जशास तसे !
अलिकडेच अकलूजचे जुने गाजलेले ‘ लक्ष भोजन ‘ प्रसिद्ध शंकरराव मोहिते – पाटील यांनी
” करंदीकर – बापट – पाडगावकर ” या कवींना कसा धडा शिकवला, त्याचा किस्सा वाचनात आला.
तो थोडक्यात असा :
करंदीकर – बापट – पाडगावकर हे गावोगावी कविता वाचनाचे कार्यक्रम करत असत. नंतर नंतर कार्यक्रमांची संख्या इतकी वाढली, की, त्या कार्यक्रमांचे काटेकोरपणे नियोजन करावे लागत असे. हे काम हे तिघे आळीपाळीनं करत असत.
एकदा बापट असं नियोजन करत असताना, अकलूजच्या साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक त्यांचा कार्यक्रम अकलूज येथे ठरवण्यासाठी आले. बापटांनी त्या कार्यकारी संचालकांचा, यांच्या कार्क्रमाची नियमावली दाखवून, दोनदा अपमान केला; आणि मग कार्यक्रम स्वीकारला.
कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव मोहिते – पाटील यांना तो अपमान झोंबला आणि त्यांनी बापटांना धडा शिकवण्याचं ठरवलं.
त्यांनी ती नियमावली बारकाईनं वाचून काढली.
कार्यक्रमासाठी आलेल्या त्रयीचं शंकररावांनी कुठलीही कसूर न ठेवता भरघोस स्वागत केलं.
रात्री कार्यक्रम करण्यासाठी त्रयी कार्यक्रमाच्या हॉल वर आली.
तेथे तर एकही श्रोता उपस्थित नव्हता !
‘ कार्यक्रम सुरु करा ‘ म्हणून शंकररावांनी फर्मावलं.
पण एकही श्रोता नसताना कार्यक्रम कसा सुरु करणार ? जवळच तमाशाचा फड रंगला होता. ते सर्व कानावर येत होते.
मग शंकररावांनी या तिघांना बजावलं; की, तुमच्या नियमावली प्रमाणे कार्यक्रम ठरला पाहिजे वगैरे. त्यात अनेक नियम आहेत, पण कार्यक्रमाला श्रोते उपस्थित हवेत, असा कुठलाही नियम आम्हाला दिसला नाही ! हे नामवंत तीनही कवी नरमले ! करंदीकरांनी मोकळ्या मनानं शंकररावांची क्षमा मागितली.
पाचच मिनिटांत, तमाशाचं सर्व ‘ पब्लिक ‘ कविता वाचनाच्या कार्यक्रमाला येऊन दाखल झालं.
… आणि हा कार्यक्रम पहाटे पर्यंत चढत्या श्रेणीनं रंगत गेला !
असाच एक आ. अत्रे यांचा किस्सा !
आ. अत्रे 1957 ते 67 या काळात मुंबई आणि महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. अत्रे अत्यंत हजरजबाबी म्हणून प्रसिद्ध होते.
त्या वेळेस ( जुन्या ) मुंबई – पुणे रस्त्यावरच्या वारंवार होणाऱ्या रहदारीच्या त्रासाबद्दल आणि अपघातांबद्दल चर्चा चालू होती.
तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण उत्तर देत होते.
त्यांनी सांगितलं की, अपघातग्रस्तांना मदत करता यावी म्हणून ठिकठिकाणी प्राथमिक उपचाराच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे कुठेही अपघात झाला तरी अगदी जवळच उपचाराची सोय उपलब्ध होऊ शकते.
त्यावर आ. अत्रे म्हणाले की, गेली वीस वर्षे आम्ही आमच्या गाडीने मुंबई – पुणे वारंवार प्रवास करत आहोत. पण आम्हाला एकही असं केंद्र दिसलं नाही.
त्यावर यशवंतराव म्हणाले की, सन्माननीय सभासदांनी एकदा आमच्या बरोबर आमच्या गाडीतून प्रवास करावा, म्हणजे आम्ही ही केन्द्रं त्यांना दाखवू.
यावर सभागृहात हास्य कल्लोळ झाला !
काही वेळानं दारूबंदीवर चर्चा सुरु झाली.
त्या वेळेस महाराष्ट्र राज्यात दारूबंदी लागू होती.
ही दारूबंदी कशी फसली आहे, याचे वाभाडे काढताना
आ. अत्रे म्हणाले की, मुंबई – पुणे प्रवासात गाडी कुठेही, कितीही थोडा वेळ थांबू दे. दोन चार मिनिटांत ‘ गरम पाणी ‘ ( हातभट्टीची दारू ) पाहिजे का? असं विचारणारे भेटतात.
त्यावर उत्तर देताना यशवंतराव म्हणाले की, आ. अत्रे यांच्या प्रमाणेच आम्हीही मुंबई – पुणे हा प्रवास गेली वीस वर्षे आमच्या गाडीनं करत आहोत. आमचीही गाडी किती तरी वेळा थांबली आहे; पण आम्हाला ‘ गरम पाणी ‘ पाहिजे का?’ असं कोणीही विचारलं नाही.
सभागृहात परत हास्य कल्लोळ झाला ! यावर हजरजबाबी अत्रे म्हणाले की, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी एकदा आमच्या गाडीतून हा प्रवास करावा, म्हणजे हे ‘गरम पाणी‘ वाले आम्ही त्यांना दाखवू ! या वर जो हास्य कल्लोळ झाला त्यात खुद्द यशवंतरावही सामील झाले !
आ. अत्रे आणि प्रा. ना. सी. फडके हे तसे समवयस्क. पण त्यांच्या ऐन तारुण्यात त्या दोघांच्यांत वाद झाले, आणि ते एकमेकांशी बोलेनासे झाले.
1968 साली प्रा. फडक्यांची पंचाहत्तरी आली. अत्रे आणि फडके या दोघांबद्दल अतीव आदर असणारे, आणि दोघांशी उत्तम व्यावसायिक संबंध असणारे प्रकाशक ग. पां. परचुरे आणि अन्य काही जणांनी पुढाकार घेऊन या दोघांच्यांत समेट घडवून आणला; आणि त्यांचं एकमेकांकडे जाणं येणं सुरु झालं.
प्रा. फडके पुण्यात तर अत्रे मुंबईत वास्तव्य करून होते. पण आ. अत्रे बहुधा दर आठवड्याला पुण्याला एक तरी फेरी मारत असत. साहजिकच अत्रे मग प्रत्येक भेटीत फडक्यांकडे जात आणि गप्पांचा फड रंगवत असत !
एकदा असाच गप्पांचा फड रंगवून अत्रे निघाले आणि निघताना म्हणाले की, अप्पासाहेब, पुण्याला आलो आणि तुम्हाला भेटलो नाही तर पाप केल्यासारखं वाटतं !
प्रा. फडकेही हजरजबाबी होते.ते लगेच म्हणाले की, बाबुराव, नाही तरी पाप न करण्याबाबत तुम्ही कुठे प्रसिद्ध आहात ?
प्रा. फडक्यांच्या या उत्तरावर कमलाबाई फडके, सुधाताई अत्रे आणि स्वत: आ. अत्रे खळखळून हसले !
स्वातंत्र्यपूर्व काळात, डी. एस. बखले ( I.C.S. म्हणजे हल्लीचं I. A. S. ) हे एक कार्यक्षम सनदी आधिकारी आणि जिल्हाधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. ते अत्यंत बुद्धिमान आणि ब्रिटिशांच्या तालमीत तयार झालेले असल्यामुळे वेळ आणि तत्सम गोष्टींबद्दल अत्यंत काटेकोर होते.
ते पुण्याला जिल्हाधिकारी असताना प्रा. श्री. म. माटे यांनी बखले यांना संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलावयाचं आणि शासनातर्फे काही उपयुक्त गोष्टी / सवलती त्यांच्या शिक्षण संस्थेच्या पदरात पाडून घ्यायच्या असं ठरवलं. प्रा. माटे हे बखले यांना भेटले, आणि रीतसर निमंत्रण दिलं.
अशा कार्यक्रमांना जायचं म्हणजे वेळेचा अपव्यय असं मानणाऱ्या बखले यांनी ते निमंत्रण तर नाकारलंच; पण अशा कामासाठी बाहेर माझा शिपाई आहे, त्याला पाहुणा म्हणून बोलवा; असं हेटाळणीच्या स्वरांत सांगितलं.
अस्सल पुणेरी बाण्याच्या प्रा. माटे यांनी, मी त्याला भेटूनच आपल्याकडे आलो आहे. त्यानं या गोष्टीला नकार दिला आहे, म्हणून तर मी आपल्याला विनंती करत आहे; असं ताबडतोब सांगितलं !
असं उत्तर आपल्याला मिळेल अशी अपेक्षा नसणारे बखले क्षणभर मनात चिडले; पण त्यांना प्रा. माटे यांच्या प्रसंगावधानाचं कौतुक वाटलं, आणि त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलं !
चाणाक्ष आणि धोरणी प्रा. माटे यांनी त्यांच्या मनात असलेल्या सवलती बखले यांच्याकडून प्राप्त करून घेतल्या, हे सांगायला नकोच !
