Thursday, September 18, 2025
Homeलेखरानडे इन्स्टिट्युट

रानडे इन्स्टिट्युट

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग हा स्थापने पासूनच डेक्कन जिमखाना परिसरातील रानडे इन्स्टिट्युट मध्येच आहे. गंमत म्हणजे हा विभाग, विभागाच्या नावाने न ओळखला जाता आजही रानडे इन्स्टिट्युट म्हणुनच ओळखला जातो.

या विभागाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा काल, ६ मार्च २०२३ रोजी रानडे इन्स्टिट्युट मध्ये आयोजित करण्यात आला.अतिशय आनंदी वातावरणात झालेल्या या स्नेह मेळाव्यात विभागाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त विभाग प्रमुख प्रा डॉ उज्वला लेले – बर्वे यांनी विविध उपक्रम जाहीर केले.
या निमित्ताने जाणून घेऊ या, या विभागाचा इतिहास, वाटचाल.
निवृत्त विभाग प्रमुख प्रा प्र. ना. परांजपे सर यांनी लिहिलेला हा लेख, या पूर्वी महाराष्ट्र टाइम्स मध्ये ५ फेब्रुवारी२०२३ रोजी प्रसिद्ध झाला आहे.
विभागास हीरक महोत्सवी वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
– संपादक

पत्रकारिता शिक्षणाचे आद्यपीठ

आज, पाच फेब्रुवारीला सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठात वृत्तपत्रविद्या विभाग स्थापन झाल्याला ५९ वर्षे पूर्ण झाली. आता संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग – ज्याला बहुसंख्य पत्रकार ‘रानडे इन्स्टिट्यूट’ म्हणून ओळखतात – हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. वृत्तपत्रे, दूरचित्रवाणीच्या वाहिन्या, नभोवाणी, जाहिरात संस्था, अनेक माध्यम संस्थांत महत्त्वाच्या उच्च पदांवर या विभागाचे अनेक माजी विद्यार्थी काम करीत आहेत. त्या सर्वांना आपल्या मातृविभागाबद्दल प्रेम व अभिमान वाटत असेल.

पत्रकारितेच्या शिक्षणाच्या अग्रपूजेचा मान मात्र पुण्याकडे नाही, तर नागपूरकडे जातो. नागपूरच्या (त्या वेळच्या) ‘हिस्लॉप कॉलेज’मध्ये १९६२ मध्ये एका अमेरिकी प्राध्यापकाने पत्रकारितेच्या अध्यापनाला प्रारंभ केला. एक वर्षाच्या शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना पदविका (डिप्लोमा) दिली जाई. ‘सकाळ’चे एक संपादक श्री. ग. मुणगेकर यांनी हा अभ्यासक्रम ना. भि. परुळेकरांच्या पाठिंब्याने पूर्ण केला होता. दुर्दैवाने हा अभ्यासक्रम पाच-सहा वर्षांनंतर बंद झाला.

१९८३-८४ साली झालेल्या विभागाच्या एका कार्यक्रमात प्रा गोखले सर आणि प्रा परांजपे सर…

पुणे विद्यापीठात पत्रकारितेचा अभ्यासक्रम सुरू होण्यास कारणीभूत ठरले ‘संदेश’कार अ. ब. कोल्हटकरांचे चिरंजीव. आफ्रिकेतील आपल्या नोकरी- व्यवसायातून निवृत्त होऊन ते पुण्यात आले होते. त्यांनी पत्रकारांच्या पुढच्या पिढ्यांना आपल्या वडिलांच्या नावे पारितोषिक देण्यासाठी पुणे विद्यापीठाकडे १९५६ मध्ये १० हजार रुपये (त्या काळी सोन्याचा दर १०० रुपये तोळा होता!) सुपूर्द केले. त्यामुळे पुणे विद्यापीठाने पाच फेब्रुवारी १९६४ पासून पत्रकारितेचे शिक्षण देणारा विभाग सुरू हेला. ‘ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी’ने ‘रानडे इन्स्टिट्यूट’मधील रिकाम्या केलेल्या दोन खोल्यांत हा विभाग स्थापन झाला आणि भारत सरकारच्या पत्रसूचना विभागातून निवृत्त झालेले मो. ज्ञा. शहाणे यांची विभागप्रमुखपदी नेमणूक झाली.

प्रारंभी हा अभ्यासक्रम संध्याकाळचा अर्धवेळ होता. शंभर गुणांच्या पाच प्रश्नपत्रिकांच्या या अभ्यासक्रमाच्या शेवटी पत्रकारितेचे प्रमाणपत्र दिले जाई. शहाणे १९६७ मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर ना. म. शिधये यांनी विभागाचे कामकाज वर्षभर पाहिले. नंतर नेतृत्वाअभावी हा विभाग बंद होण्याची वेळ आल्यामुळे ल. ना. गोखले ‘केसरी’तील नोकरी सोडून येथे आले. त्यांच्यामुळे विभागाला स्थैर्य मिळाले. त्यांनी दोन वर्षांच्या अर्धवेळ प्रमाणपत्र अभ्यासक्रमाऐवजी एक वर्षाचा पूर्ण वेळ पदविका अभ्यासक्रम १९७३ मध्ये सुरू केला.

