून त्या अंकाला मराठी भाषेचा झेंडा फडकवत ठेवण्यास बळ देईल”असे मोहना कारखानीस म्हणाल्या. त्यासाठी सर्व समिती सदस्यांचा हातभार, सुयोग्य नियोजन आणि महाराष्ट्र मंडळ-सिंगापूरचे अध्यक्ष सचिन गांजापूरकर यांचा पाठिंबा या महत्त्त्वाच्या गोष्टी ठरतात.
या ई अंकाची लिंक ऋतुगंध समितीतील श्रेयस पेठे यांनी केली असून, सुंदर, समर्पक मुखपृष्ठ मीनल लाखे यांनी केले. तसेच अंकातील आणि मुखपृष्ठावरील कॅलिग्राफी अतुल दाते यांनी केली आहे.
अश्विनी तांबे यांनी अंकातील तांत्रिक बाजू सांभाळल्या, त्यात व्ही लॉग ही नवीन संग्रहणीय बाजू येते. किशोर वामन, मोहित कुलकर्णी यांनी सादरीकरणाच्या मुख्य तांत्रिक बाजू उचलून धरल्या.
या समारंभात ‘आई’ या विषयाला धरून विविध साहित्य प्रकारात सादरीकरण झाले. विशेषतः आईचे व्यापक रूप श्रोते आणि वाचकांसमोर आले.
संपूर्ण सोहळ्याचे निवेदन अतुल दाते आणि श्रेयस पेठे यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिंगापूरातील आणि परदेशातील लेखक, वाचक यांना ऐकता येण्याचा सुयोग आला.
अंकाची ऑनलाईन लिंक यावेळी पडद्यावर दाखवण्यात आली.
अनेक प्रतिभावान लेखक आणि जाणकार श्रोते यावेळी प्रत्यक्ष आणि झूम वर उपस्थित होते.
अंकाचे अंतरंग विविध कविता, कथा, लेख, पूर्व संपादकांचे मनोगत, ‘फुलपुडी’ या काव्यसंग्रहाचे परीक्षण आणि विविध पर्यटन स्थळातुन शिकण्यासारख्या अनेक गोष्टी यांनी सजले आहे.
अंकाची मांडणी आकर्षक असून, प्राण्यांच्या माता आणि त्यांची पिल्ले आपल्याला चित्ररूपात भेटतात, हे या अंकाचे वैशिष्टय आहे.
‘ऋतुगंध‘
‘ऋतुगंध’ हा मराठी भाषा आणि साहित्य यांचे व्यासपीठ असलेला ऑनलाईन अंक, सिंगापूर इथे गेली १६ वर्षे अखंडित संपादित होत आहे. सहा ऋतूंचा गंध साहित्य रुपात आणून दरवळत ठेवण्याचा उपक्रम महाराष्ट्र मंडळ, सिंगापूर मंडळातील प्रतिभावान लेखक, लेखिकांनी एकत्र येऊन सुरु केला आणि तो आजपर्यंत अव्याहत चालू आहे.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
