नवी मुंबईतील नेरुळ ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालय या संस्थेतर्फे मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. श्री. अजित मगदूम यांनी ‘मराठी भाषा- मनाची आणि सन्मानाची’ या विषयावर ओघवत्या शैलीमधे व्याख्यान दिले.
मराठी भाषा दिनविशेष उद्धृत करताना ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानीत महाराष्ट्राचे श्रेष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर अर्थात कवी ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमाचे महत्व पटवून देताना कुसुमाग्रजांच्या काही आठवणी जागवल्या. “मराठी असे आपूली मायबोली, परंतु आज मराठी भाषा फाटक्या वस्त्रानिशी राज दरबारात उभी आहे.” असे परखड प्रतिप्रादन करणारे कुसुमाग्रज त्यांच्याच एका कवितेत “माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या, दर्याखोर्यांतील शिळा. माझ्या मराठी मातीला, नका म्हणू हीन दीन, स्वर्गलोकाहून थोर, मला हिचे महिमान” अशी मराठी भाषेची थोरवी गाताना दिसतात, अशी औचित्यपूर्ण माहिती दिली.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी.
ही सुरेश भटांची कविता आळवताना मराठी भाषा इतकी लवचिक आहे की आमुच्या मनामनात मराठी भाषा दंगते, रगारगात रंगते, उराराउरात स्पंदते, नसानसात नाचते असे गोडवे गायले आहेत याची आठवण करुन दिली.
परदेशी भाषेचा गाढा अभ्यास आणि अफ्रिकन अमेरिकन साहित्यावर संशोधनात्मक प्रबंध लिहून डॉक्टरेट प्राप्त, उच्चविद्याविभूषित प्राचार्य अजित मगदूम यांनी परदेशी भाषा आणि मराठी भाषा यासंबंधी तौलनिक विवेचन केले.
या बरोबरच रोजच्या व्यवहारात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण कोणकोणत्या उपायांचा अंगीकार करु शकतो, याचे उद्बोधक मार्गदर्शन केले.
या औचित्यपूर्ण प्रसंगी सन्माननीय श्री. अजित मगदूम सर यांच्या शुभहस्ते श्री. घनश्याम परकाळे लिखित ‘कॉमन मॅन’ या पुस्तकाच्या ई-बुक अर्थात स्मार्ट डिजिटल पुस्तक आवृत्तीचे प्रकाशन संपन्न झाले.
ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष श्री. अरविंद वाळवेकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले. व्यासपीठावर ग्रंथालयाचे सन्माननीय अध्यक्ष श्री. प्रकाश लखापते, सचिव श्रीमती सीमा आगवणे, ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक श्री. क्षेत्रमाडे सर उपस्थित होते.
प्रास्ताविकात श्री. प्रकाश लखापते यांनी ग्रंथालयाच्या ‘साहित्य कट्टा’ उपक्रमाअंतर्गत विविध कार्याचा ओघवता आढावा घेतला.
श्री. घनश्याम परकाळे यांनी समयोचित सूत्रसंचालन करताना खुसखुशीत शैलीने कार्यक्रमात रंग भरले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथांमधून माझा मराठीचि बोलु कौतुकें। परि अमृतातेहीं पैजासीं जिंके। ऐसीं अक्षरें रसिकें। मेळवीन॥ इथं अमृत म्हणजे अमृत-वाणी म्हणजे देव-वाणी संस्कृत भाषेतील ७०० श्लोक असलेली गीता आणि त्यामधील मधील ज्ञान सर्वांसाठी खूले करून देताना ९००० ओव्यांचा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला आणि सर्वसामान्य रसाळ प्राकृत मराठी भाषेमधील गीतेची महती एकवेळ अमृत-वाणी अर्थात संस्कृत भाषेशी पैज लावू शकेल असा ज्ञानेश्वर माऊलींना अपेक्षित अन्वयार्थ असू शकेल असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन, श्री. रमेश गायकवाड-उपाध्यक्ष, श्रीमती कोमल, श्री. गणेश करमरकर यांनी सादर केलेली प्रार्थना आणि महाराष्ट्र राज्यगीताने झाली.
पुष्पपर्णी साहित्य कट्टा संस्थापक अध्यक्ष सन्माननीय साहित्तिक श्री. गज-आनन म्हात्रे यांनी मराठी भाषेचे महत्व विषद करणारी स्वरचित आग्रही कविता सादर करित उत्साही इंद्रधनुष्य साकारले.
श्रीमती तांडेल, यांनीही आपली हृदयस्पर्शी कविता सादर केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष, श्री. अरविंद वाळवेकर यांनी मनोगत रुपी अभिप्राय दिला.
सरतेशेवटी आभारप्रदर्शन करताना सचिव श्रीमती सीमा आगवणे यांनी सर्व संबंधितांचे आभार मानताना ग्रंथालयासाठी सढळ हस्ते सहाय्य करण्याचे आवाहन केले. काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू न शकलेले आजच्या कार्यक्रमाचे आयोजक ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष श्री. विकास साठे यांना विशेष धन्यवाद दिले.
प्रारंभी सौ. बबिता खंडारे यांनी सुरेल स्वरस्वती स्तवन आणि भैरवीला पसायदान सादर केले. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800