या सर्व काळात हा विभाग तात्पुरता (ॲड हॉक) होता. गोखले यांच्या प्रयत्नांमुळे १९६७ मध्ये याला विद्यापीठाच्या पूर्ण स्वरूपाच्या विभागाचा दर्जा मिळाला. ल. ना. गोखल्यांना १९७६ मध्येच प्राध्यापकपद मिळाले. तोपर्यंत ते प्र-पाठक होते. १९७६ ते ७८ अशी दोन वर्षे प्र-पाठक पद रिकामे होते. पदव्युत्तर पदवी, अध्यापनाचा अनुभव आणि पत्रकारितेचा अनुभव अशी तिहेरी क्वालिफिकेशन असलेल्या व्यक्ती त्या वेळी दुर्मीळ होत्या. शिवाय पत्रकारितेचे वलयांकित क्षेत्र सोडून मर्यादित प्राप्तीचे हे पद स्वीकारण्यास बुजूर्ग पत्रकार तयार नव्हते, म्हणून गोखल्यांनी मला आग्रह केला. त्या वेळी मी एम ए, एमलिट होतो, अध्यापनाचा १५ वर्षांचा अनुभव होता आणि ‘ललित’ मासिकाच्या संपादनाचाही एक वर्षाचा अनुभव होता. गोखल्यांच्या आग्रहामुळे मी हे पद स्वीकारले आणि ऑक्टोबर १९७८ मध्ये विभागात दाखल झालो.

पत्रकारितेचे क्षेत्र आंतरविद्याशाखीय आहे. ताज्या घडामोडी समजून घेण्यासाठी पत्रकाराला जगाचा, देशाचा आणि राज्याचा इतिहास ढोबळमानाने माहीत असायला हवा. राजकारणातील प्रवाहांचा परिचय हवा. सामाजिक चळवळी, आर्थिक घडामोडींचा अभ्यास हवा. महत्त्वाच्या व्यक्तींची व भौगोलिक परिस्थितीची माहिती हवी. थोडक्यात, पत्रकाराकडे बुद्धिमत्ता, निरीक्षणशक्ती, अभ्यास, मेहनत, परिस्थितीचे सजग आकलन व लेखनकौशल्य हवे. खरा पत्रकार ही सर्व गुणसंपदा अनुभवातून मिळवतो; पण त्यासाठी त्याला दीर्घ काळ खर्च करावा लागतो.

पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला ही गुणसंपदा त्या मानाने लवकर मिळवणे शक्य होते. निदान त्यासाठी आवश्यक पूर्वतयारी होते. याच हेतूने विभागाने वृत्तलेखन, वृत्तसंपादन या गाभ्याच्या विषयांबरोबरच पत्रकारितेचा इतिहास, देशाचा व राज्याचा इतिहास, ताज्या घडामोडी यांना अभ्यासक्रमात महत्त्वाचे स्थान दिले. त्याचबरोबर जाहिरात, जनसंपर्क व्यवस्थापन, मुद्रण, नभोवाणी-दूरचित्रवाणी, चित्रपट, पत्रकारितेचे तत्त्वज्ञान अशा इतरही अनेक विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला.

विभागात प्रवेश मिळावा म्हणून विविध राज्यांतून, एवढेच काय; बांगलादेश, इराण, अफगाणिस्तान, नायजेरिया, वेस्ट इंडिज अशा वेगवेगळ्या देशांतूनही अर्ज येतात. प्रवेश परीक्षा व मुलाखत यांतील गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश दिला जातो. दर वर्षी एकूण १५० विद्यार्थ्यांना (एमए भाग एक व दोन, प्रत्येकी ४० विद्यार्थी व मराठी आणि इंग्लिश माध्यमातील पदविका, प्रत्येकी ३५ विद्यार्थी) प्रवेश दिला जातो.

आजपर्यंत एकूण ३० विद्यार्थ्यांनी पीएचडी मिळवली असून, सध्या सात विद्यार्थी पीएचडीसाठी संशोधन करीत आहेत.
विभागाचे ग्रंथालय समृद्ध आहे. संगणक कक्षही संपन्न असून, विभागात टीव्ही व रेडिओ स्टुडिओ आहे. या सर्व सुविधांचा मुक्त लाभ विद्यार्थ्यांना घेता येतो. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची कुठल्याही माध्यमसंस्थेत काम करण्याची तयारी झालेली असते. म्हणूनच विभागाच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्यांत प्राधान्य मिळते.

विविध वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या व अन्य माध्यमसंस्थांत विभागाचे माजी विद्यार्थी उच्च पदे भूषवित आहेत.

