कवी तथा निवृत्त दूरदर्शन निर्माते श्री दीपक शेडगे यांच्या “स्पर्श” काव्यसंग्रहाचे प्रकाशन समारंभ नुकतेच मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरमधील पु.ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार श्री. दिनकर गांगल होते.
याप्रसंगी बोलताना महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सचिव श्रीमती मीनाक्षी पाटील म्हणाल्या,
“दीपक शेडगे यांना यापूर्वी मी प्रत्यक्षात कधीही भेटले नाही परंतु त्यांच्या कवितेतून मी त्यांना प्रथम भेटले आणि प्रभावित झाले. त्यांच्या कवितेला दृश्यमयता व चित्रमयता लाभल्याने ती कविता आव्हानात्मक झालेली आजची आधुनिक कविता आहे”. ही कविता जबरदस्त असून ‘स्पर्श’ नंतरच्या कविता त्यांनी लवकरच प्रकाशित करुन साहित्य रसिकांना आपल्या कवितांचा नजराणा बहाल करावा असे आवाहनही त्यांनी केले.
दीपक शेडगे यांच्या “‘स्पर्श’ काव्यसंग्रहातील कवितांमध्ये लौकिक किंवा भौतिक स्पर्श तर आहेच पण आदिभौतिक अशा स्वरुपाचा सुध्दा स्पर्श आहे जो अंतःकरणाला व आत्म्याला झालेला स्पर्श आहे. त्यामुळे आज १९८१ नंतर ४२ वर्षांनी स्पर्शची तिसरी आवृत्ती वाचतानाही त्यातील कविता तेवढ्याच नवीन वाटतात. कारण काळाला पालाण घालून या कवितेने आपलं सत्व अबाधित ठेवलेलं आहे” असे उद्गार सुप्रसिध्द कवयित्री डॉ.सिसिलिया कार्व्हालो यांनी यावेळी बोलताना काढले.
यावेळी इतर वक्त्यांनी ही समयोचीत मनोगते व्यक्त केली.
सर्व वक्त्यांच्या मताशी आपण सहमत असल्याचे सांगून “स्पर्श” मधील कविता विलक्षण ताकदीच्या वाटल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिनकर गांगल यांनी व्यक्त केले. दीपक शेडगे यांनी स्पर्श नंतरच्या अप्रकाशित
कविता सत्वर प्रसिध्द कराव्यात असेही सुचविले.
दीपक शेडगे, राजीव चुरी व उत्तरा मोने यांनी यावेळी दृकश्राव्य माध्यमातून कवितांचं सादरीकरण केले.
अक्षर चित्रकार कमल शेडगे यांच्या कलाकिर्दीची गौरवगाथा सांगणाऱ्या दीपक शेडगे लिखित दीपक पाटेकर यांनी स्वरबध्द केलेल्या व विद्या करलगीकर यांनी गायिलेल्या काव्यगीताचे लोकार्पण करुन कमल शेडगे यांना यावेळी मानवंदना देण्यात आली. यावेळी प्रेक्षकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमास मान्यवर, रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800