आज जागतिक महिला दिन आहे. या निमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा गौरव करणे उचितच आहे. पण त्याच बरोबर “विधवा” म्हणवल्या जाणाऱ्या महिलांना सापत्न वागणूक न देता, एक स्त्री म्हणून त्यांना सन्मानाची वागणूक, आज ही आपल्या तथाकथित पुरोगामी विचारांच्या समाजात मिळत नाही, ही कटु वस्तुस्थिती आहे.
वस्तुतः राजमाता जिजाऊ, येसुबाई, ताराबाई, झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, इंदिरा गांधी या सर्व भारतीय स्त्रियांनी आपला इतिहास अगदी सुवर्णUमय करून टाकलाय. अशा अनेक स्त्रीयांचे कार्यकर्त्तव्य थक्कं करणार आहे. या स्त्रीया भारतात जन्माला आल्या नसत्या तर कदाचित आपल्या देशाचे नाव देखील शिल्लक राहिले नसते.
एक मात्र लक्षात घ्यायला हवं, वरील सर्व स्त्रीया या “विधवा” होत्या. त्यांच्या अतुलनीय कामगिरी, पराक्रमाने त्या आजही पुजनीय आहेत. पण असे असूनही समाजाचा “विधवा” स्त्री कडे पाहण्याचा दृष्टिकोण बदललेला नाही, ही खरी शोंकातिका आहे. अजूनही अशा स्त्रीयांना कमी लेखले जाते. धार्मिक, सामाजिक,
सांस्कृतिक, कौटुंबिक कार्यक्रमात, सण समारंभात जाणीवपूर्वक टाळले जाते. बारसे, हळदीकुंकू, ओटीभरण अश्या समारंभाच्या वेळी तिला बोलवत सुद्धा नाही. तिला बाजूला काढतात. कपाळावरील कुंकू हा तिचा लहानपणीपासून चा अधिकार काढून घेतला जातो. तिने काय घालावे, कसे राहावे, ह्यावरही बंधने येतात. खरे तर जोडीदार पुढे निघून जाण्याने ती आधीच खूप दुःखी कष्टी झालेली असते. पतीच्या जाण्यात तिचा काहीही दोष नसताना तिला पदोपदी अपमानीत व्हावे लागते.
खरं तर पत्नी ही “क्षणाची पत्नी, अनंतकाळची माता असते”, अस असताना तिला कमी का लेखले जाते ?
जोडीदाराच्या जाण्याचं दुःख तिला होत नसेल का ? उलट आता तिच्या जबाबदाऱ्या आणखी वाढलेल्या असतात. तिला आता दोनी भूमिका पार पाडायच्या असतात. म्हणून ती पुनः खंबीरपणे उभी राहते, कुटूंबाला सावरते. तिच्या धैर्याला उलट सलाम करायला हवा. हे काम आता महिलांनीच करायला हवे. आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी महिला असतील ज्यांनी जोडीदार नसताही आपली मुले घडविली आहेत. कुटूंब चांगल्या प्रकारे संभाळले आहे. अशा महिलांना विधवा न संबोधता “पतीनिष्ट” संबोधून तिचा गौरव करायला हवा.
आपण महिलांनीच महिलांचा मान राखायला हवा. अशी कौतूकाची थाप मिळता एखादीचा हुरूप आणखी वाढेल. एखाद्या जिजाऊच्या हातून एखादा नवा शिवबा घडेल.
चला, तर मग आजच्या महिलादिनी हा संकल्प करुया, अशा रणरागिणींचा सन्मान करूया.

– लेखन : आशा दळवी. दूधेबावी, जि.सातारा
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान लेख ,संकल्प आशा ताई
उज्वल भारताच्या जडणघडणीत ज्या श्रेष्ठ महिलांचा सहभाग आहे,त्यापैकी अनेकजणी विधवा होत्या. हा इतिहास लक्षात घेऊन महीलांचा उचित सन्मान होणे आवश्यक आहे.तथापि सामाजिक बंधनं याच्या आड येतात. या पार्श्वभूमीवर हा लेख अर्थपूर्ण वाटतं.