सध्या विभागात सहा पूर्ण वेळ अध्यापक काम करीत आहेत. उज्ज्वला बर्वे प्राध्यापक व विभागप्रमुख आहेत. त्या स्वत: व इतर अध्यापक विभागाचेच माजी विद्यार्थी आहेत. पूर्वी विभागाला अध्यापकांची चणचण भासत असे. एक प्राध्यापक, एक प्र-पाठक व दोन व्याख्याते आदी चार पदे असत. अरुण साधू यांच्यासाठी १९९५ मध्ये युनिव्हर्सिटी फंडातून प्राध्यापकाचे एक पद तात्पुरते निर्माण करण्यात आले. डॉ. केवल जे. कुमार, प्रसन्नकुमार अकलूजकर, पद्मिनी पटवर्धन, संजय संगवई, परिमल चौधरी, जयदेव डोळे, किरण ठाकूर आदींनी विभागात अध्यापनाचे काम केले.

विषयांचे वैविध्य लक्षात घेता, अध्यापकांची संख्या अपुरीच पडते; त्यामुळे अभ्यागत अध्यापकांची आवश्यकता भासते. प्रभाकर पाध्ये, एम. आर. परांजपे, श्री. ग. मुणगेकर, चंद्रकांत घोरपडे, स. मा. गर्गे, अरविंद गोखले, पीठावाला, सतीश बहादूर, सुजित पटवर्धन, ह. वि. चिटणीस, सुहास पळशीकर, अरविंद देशपांडे, वैजयंती जोशी, समर नखाते अशा अनेक नामवंत व्यक्तींनी अभ्यागत अध्यापक म्हणून काम केले आहे.

विभागाचे नाव, पदव्यांची नावे, अभ्यासक्रमाची संख्या, विद्यार्थीसंख्या इत्यादी बाबतींत गेल्या ५९ वर्षांत वेळोवेळी बदल झाले. विभागाच्या नावाला ‘संज्ञापन’ (कम्युनिकेशन) ही जोड १९८३ मध्ये देण्यात आली. प्रमाणपत्र, पदविका, पदवी (बीसीजे) यामध्ये १९९५ मध्ये ‘मास्टर’ पदवीची भर पडली. त्या आधीपासून विभागात पीएचडीसाठी संशोधन होत आले आहे.

विभागाचा एक विशेष असा की, विभागाला अभ्यासक्रमात ‘पुणे श्रमिक पत्रकार संघा’चे सहकार्य लाभले आहे. पत्रकार संघाच्या सहकार्याने १९७९ मध्ये सकाळच्या वेळातील मराठी माध्यमाचा तीन महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. सन १९८६ मध्ये त्याचा कालावधी सहा महिन्यांचा करून, त्याचे पदविका अभ्यासक्रमात रूपांतर करण्यात आले.

विभागात कार्यानुभवासाठी ‘वृत्तविद्या’ प्रसिद्ध केले जाते. शिवाय विद्यार्थ्यांना माध्यमसंस्थांमध्ये इंटर्नशिप करावी लागते.

पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी देशाच्या राजधानीचा दौरा आयोजित केला जातो. त्यात राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभाध्यक्ष, केंद्रीय मंत्री, खासदार यांच्या मुलाखती विद्यार्थी घेतात. प्रेस इन्फर्मेशन ब्यूरो, डीएव्हीपी, लोकसभा इत्यादी महत्त्वाच्या संस्थांना भेट देतात.

पदविकेचे विद्यार्थी मुंबई किंवा अन्य शहरी अभ्यासदौऱ्यासाठी जातात.

लोकशाहीमध्ये वृत्तपक्षे व माध्यमसंस्था चौथ्या खांबाचे काम करतात. त्यामुळे त्यांचे महत्त्व वेगळे सांगायला नको. लोकशाही निकोप व सुदृढ व्हायची असेल, तर पत्रकारिता सुबुद्ध व सशक्त व्हायला हवी. विद्यापीठाच्या एखाद्या विभागाने ही जबाबदारी पार पाडण्याचा कितीही मन:पूर्वक प्रयत्न केला, तरी त्यांचे प्रयत्न अपुरेच ठरणार. त्यासाठी पत्रकारितेच्या एखाद्या स्वतंत्र विद्यापीठाची आवश्यकता आहे. पत्रकारितेची अशी स्वतंत्र विद्यापीठे मध्य प्रदेश, झारखंड या राज्यांत आहेत. महाराष्ट्रातही ते नजीकच्या भविष्यकाळात अस्तित्वात येवो, अशी आशा बाळगणे, एवढेच आपण करू शकतो.

– लेखन : प्रा प्र ना परांजपे
– समन्वय : प्रा संजय तांबट
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. परांजपे सरांचा लेख वाचनीय आणि एका मोठ्या विभागाचा इतिहास सविस्तर पध्दतीने सांगणारा विस्तृत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा