साहित्य अकादमीचा युवा बिसमिल्ला खाँ पुरस्कार केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते नुकताच गौरी देवल ला दिल्ली येथे मंडी हॉऊस जवळील मेघदूत सभागृहात प्रदान करण्यात आला. ती हा पुरस्कार स्वीकारत असतांना टाळयांचा कडकडाट निनादत होता. यावरून गौरी ही लोकप्रिय नाटक कलावंत असल्याची प्रचिती आली.
महाराष्ट्रात नाटक संस्कृती रूजत होती, त्यावेळी गौरी च्या आजोबांनी 1855 मध्ये देवल नाटक कंपनीची सुरूवात केली होती.
गौरीचे वडील रेल्वेत असल्यामुळे त्यांची बदली होत असे. गौरीचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण
वर्धा जिल्ह्यात झाले. शाळेत असतानाच तिने नाटकात काम करायला सुरूवात केली. कधी शाळेतील कार्यक्रमांमध्ये तर कधी व्यावसायिक नाटकात ती भुमिका करू लागली. तिथे तिला इथापे गुरूजींचे मार्गदर्शन लाभले. पुढे तिने कथक नृत्य, गायनाचे रीतसर प्रशिक्षण घेतले.
गौरी ने राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार पटकावले आहेत. नाटक हेच आपले करीयर असू शकते, हे उमगल्यावर तिने पुणे येथील संस्थेतून नाट्य शास्त्रात पदवी घेतली. या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाचे स्वप्न असते की, दिल्ली येथील राष्ट्रीय नाटक विद्यालय (एनएसडी) मध्ये पदव्युत्तर शिक्षण घ्यावे. या संस्थेत देशभरातून केवळ 27 विद्यार्थ्यांनाच निवडले जाते. या प्रथितयश संस्थेत शिकण्याची संधी गौरी ला मिळाली. अभियनाचे बारकावे अधिक सुक्ष्मपणे तिला येथे शिकता आले.
पुढे गौरी ने नाटकातील करिअर साठी दिल्ली च निवडले. तिच्यासाठी भाषेचा अडथळा नव्हताच. प्रेक्षकवर्गही देशभराचा होता. अडथळा होता तो येथील ‘पास’ (निशुल्क प्रवेशिका) संस्कृतीचा ! लोकांना तिकीट काढून नाटक पाहणे म्हणजे काहीतरी वेगळे वाटायचे. परंतु गौरी व तिच्या सह कलाकारांनी प्रेक्षकांना हे पटवून दिले की, नाटक पैसे देऊन बघायचे असते ! आता तिचे प्रत्येक नाटक पैसे देवून बघतिले जाते,हे विशेष !
ख्यातनाम लेखिका त्रिपूरी शर्मा यांनी गौरी ला घेऊन ‘रूप- अरूप’ हे नाटक लिहीले. हे स्त्री प्रधान नाटक आहे. या नाटकात नाटय क्षेत्रातील प्रारंभीचा कालखंड दाखविला आहे. त्या काळात पुरूषच महिलांची भुमिका करायचे. त्यात एक मुलगी कशी आपली ओळख निर्माण करते, यावर हे नाटक आहे.
आतापर्यंत या नाटकाचे भारत भर 200 हून अधिक प्रयोग झालेले आहेत. याशिवाय तिने ‘सुरज का सातवा घोडा’, ‘मे दिस समर’, ‘लव का ओवरडोस’ ….. अशा अनेक नाटकांमध्ये महत्वाची भुमिका केली आहे. नाटक प्रेमींच्या मनात गौरी ची एक अबाधित अशी जागा निर्माण झाली आहे.
या शिवाय गौरी एनएसडीमध्ये कामही करते. नाटक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना एनएसडीमध्ये प्रवेश मिळत नसतो. पण, अभिनयाचे प्रशिक्षण हवे असते, अशा तरूणांसाठी गौरी आणि तिचा जीवनसाथी हॅपी रणजित यांनी मिळून श्युनिर्कान अक्टर्स स्टूडियो’ ही संस्था सुरू केली आहे. त्यांच्या या संस्थेच्या माध्यमातून गौरी नव्या पिढीला घेऊन नाटक बसविते. या नाटकात ती नवनवीन विषय हाताळते.
आपल्या यशात कौटूंबिक वारसा आणि महाराष्ट्राची नाटय संस्कृतीची उज्वल परंपरा आहे, असे गौरी मानते.
राजधानी दिल्लीत गौरी महाराष्ट्राच्या समृद्ध नाटक पंरपरेचा वसा समर्थ पणाने चालवत आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
गौरीच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा !

– लेखन : अंजु निमसरकर. माहिती अधिकारी,
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800