मुंबई बॉम्ब स्फोट
१२.०३.१९९३.
बरोब्बर ३० वर्षे पूर्ण झालियेत. पण आयुष्यात मी कधीच १२ मार्च ही तारीख, हा दिवस आणि नुसता दिवसच नाही, तर रात्रही कधी विसरू शकत नाही.
खरं म्हणजे त्या सुमारास मी जिल्हा माहिती अधिकारी, रायगड – अलिबाग म्हणून कार्यरत होतो. वर्ष भरापूर्वीच दूरदर्शन सोडून माहिती खात्यात आलो होतो. त्याला एक महत्वाचे कारण होते, ते म्हणजे मुंबईत राहणे, म्हणजे नोकरी मुंबईत करणे आणि डोंबिवलीत राहणे, लोकलने जाणे येणे करणे मला भयंकर जिकिरीचे वाटत असे. असो….
तर ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिद पाडल्यावर काही काळाने मुंबईत दंगली उसळल्या. माझा दूरदर्शन मधील पूर्वानुभव लक्षात घेऊन मला तत्कालीन मुख्यमंत्री श्री सुधाकरराव नाईक साहेब यांच्या टिव्ही कव्हरेज कोऑर्डिनेशन ची जबाबदारी तर माझे सहकारी, तत्कालीन जिल्हा माहिती अधिकारी, सातारा
श्री अजय अंबेकर यांच्याकडे वृत्तांकनाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. माहिती महासंचालक श्री अरुण पाटणकर साहेब होते. तर माहिती संचालक श्री प्र स महाजन साहेब होते.
दरम्यान ६ मार्च १९९३ रोजी सत्तांतर झाले.
श्री सुधाकरराव नाईक साहेब जाऊन श्री शरद पवार साहेब मुख्यमंत्री झाले होते.
नाईक साहेब दुपारी १ ते ३ अशी विश्रांती घेत. त्यावेळी मी व अजय असे आम्ही दोघेही व्ही टी स्टेशन समोर असलेल्या स्टाफ कॉलेज मध्ये रहात होतो. त्यामुळे दुपारी १ वाजता आम्ही स्टाफ कॉलेजमध्ये जेवायला जात असे व विश्रांती घेऊन परत दुपारी ३ वाजता मंत्रालयात परतत असू.
रोजच्या प्रमाणे त्या दिवशीही, म्हणजेच १२ मार्च १९९३ रोजी आम्ही स्टाफ कॉलेज ला आलो. जेवलो आणि दुपारी तीन वाजता मंत्रालयाकडे निघालो.
स्टाफ कॉलेज च्या बाहेर पडताच बघतो तर काय, झुंडी च्या झुंडी व्ही टी स्टेशन कडे निघालेल्या होत्या. काय झाले, काही कळत नव्हते. एरव्ही संध्याकाळी ६ वाजता दिसणारे दृश्य भर दुपारी तीन वाजताच दिसत होते. न राहवून आम्ही, एकाला थांबवून विचारले, क्या हुआ है ?
आप सब लोग इतने जलदी क्यू जा रहे हैं ? तर त्याने सांगितले, भैया, बंबई मे जगह जगह बॉम्ब ब्लास्ट हो रहे हैं. सब ऑफिसेस को छोड दिया हैं. हे ऐकताच काही तरी भयंकर आपल्या पुढे वाढून ठेवले आहे, याची आम्हाला जाणीव झाली. घाईघाईतच आम्ही मंत्रालयात पोहोचलो.
आधी वृत्त शाखेत गेल्यावर काही ठिकाणी बॉम्ब स्फोट झाल्याचे तिथे कळाले. मुंबईभर प्रचंड भीतीचे, तणावाचे, वातावरण निर्माण झाले असून, मुख्यमंत्र्यांनी तातडीने विविध विभागांच्या बैठका घेणे सुरू केले असल्याचेही कळाले. अधिक वेळ न दवडता आम्ही ताबडतोब सी एम ऑफिस ला पोहोचलो.
परिस्थिती नॉर्मल करण्यासाठी काय काय करायला पाहिजे, तातडीच्या उपाय योजना, अन्य निर्णय यासाठी मुख्यमंत्री पवार साहेब फटाफट वेगवेगळ्या विभागांच्या बैठका घेत होते. सर्वांचे ऐकून त्यांना अतिशय सुस्पष्ट निर्देश देत होते.
या बैठकांच्या मधला थोडा वेळ पाहून आम्ही मुख्यमंत्र्यांचे “सर्व जनतेला उद्देशून शांतता राखण्याचे आवाहन” टिव्ही साठी रेकॉर्ड केले.
लगेच ती कॅसेट घेऊन मी दूरदर्शन केंद्र संचालकांना भेटायला गेलो. पण नेमके तेव्हा ते नव्हते. कॅसेट चे महत्व रामू ला (दूरदर्शन केंद्र संचालकांचे पी ए)
सांगून, तसेच हे आवाहन दूरदर्शन वर परत परत प्रसारित करण्याची गरज सांगून मी मंत्रालयात परतलो. त्यावेळी दूरदर्शन ला पर्याय नव्हता. अन्य खाजगी वाहिन्या कुठल्याच नव्हत्या.
भूक तहान विसरून आम्ही काम करत होतो. रात्री अकरा वाजता सर्व काम संपल्यावर भुकेची जाणीव झाली. तेव्हा पद्माकर कायदे साहेबांकडे उपसंचालक वृत्त पदाचा कार्यभार होता. कॅन्टीन मॅनेजर कोलते हे त्यांचे मित्र होते. त्यामुळे त्यांच्यामुळे, त्यांच्या सोबत रात्री अकरा वाजता चहा मिळाला. किती लिहू नी किती नको ?

– लेखन : देवेंद्र भुजबळ.
निवृत्त माहिती संचालक. ☎️ 9869484800
१९९३ ची मुंबई बॉम्बस्फोटाची दु;खद आठवण. आम्ही दूरदर्शनवर तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे आर्जवी पण स्पष्ट आवाहन ऐकले होते.मात्र या दुर्घटनेचे साक्षीदार होण्याचा अनुभव वाचून ती सारी भयावह कहाणी चित्रपटासारखी डोळ्यासमोर येते.
अविस्मरणीय आठवण सर