८० च्या घरात असूनही, तरुणांना लाजवेल, असे कार्य करणारे, प्रचंड मराठी प्रेमी, साहित्यिक, कलाकार, चित्रकार, संपादक आणि आपल्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टल वर नियमित लेखन करणारे, हरहुन्नरी असे इंदूर येथील श्रीकृष्ण बेडेकर यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.
महाराष्ट्राबाहेर राहून ही मराठी भाषा, साहित्य, कला या साठी आपण दिलेल्या योगदानाची योग्य कदर केली जात नाही, याची खंत ते सतत बोलून दाखवीत असत. गेल्याच आठवड्यात त्यांनी फोन करून तब्येत बरी नसल्याचे सांगितले होते. त्यांच्या बोलण्यावरून ते इतक्यात जातील, असे अजिबात वाटत नव्हते. मी त्यांना म्हणालोही, आपण आपले कार्य, आपल्याला आनंद मिळतो, म्हणून करीत राहायचे. मिळाले पुरस्कार, घेतली कुणी दखल तर तो बोनस समजायचा. असो.
अल्प परिचय
श्रीकृष्ण बेडेकर यांची उत्तम कवी, रांगोळीकार, गझलकार, संपादक, साहित्यिक, आयोजक, मराठीत नव्या शब्दांची भर घालणारे आणि सुलेखनकार अशी ओळख होती.
आंतरदेशीय पत्रावर “पत्रसारांश” नामक नियतकालिक चालवण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी राबवला होता. यात त्यांना अनेक साहित्यिकांची साथ मिळाली. ते संपादित करीत असलेला “शब्ददर्वळ” दिवाळी अंक व या अंकातील संपादकीयच्या ऐवजी असणारे “संतापकीय” अत्यंत लोकप्रिय असे. त्यांच्या पत्रसारांश प्रतिष्ठान तर्फे दोन उत्कृष्ट दिवाळी अंकांना दरवर्षी पुरस्कार दिले जात असत.
कवितांच्या आकृतीबंधा विषयी ही ते फार आग्रही असत. गेल्या वर्षीच त्यांनी वृत्तबद्ध कवितांना पुरस्कार जाहीर केले व ते दिले सुद्धा. नंतर या पुरस्कारप्राप्त कविता त्यांनी त्यांच्या दिवाळी अंकातही समाविष्ट केल्या.
बेडेकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या सुहृदानी तयार “इत्थंभूत” हा संग्राह्य ग्रंथ तयार केला होता.पण या गौरवग्रंथाचे प्रकाशन कोविडमुळे रखडल्या गेले. ते प्रकाशन गतवर्षीच पुण्यात झाले.
काळाची पावलं ओळखून ते सोशल मीडिया चा उत्कृष्ट वापर करायला शिकले होते. त्यामुळे या वयातही ते नव्या पिढीशी आणि जगभरातील रसिकांशी सहजपणे जोडल्या गेले होते.
मराठी शुद्ध लेखनासाठी त्यांचा फार आग्रह, अट्टाहास असे. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली.

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800