नमस्कार.
“ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत. मकरसंक्रांतीच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्यानंतर आबालवृद्धांनी एकत्र साजरा करायचा सण म्हणजे होळी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी येणारी धुळवड. “बुरा ना मानो होली है” हे या दिवसाचं ब्रीदवाक्य असतं. आनंद आणि उत्साह या दिवशी आपल्या ह्रदयात मुक्त संचार करून आपल्या हालचाली मधूनही व्यक्त होत असतात.
मित्रहो, होळीच्या सणाची अनेक हिंदी गाणी असली तरी आपण आज पहाणार आहोत होळीविषयीचं एक गाजलेलं मराठी गाणं. ही एक वेगळा बाज असलेली लावणी लिहिली आहे यादवराव रोकडे यांनी आणि शब्द आहेत –
खेळताना रंग बाई होळीचा …. होळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा
होळीच्या दिवशी रंग खेळायची ही जी काही धमाल असते त्याची मौज जर अनुभवायची असेल तर लहान मुलांसोबत, स्त्री पुरुष भेद विसरून आणि प्रौढांनीही आपला प्रौढपणा या दिवशी बाजूला ठेवून खुल्या दिलाने होळीचे रंग खेळले तर या रंगीबेरंगी आयुष्यातून दु:ख, चिंता या काही वेळासाठी तरी आपल्या आसपास फिरकत नाहीत. होळी खेळताना सर्वांगातून उत्साह नुसता ओसंडून वाहत असतो. ही युवती देखील बेभानपणे होळी खेळताना स्वतःचं भान हरपून होळी खेळत होती. मैत्रिणींपासून स्वतःचा बचाव करत असताना मैत्रिणींवर रंगानी भरलेली पिचकारी उडवायची पण त्याच बरोबर स्वतःचा बचाव करण्यासाठी होणाऱ्या पळापळीत अचानकपणे तिच्या लक्षात येतं कि अरेच्चा आपण वारा प्यायलेल्या वासरासारखं जीव तोडून पळतोय, मैत्रिणींसोबत दंगामस्ती करतोय पण आपली चोळी तर दंडावर फाटली आहे.
आम्ही मैत्रिणी घरी न सांगता गावाबाहेरच्या पटांगणात एकत्र जमून मस्तपैकी होळी खेळत होतो. दोन दोन च्या जोड्या करून एकमेकांच्या अंगावर रंग उडवण्याची काहीजणींची धडपड सुरू होती. त्या दोघी तिघींच्या मध्ये तिसरीच कोणीतरी येऊन सगळ्या़ंना भिजवून लांब पळून जात होती. मग तिच्यामागे आम्ही धावत जाऊन तिला भिजवत होतो. आमच्या सख्याहरीला आम्ही इकडे होळी खेळतोय हे कसं कळलं कुणास ठाऊक, तो त्याच्या मित्रांना घेऊन आला आणि आम्हाला त्याने अक्षरशः घेराव घातला. पुन्हा जोरदार चढाई करून त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी निकराचे प्रयत्न केले …. पण व्यर्थ…. त्यांनी आमच्यावर रंगांची उधळण केली. रंगांमुळे दिसणारे आमचे चित्रविचित्र चेहरे पाहून सगळेच टोळभैरव आमच्याकडे पाहून हसायला लागले. मला तर अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं….. मी खाली मान घातली आणि माझ्या पुन्हा एकदा लक्षात आलं…..माझी चोळी तर दंडावर फाटली आहे. ही गोष्ट लक्षात येताच मी माझा हात डाव्या दंडावर ठेवून तशीच उभी राहिले. तिथून पळून जाण्याचं मला सुचलंच नाही….पाय अगदी जमिनीला खिळून राहिल्यासारखी मी अवगंठून उभी राहिले.
झणी पाऊल अवघडलं
आणि काळीज धडधडलं
काय सांगू मी पुढलं
क्षणातच सारं घडलं
जीव झाला घाबरा भोळीचा ….. भोळीचा
मी मान खाली घालून उभी राहिले आणि. …. तिथेच नेमकी फसले. त्यांच्या हातातल्या रंगांनी भरलेल्या पिचकाऱ्या पाहून माझ्या काळजात धडधडायला लागलं. मी पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला खरा पण एका टारगट मुलानं माझे हात धरून ठेवले…. मग काय… आमच्या गावातला सख्या हरी सुवर्णसंधी थोडीच सोडणार ? त्यानं कुठले कुठले रंग माझा चेहऱ्यावर लावले ते त्याचं त्यालाच ठाऊक! त्यानं इतक्या क्षणार्धात माझ्यासह मैत्रिणींनाही होळीच्या रंगांनी रंगवलं कि आम्हाला काय करावं तेच सुचेना! त्याने रंग लावू नये म्हणून मी केलेल्या धडपडीत माझा जीव तर घाबराघुबरा झालाच पण चोळीचा कोना मात्र आणखीन थोडा फाटला.
मला काही समजंना
मला काही उमजंना
त्याला कोणी सांगेना
कुणाला तो ऐकेना
डाव साधला ऐनवेळीचा …. वेळीचा
माझ्या अंगावरच्या कपड्यांवरून वेगवेगळ्या रंगांचं पाणी निथळत होतं तर सख्याहरीनं धसमुसळेपणा करत चेहऱ्यावर रंग लावताना थोडासा रंग डोळ्यात जाऊन डोळे चुरचुरायला लागले. त्यामुळे मला काही समजतच नव्हतं. खरंतर आम्ही मैत्रिणींनी त्या मैदानातून पळून घरी जायला हवं होतं, पण पाय निघत नव्हता कारण आमच्याही अंगात होळीचा उत्साह संचारला होता. त्यामुळे या टोळभैरवांना कोणी काही सांगायला जात नव्हतं, तरीही काही मैत्रिणींनी त्याला सांगायचा प्रयत्न केला पण त्यांना आमचा हा नायक दाद देत नव्हता. काही असो, “होळीचा रंग लुटा रे” असं म्हणत आम्ही मैत्रिणी होळी खेळत होतो. पण होळीच्या दिवशी कोणीही कुणावर रागावून आनंदावर विरजण टाकायचं नसतं या गोष्टीचा फायदा घेऊन माझ्या सख्याहरीनं बरोब्बर आपला डाव साधला होता.
संगीतकार विठ्ठल चव्हाण यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली सुलोचना चव्हाण यांनी गायलेली ही लावणी ऐकताना नेहमीच पायांनी ठेका धरला जातो. मात्र अशोक हांडे यांच्या “मराठी बाणा” या कार्यक्रमात जेंव्हा जेंव्हा नृत्यासह हे गाणं सादर होत असे तेंव्हा तेंव्हा प्रेक्षक प्रेक्षागृह दणाणून सोडत असत.

– लेखन : विकास भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
वा छानच