नमस्कार मंडळी.
आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने थोर महिलांची चरित्र असलेल्या “तिची कथा” या माधुरी साकुळकर लिखित पुस्तकाचे ज्येष्ठ समीक्षक श्री दिलीप गडकरी यांनी लिहिलेले परीक्षण आपल्याला नक्कीच आवडेल.
महिला दिनाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
थोर विचारवंत म्हणतात,
“थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांची पहा जरा”
“आपण त्यांच्या समान व्हावे हाची घ्यावा बोध खरा”
लेखिका, सामजिक कार्यकर्त्या माधुरी साकुळकर यांना वाटलेल्या थोर स्त्रियांची चरित्रे त्यांनी ‘दै.तरुण भारत ‘मध्ये ‘तिची कथा’ या सदरात रेखाटली.
यासाठी त्यांनी विविध स्तरातील, विविध कालखंडातील स्त्रियांचा अभ्यास करून स्त्री आत्मचरित्राचा मागोवा घेतला. त्यासाठी त्यांनी दर आठवड्याला एक आत्मचरित्र वाचण्याचा सपाटा लावला. शक्य त्या व्यक्तींबरोबर आठवडाभर राहिल्या. त्यांची सुख दु:ख जाणून घेतली. त्यांपैकी निवडक शंभर महिलांच्या आत्मचरित्राचा समावेश असलेले “तिची कथा” असे हे पुस्तक आहे.
नागपूरच्या लाखे प्रकाशनतर्फे ३१ मार्च २०१४ रोजी प्रकाशित झाले.
४०७ पानी असलेल्या या पुस्तकाचे मूल्य ४७५ रुपये आहे.
मराठीत स्त्रियांची जवळपास अडीचशे आत्मचरित्र आहेत. बंगालच्या राससुंदरीदेवी यांनी लिहिलेलं
“आमार जीवन” हे १८७६ साली लिहिलेले आत्मचरित्र हे भारतीय भाषेत लिहिलेले पहिलं स्त्री आत्मचरित्र आहे.
ते बंगाली भाषेत आहे.
त्यानंतर ३४ वर्षानंतर १९१० साली मराठीतील पहिलं स्त्री आत्मचरित्र न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांनी “आमच्या आयुष्यातल्या काही आठवणी” या नावाने लिहिले.
माधुरी साकुळकर यांनी ज्या शंभर स्त्रियांच्या आत्मचरित्राचा मागोवा घेतला आहे त्यात राससुंदरी यांनी बंगाली भाषेत लिहिलेल्या आत्मचरित्राचा प्रथम समावेश केला आहे.
त्यानंतर रमाबाई रानडे यांचा समावेश केला आहे.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पत्नी बाया कर्वे यांनी “माझे पुराण” या नावाने आत्मचरित्र जून १९४४ मध्ये प्रकाशित केले .
प्रि.गोपाळराव आगरकर यांच्या पत्नी यशोदाबाई आगरकर यांचे ‘यशोदाबाई आगरकर यांच्या आठवणी ‘१९३८ साली प्रकाशित झाले .
कवी रेव्हरंड वामन नारायण टिळक यांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक यांनी ‘स्म्रूतिचित्रे ‘या नावाने आत्मचरित्र लिहिले आहे .
‘मुला -फुलांचे कवी ‘ म्हणून प्रसिध्द असलेले बालकवी ठोंबरे यांच्या पत्नी पर्वतीबाई ठोंबरे यांचे ‘मी आणि बालकवी ‘ हया नावाने आत्मचरित्र २५ ऑक्टो .१९८८ साली प्रसिध्द झाले .
डॉ .श्रीपाद अम्रूत डांगे यांच्या पत्नी उषा डांगे यांनी ‘उषाकाल ‘नावाने आत्मचरित्र लिहिले आहे त्याचे शब्दांकन त्यांची मुलगी रोझा देशपांडे यांनी केले आहे .
आसामी भाषेतील सर्वाधिक लोकप्रिय लेखिका मामोनी रायसम उर्फ इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. त्यांनी पंचवीस कादंबऱ्या व शेकडो कथा लिहिल्या आहेत .त्यांचे ‘आधालेखा देस्तावेज ‘हे आत्मचरित्र प्रसिध्द आहे .
सी .डी .देशमुख यांच्या पत्नी दुर्गाबाई देशमुख यांचे ‘चिंतामण अँड आय ‘हे आत्मचरित्र १९८७ साली प्रकाशित झाले .
