आज जागतिक ग्राहक दिन आहे. या निमित्ताने
ग्राहक जागृती बाबत हा विशेष लेख…
– संपादक
अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये 15 मार्च 1962 साली तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी ग्राहकांच्या हक्काविषयी भाष्य केले होते. ग्राहकांच्या हितासाठी बोलणारे ते पहिले नेते ठरले होते.
ग्राहक हक्कासाठी चळवळ चालविणाऱ्या लोकांनी 1983 मध्ये पहिल्यांदा जागतिक ग्राहक दिन साजरा केला. तेव्हा पासून जागतिक ग्राहकदिन हा आंतराष्ट्रीय पातळीवर 15 मार्च रोजी साजरा केला जातो.
ग्राहक हक्क कायद्यानुसार ग्राहकांचे हक्क पुढील प्रमाणे आहेत.
सुरक्षेचा हक्क –
सुरक्षित वस्तू खरेदी हा ग्राहकाचा हक्क आहे. आपण जेव्हा एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा त्या वस्तूंच्या सुरक्षिततेची सर्व जबाबदारी ही उत्पादकाची असते. विक्रेत्याने नेहमी उच्च गुणवत्ता असलेल्या वस्तूंची विक्री करावी. काही तक्रार जाणवत असल्यास कंपनीकडे तक्रार करावी. ग्राहकांनी देखील गुणवत्ता पूर्ण वस्तूंची खरेदी करावी. यात ISI मार्क चिन्ह असलेली आणि ISO प्रमाणित असलेल्या वस्तू वापराव्यात. वस्तूंची गुणवत्ता आणि त्यासोबत मिळणाऱ्या सेवांबाबत माहिती मिळविण्याचा अधिकार ग्राहकांना आहे.
निवड करण्याचा हक्क –
ग्राहकाला कोणत्याही कंपनीच्या उत्पादनाची निवड कारण्याचा हक्क आहे. बाजारात गेल्यानंतर जर विक्रेता तुम्हाला एकाच ब्रँडची वस्तू घेण्याचा आग्रह करत असेल तर तुम्ही त्याच्या विरोधात तक्रार करू शकता.
माहिती मिळण्याचा हक्क –
ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकाला उत्पादनाशी निगडीत सर्व माहिती जसे की, उत्पादनाची गुणवत्ता, प्रमाण, किंमत, शुध्दता, एक्स्पायरी डेट या सर्वांबाबत माहिती मिळण्याचा हक्क आहे.
मत मांडण्याचा अधिकार –
या कायद्यानुसार ग्राहकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. ग्राहकाने विकत घेतलेल्या वस्तूमध्ये काही बिघाड झाला असल्यास किंवा वस्तू खराब असल्यास त्याच्या विरोधात मत मांडण्याचा हक्क ग्राहकाला आहे. जर ग्राहकाला आपली फसवणूक झाली असे जाणवत असेल तर त्या व्यवसायिक किंवा कंपनीची तक्रार ग्राहक मंचात करता येते.
तक्रार आणि निवारण करण्याचा हक्क –
फसवणूक झाल्यास उत्पादन असो, व्यवसायिक असो किंवा कंपनी विषयी तक्रार असो ग्राहक याबाबत कायद्यांतर्गत तक्रार करू शकतो. ग्राहक मंच किंवा ग्राहक तक्रार निवारण केंद्राला त्या तक्रारीचे निराकरण करावे लागते.
ग्राहक शिक्षणाचा हक्क –
ग्राहकाला आपल्या हक्कांविषयी जागरूक करण्यासाठी सरकारद्वारा विविध उपक्रम राबविले जातात. यात जागो ग्राहक जागो, तसेच शिबीर आणि कार्यशाळा घेतल्या जातात. ग्राहकांची फसवणूक न होता त्यांना त्यांच्या हक्कांची माहिती व्हावी यासाठी हे उपक्रम राबविण्यात येतात. या अंतर्गत ग्राहक कायद्याचे शिक्षण घेण्याचा अधिकार ग्राहकाला आहे. ग्राहकांच्या हक्कांच्या सुरक्षितेतेसाठी देशात हेल्पलाईन सुविधा आहे. ग्राहकांची फसवणूक झाल्यास ग्राहक राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन 1800114000 या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदवू शकतात.
आपणा सर्वांना जागतिक ग्राहकहक्क दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!

– संकलन : दादाभाऊ केदारे. राष्ट्रीय अध्यक्ष
ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती, नाशिक.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800