पुढे हैदराबाद संस्थान पोलीस कार्यवाही होऊन भारतात सामील झाल्यावर पहिले मुलकी प्रशासक म्हणून केंद्रीय शासनानं बखले यांची नेमणूक केली. बुद्धिमान, शिस्तबद्ध, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष बखले यांनी फार थोड्याच काळात शासनाची घडी बसवली; असं प्रा. डॉ. न. गो.. राजूरकर यांचे त्या वेळेस शासकीय सेवेत असलेल्या वडिलांनी मला सांगितले होते.
दिवंगत दिलीपकुमार हा महान अभिनेता होता; पण चित्रपट निर्मितीत बारीक सारीक गोष्टीतही तो त्याची मनमानी करत असे !
कोईम्बतूरच्या एस. एम. एस. नायडू या निर्मात्यानं 1955 साली त्याला प्रमुख भूमिकेत घेऊन ‘ आझाद ‘ या चित्रपटाच्या निर्मितीस प्रारंभ केला. त्या वेळेस दिलीपकुमारला एका चित्रपटाचे पन्नास / साठ हजार रुपये मिळत असत; अशा वेळी, या नायडूनं त्याला एक लाख वीस हजार रुपये देऊ केले. अट एकच; दिलीपकुमारनं सलग महिनाभर कोईम्बतूरला येऊन राहायचे आणि दररोज चित्रिकरण करायचं.
दिलीपकुमारला पन्नास / साठ हजार रुपये हे संपूर्ण चित्रपटाचे मिळायचे; ते ही हप्त्या हप्त्यानं, एक दीड वर्षात. इथे तर केवळ एका महिन्यात एक लाख वीस हजार रुपये !
दिलीपकुमारचे डोळे लकाकले ! त्यानं देकार स्वीकारून कोईम्बतूरला प्रयाण केलं. तेथे नायडूनं त्याची राहण्याची, खायची –- प्यायची, स्टुडीओत नेण्या — आणण्याची चोख व्यवस्था केली. पण नायडू दररोज सकाळी 6 वाजता ‘ कॉल टाईम ‘ देऊन रात्री दहा वाजेपर्यंत काम करून घ्यायचा. दिलीपकुमारसारख्या मुंबईच्या कलाकारांना स्टुडीओत आरामशीर येणं, आपापल्या पद्धतीनं तयार होणं, ‘ मूड नाही ‘च्या नावाखाली चित्रिकरणास नकार देणं; अशा गोष्टींची सवय होती. ते स्वत:च्या मर्जीनं सगळ्या गोष्टी पार पाडत.
येथे हा प्रकार नव्हता. दररोज 16 / 16 तास काम करावंच लागे. ‘ मूड नाही ‘ असं म्हटलं की, करारात ‘ मूड असेल तर काम करेन ‘ असं कलम नसल्याचं निर्मात नायडू दाखवून देई; आणि सपाटून काम करून घेई. बरोबर एक महिन्यात त्यानं चित्रपट पूर्ण केला.
केवळ पाच – सात लाख रुपयांत निर्मिती केलेल्या या चित्रपटानं जवळ जवळ एक कोटी रुपयांचा गल्ला जमा केला !
जाता जाता …
या नायडूसारखाच आणखी एक देकार दिलीपकुमारला 7 वर्षांनी तत्कालीन मद्रासच्या ‘ ए. व्ही. एम. ‘ या संस्थेकडून आला.
त्यांनी तर दिलीपकुमारला प्रत्यक्ष पारिश्रमिक आणि वितरणाचे हक्क मिळून बावीस लाख रुपये देऊ केले.
1961 साली एका अभिनेत्याच्या दृष्टीनं ही रक्कम प्रचंड होती ! अट तीच. मद्रासला सलग एक महिना राहून चित्रपट पुरा करायचा.
नायडूनं महिनाभर दररोज केलेले ‘ हाल ‘ दिलीपकुमार विसरला नसल्यामुळे त्यानं तात्काळ तो ‘ ए. व्ही. एम. ‘ चा देकार नाकारला !
‘ ए. व्ही. एम. ‘ चा हा चित्रपट होता ‘ मै चूप रहूंगी ‘ !वरती डी. एस. बखले यांचा उल्लेख आला आहे.
हैदराबाद संस्थान पोलीस कार्यवाही होऊन भारतात सामील झाल्यावर पहिले मुलकी प्रशासक म्हणून केंद्रीय शासनानं बखले यांची नेमणूक केली. बुद्धिमान, शिस्तबद्ध, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष बखले यांनी फार थोड्याच काळात शासनाची घडी बसवली; असं प्रा. डॉ. न. गो.. राजूरकर यांचे त्या वेळेस शासकीय सेवेत असलेल्या वडिलांनी मला सांगितले होते.
– लेखन : प्रकाश चान्दे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️9869484800