भालजी पेंढारकर यांची कन्या व रणजीत देसाई यांची पत्नी माधवी देसाई यांनी ‘नाच गा घुमा ‘या नावाने आत्मचरित्र लिहिले आहे
शाहीर अमर शेख यांची कन्या व नामवंत कवी नामदेव ढसाळ यांची पत्नी म्हणून नाही तर कवयित्री , नाटकांत काम करणारी अभिनेत्री , गायिका अशा विविध भूमिकात वावरणाऱ्या मल्लिका अमर शेख यांनी जून १९८४ मध्ये ‘मला उध्वस्त व्हायचंय ‘या नावाने लिहिलेल्या आत्मचरित्राने सर्वत्र खळबळ माजली .
पु .ल .देशपांडे यांच्या पत्नी सुनीता देशपांडे यांचे ‘आहे मनोहर तरी ‘हे आत्मचरित्र एक आगळे वेगळे आहे .हे आत्मचरित्र वाचतांना जाणवतंय की सुनीताबाई स्वतःकडे खूपच मोठेपणा घेतात . मी होते म्हणून त्यांना शिस्त लावली , त्यांना कुणी लुबाडले नाही , त्यांचा कोणी गैरफायदा घेतला नाही .अशी विधानं केल्यामुळे पुलंच्या जडणघडणीत सुनीताबाई यांचा सिंहाचा वाटा आहे असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे .
कवी नारायण सुर्वे यांच्या पत्नी कृष्णाबाई सुर्वे यांचे ‘मास्तरांची सावली ‘ तसेच कवी विं.दा .करंदीकर यांच्या पत्नी सुमा करंदीकर यांचे ‘रास ‘हे आत्मचरित्र म्हणजे आपल्या पतीच्या सहवासात घालवलेल्या सहजीवनाचे चित्रण आहे .एका समाधानी जीवनाची कहाणी आहे .
माधुरी साकुळकर यांनी शंभर स्त्री आत्म चरित्रांचा मागोवा घेतला आहे .शब्दमर्यादेमुळे जास्तजणींचा उल्लेख करणे शक्य नाही .त्यांनी अनेक खून करणाऱ्या फुलनदेवी पासून अनेक चित्रपटांत काम करणाऱ्या नायिका तसेच अनेक ग्रंथनिर्माण करणाऱ्या साहित्यिकांसह सेक्सवर्कर नलिनी जमीला हिच्या आत्मचरित्राचा मागोवा घेतला आहे .ज्या महिलांची दखल घेतली आहे त्यात स्वकर्तूत्वाने नावारूपास आलेल्या अथवा पती अथवा वडिलांच्यामुळे नावारूपास आलेल्या महिलांचा समावेश आहे .
सर्व आत्मचरित्र वाचत असताना आपल्या लक्षांत येते की सुरवातीची मराठीतील स्त्रियांची आत्मचरित्र ही पती प्रतिमा रेखाटणे , पतिविषयि आदर , कौतुक , पती हाच सर्वस्व , पती म्हणजे देव असे मानणाऱ्या स्त्रियांची पतीचरीत्रच होती .कालानंतराने ती जोड चरित्र झाली .
१९९० नंतर नवऱ्याशी असलेले भांडण , दुरावा , त्यांनी केलेली प्रतारणा अशा प्रकारची परखड आत्मचरित्र येऊ लागली .
२००५ नंतर खऱ्या अर्थाने महिलांची स्वतःची आत्मचरित्र येऊ लागली .
लेखिकेने हा ग्रंथ निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे . उपलब्ध असलेली चरित्रे त्वाचली.त्यांचा सारांश लिहिला .यावरून मला एक चारोळी सुचली
“लिहिणाऱ्याने लिहित जावे,
“वाचणाऱ्याने वाचत जावे”
“वाचता वाचता एक दिवस”
लिहिणाऱ्याचे हात घ्यावेत”
म्हणजे वाचकाने लेखकांची लेखन कला आत्मसात करावी . त्यांनी कशी मेहनत घेतली, तो आदर्श समोर ठेवावा .कारण लेखिकेने ज्यांची आत्मचरित्रे उपलब्ध नाहीत त्यांच्या सहवासात आठवडाभर राहून त्यांचे अनुभव आपल्या शब्दांत मांडले .
नागपूरच्या लाखे प्रकाशनतर्फे ३१ मार्च २०१४ रोजी प्रकाशित केलेले हे पुस्तक प्रत्येक स्त्रीने वाचावे. स्वतःचे आत्मचरित्र लिहावे . शक्य असेल तर आजूबाजूच्या महिलांना आत्मचरित्र लिहिण्यास सहकार्य करावे. राजकारण, समाजकारण क्षेत्रांत काम करणाऱ्या प्रत्येक महिलेने तर हे पुस्तक संग्रही ठेवावे.
हे पुस्तक निर्माण करणाऱ्या माधुरी साकुळकर यांना त्रिवार वंदन करून मी माझ्या शब्दांना विराम देतो .

– परीक्षण : दिलीप गडकरी. कर्जत- रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
प्रेरणादायक साहित्य.