खऱ्या कलाकारासाठी नाव, कीर्ती, पैसा या गोष्टी दुय्यम असतात. थोर चित्रकार वासुदेव गायतोंडे यांची चित्रे पाहून आणि त्यांचा संघर्ष पाहून आपल्याला हे उमजले, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिल्पकार अरुणा गर्गे यांनी केले. त्या सर ज जी कला महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, कलाकाराने आपले प्रत्येक काम दर्जेदार होईल, या कडे सतत लक्ष दिले पाहिजे.
मनाप्रमाणे काम होईस्तोवर ते करत राहायला हवे. सार्वजनिक ठिकाण चे काम, खाजगी कामापेक्षा खूप आनंद देणारे असते. कारण ते सर्व सामान्य लोक पाहून सतत आनंद घेत असतात, असे सांगून त्यांनी पुढच्या वर्षी त्यांच्या स्टुडिओ ला १०० वर्षे पूर्ण होत आहेत, त्याचे सर्वांना निमंत्रण दिले.
ज्येष्ठ चित्रकार उदय घरत यांनी स्व अनुभव सांगून सर्व विभागाच्या विद्यार्थ्यासाठी एक असाईंमेट कॉमन असावी अशी सूचना करून डिझाईन ही कधीही न संपणारी विचारधारा आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ चित्रकार प्रा दिलीप रानडे म्हणाले, मी कला शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून आज उपस्थित आहे. सर्व भूतकाळ डोळ्यापुढे येतोय. हे जिवंत पणाचे लक्षण आहे. येथील शिल्पांशी संवाद सुरू झाल्यावर त्यांचे गूढ उकलत गेले. ब्रश, रंग, कॅनव्हास शी एक भावनिक नाते निर्माण होते. रंग छटांचा विस्तृत पट निर्माण होते. भाव रूप प्राप्त होते. हे आर्ट स्कूल चे मोठे श्रेय आहे. येथे दृष्टिकोन विस्तृत होतो.
एकाच मॉडेल चे ४० जणं वेगवेगळी चित्रं काढतात. पुढे व्यवसायात संधी मिळेल, असे नाही. इथे आहे, तो पर्यंत फायदा घ्या, असे आवाहन करून त्यांनी तंत्रज्ञानात खुप बदल होत आहेत पण विचारधारा कायम राहिली पाहिजे. कॉम्प्युटर निषिद्ध नाही पण त्याचे कलाकृतीत स्थान काय ? याचा विचार झाला पाहिजे. तंत्रज्ञान वापरतो, त्याचा ऊद्देश काय ? या कडे लक्ष वेधले.
अधिष्ठाता प्रा विश्वनाथ साबळे यांनी प्रारंभी अहवाल वाचन केले. विद्यार्थ्याची गरज ओळखून काम करण्यासाठी संशोधनावर भर दिला, त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात विविध विभागातील पुरस्कार विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार करण्यात आले.
या संमेलनास विविध मान्यवर, प्राध्यापक, कलाकार, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तत्पूर्वी सर्व मान्यवरांच्या हस्ते वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. हे प्रदर्शन १९ मार्च २०२३ पर्यंत पाहण्यासाठी खुले आहे.

– लेखन : देवेंद्र भुजबळ
☎️9869484800