कुठल्याही देशात चोरी, खून, दरोडा, बलात्कार असे गुन्हे होणे चांगले नाहीच.ह्याला कारणीभूत माणसाची वृत्तीच.मग देश कुठलाही असो. तरीही ज्या देशात अश्या गुन्ह्यांची सरेआम चर्चा होते, निषेध होतात, शिक्षा होते, असे देश म्हणजे खरी लोकशाही.
लोकशाहीत चुका असतात हे जाणून घेऊ या. त्या करणारे ही माणसंच असतात..
बाकी बऱ्याच देशात हे सगळे लपवले जातं आणि तसे करणारे आपलेच लोक आहेत, ह्याचे वाईट वाटते..
तर अमेरिका हा देश खूप सुरक्षित आहे असे म्हणता येणार नाही. शहरात तर चोरी, मोबाईल खेचून घेणे हे प्रमाण जास्त आहे.
दर पाच दहा मिनिटाला सेफ्टी अलार्म वाजत असतात. नवीन रहायला आलेली व्यक्ती तर पहिले थोडे दिवस दचकत राहते.
हो..मी अतिशय विचाराने आणि गंभीरपणें हे लिहीत आहे.. अमेरिकेत असणारा अंधार आणि कमी लोकसंख्या, ह्यामुळे रस्त्यावर लोक नसतात.. मोठ्या शहरात असतात..असतील तरी पूर्ण सुरक्षित नाहीत.. पण इतर ठिकाणी माणसं कमीच असतात.. सूनसान म्हणून भीती.. म्हणजे भीती आहेच..
गंमत म्हणजे डाऊन टाऊन आले की माणसं दिसतील हा आनंद व्हायचा.. थोडे विषयांतर झालं..
तर मुद्दा काय, सूनसान रस्ता, बाजूने जाणाऱ्या गाडीतील व्यक्ती आपल्याला प्रेमाने हात दाखवते अस दृश्य असले तरी इतक्या एकांताची आपल्याला भीतीच वाटते, हे मात्र खरे आहे..
आणि मग अमेरिकेत सुरक्षितता तशी कमी आहे, हे जाणवतं..मग पोलीस असतात का ? तर उत्तर हो असे आहे आणि पाच ते दहा मिनिटात पोलिसांची मदत मिळते हे ही खर आहे..
पोलीस अतिशय प्रामाणिकपणे मदत करतात, ह्याचे तर कौतुकच आहे..
किती दोन विरोधी टोक आहेत ना..
एकीकडे भीती आहे, तर दुसरीकडे मदत ही आहे..
मी दोन वेगवगळ्या घडलेल्या किस्स्यामधला एक तुम्हाला सांगते..
अश्याच एका सूनसान रस्त्यावरून जाताना माझ्या भाच्याला मागून एका गाडीने ठोकर मारली..त्याचे काम आहे, वेगवेगळ्या साईट्सना भेट देणं.. दुर्दैवाने तो त्या दिवशी एकटाच गाडीत होता..
ह्या गाडीने एकदा ठोकर मारली, परत थोडा वेळ गेला. परत ठोकर मारली.. असे झाले की आपण काय करतो? गाडीतून खाली उतरून, का ठोकर मारतोय ते बघतो.
त्याने ही असच केलं..
तो खाली उतरला आणि त्याचे हात मागे बांधून त्याच्याकडे पाकीट, लॅपटॉप, अजून काय काय आहे ते दे असे सांगण्यात आले..
तो म्हणाला हात सोड, त्या शिवाय कसे देऊ?
सुरवातीला त्याला वाटले की गाडीचे लायसन्स मागतोय, मग त्याच्या लक्षात आलं की हा आपल्याला लुटतोय..
बरे..! तिथे लुटून झालं की प्रुफ नको म्हणून तुम्हाला मारून टाकतात..ते काहीही पुरावा मागे सोडत नाहीत..
तो एकदम सावध झाला..सामान देतो देतो करत त्याने गाडीतला चाकू हातात घेतला, जो तो नेहमी त्याच्या सेफ्टी करता गाडीत ठेवतो..
त्या गुंडांने गन कानशीलावर धरली आणि ह्याने प्रसंगावधान राखून ती गन वर केली. हवेत गोळीबार झाला. ह्याने चाकू त्याच्या मानेवर धरला आणि म्हणाला,
” चल..! आज दोघे ही मरू या..”
आणि “मग तू वेडा आहेस” म्हणत तो गुंड तिथून पळून गेला..
माझ्या भाच्याने पोलिसांना कॉल केला. पोलीस पाच मिनिटात आले. म्हणाले, तुझ्या डेरिंगमुळे तू वाचलास..
भाचा वाचला तरी, बरेच दिवस त्या गोळीच्या आवाजाने त्याचे कान बधीर झाले होते. असो.
इथे न्यायव्यवस्था अतिशय सक्षम आहे. गुन्हा सिद्ध झाला की 25 ते 30 वर्ष जेल मध्ये काढावी लागतात.
भारतासारखं एक केस वर्षा मागून वर्ष चालत राहते, अशी अवस्था नाहीये.राजकीय हस्तक्षेप, ओळख हा प्रकार चालत नाही..
त्यामुळे मग पुरावा मागे राहू नये म्हणून तुम्हाला मारून टाकतात.
पोलीस म्हणाले, ” की कधी कधी भारत बरा वाटतो..पण कधी कधीच !”
“काही गोष्टी तुमच्या देशात चांगल्या आहेत, तर काही आमच्या..”
किती वैचारिक परिपक्वता आहे, बघा ना ! आपल् तू तू मैं मैं… कशाला?
ही सर्व स्टोरी आम्ही श्वास रोखून ऐकत होतो. माझ्या डोळ्यासमोर माझी वहिनी होती.
अर्थात तिला हे सगळे नंतर कळले ..पण जिवाचं पाणी पाणी होणे ह्या म्हणीचा अर्थ तेव्हा तिला तर कळला, पण मलाही कळला.
ह्या दृष्टीने आपला देश बऱ्या पैकी सुरक्षित आहे ही, नाही ही आणि काही गोष्टी चुकीच्या आहेत हे तुम्हाला जाणवलं असेलच..
हे सगळे आपण बदलू शकतो. त्यासाठी आपण नागरिकांनी राज्यकर्त्यांना वठणीवर आणायला हवे.
पण हे सगळे तिथे राहणारे आपलेच लोक लपवतात. काय गरज आहे ? चांगले ते घ्या.. कुठलेही देश असो.
उलट दुबई, बरेचसे आखाती देश, इतर देश हे भारत, अमेरिका दोन्ही पेक्षा सर्व दृष्टीने चांगले आहे. मी स्वतः साक्षीदार आहे त्याची.
अजून एक किस्सा आहे, तो पुढच्या भागात लिहीन..
क्रमशः

– लेखन : प्रतिभा चांदुरकर, ठाणे
– संपादन :देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800