Friday, December 26, 2025
Homeसाहित्यपुस्तक परिचय

पुस्तक परिचय

“नागपंचमीचे शिराळा : ऐतिहासिक दृष्टिक्षेप”
इंग्लंड मधल्या एका दैनिकाच्या पत्रकाराची अलीकडे ईमेल वरून ओळख झाली. आपण इतिहासाचे प्राध्यापक असून हौस म्हणून एका दैनिकात स्थानिक इतिहासाचे लेखन करतो असे त्याने सांगितले. अशा प्रकारचे स्थानिक इतिहासाचे संशोधन करण्यासाठी प्राध्यापकाची नियुक्ती होते हे ऐकून तेव्हा खूप आश्चर्य वाटले होते.

पत्रकारितेचा प्राध्यापक आणि पत्रकार या नात्याने मी या गोष्टीचा विचार केला तेव्हा स्थानिक इतिहास शिकविणारे इतिहासाचे प्राध्यापक दैनिकासाठी खूप महत्त्वाचं काही करू शकतील असं तेव्हा वाटलं होतं. आपल्याकडे असा उपक्रम केला पाहिजे असा देखील विचार डोक्यात येऊन गेला.

विश्वासराव नाईक कला वाणिज्य आणि बाबा नाईक विज्ञान महाविद्यालय या सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील संस्थेच्या प्राध्यापकांनी लिहिलेले “नागपंचमीचे शिराळा : ऐतिहासिक दृष्टिक्षेप” या शीर्षकाचे पुस्तक अलीकडे वाचायला मिळाले. तेव्हा प्रा. डॉ. तानाजी रा. हवलदार यांनी या कल्पनेचा जणू एक आदर्श नमुनाच करून दाखविला आहे हे जाणवलं. इतिहासाच्या गावोगावच्या प्राध्यापकांनी मनावर घेतले तर पत्रकारितेसाठी आणि इतिहास लेखनासाठी केवढे मोठे काम होईल असा विचार मनात नक्की आला.
परमपूज्य स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्था या शिराळाच्याच संस्थेने हे काम तडीस नेले. याबद्दल प्रकाशक श्री विश्वप्रताप सिंग भगतसिंग नाईक यांचे कौतुक तर केले पाहिजेच पण अभिनंदन देखील केले पाहिजे.

इतिहासाची साधने तुटपुंजी आहेतच, पण त्याचा बाऊ न करता प्रा हवलदार यांनी तथ्य संकलन केले. अत्यंत तटस्थपणे, वस्तुनिष्ठ असे लेखन केले आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याच्या गावी किमान एक तरी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील इतिहासाच्या प्राध्यापकाने अशा प्रकारचे इतिहासाचे संकलन आणि लेखन केले तर एवढा मोठा इतिहासाचा धांडोळा घेतला जाईल !

प्रा हवलदार यांनी स्वाभाविकपणे नागपंचमी हा विषय आपल्या सखोल संशोधनासाठी हाती घेतला आहे. प्राचीन काळापासून नागपूजा आणि नागपंचमी
सणाबाबतच्या कथा, शिराळा येथील नागपंचमीचे प्राचीनत्व, नागपंचमीचे प्राचीनत्व, नागपंचमी साजरी करण्याची पद्धत, नागपंचमी व्रत, नागपंचमी बाबतचे गैरसमज व पर्यावरण प्रेमींची भूमिका, स्थानिक नागमंडळ, 32 शिराळातील नागपंचमीचे पुरावे आणि मुख्य म्हणजे सविस्तर संदर्भ ग्रंथ सूची त्यांनी सादर केली आहे. अति प्राचीन काळातील पौराणिक ऐतिहासिक सामाजिक दाखल्या पासून संदर्भ हवलदार यांनी मांडले आहेत. कुणाही अभ्यासकाला संदर्भ हवा असेल तर या १२८ पानी ग्रंथाचा आधार घ्यावा लागेल.

मुंबई हायकोर्टाने वर्ष २००२ निर्णय दिल्यानुसार 32 शिराळा येथे जिवंत नागांना जंगलातून पकडणे, त्यांचे खेळ सादर करणे आणि ते परत जंगलात सोडून देणे यावर आता बंदी आहे. खूप प्राचीन काळापासून सुरू असलेला, गावाचे जगभर नाव केलेला उत्सव बंद झाल्यामुळे शिराळा गाव दुखावले आहे. जागतिक स्तरावरच्या दैनिकात आणि नियतकालिकात वर्षानुवर्ष प्रसिद्ध होत असलेली नागपंचमीची वार्षिक यात्रा आता तशा पद्धतीने प्रसिद्ध होत नाही. उत्सव तितका होत नाही. पर्यटन नाही. परिसरातील व्यवसायावर आलेल्या संकटामुळे हतबल झालेला गावकरी याविषयी वाचायला/ऐकायला मिळतं. मात्र अजूनही स्थानिक धुरीण आपले प्रयत्न सोडायला तयार नाहीत.

माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्य पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अलीकडे दिलेल्या आश्वासनांची देखील नोंद लेखकाने घेतली आहे.स्थानिक इतिहास याविषयीच्या घटनांचा शोध घ्यायचा असेल तर इतिहासाच्या स्थानिक प्राध्यापकांनी असे संशोधन केले पाहिजे. चालू घडामोडीच्या लेखनासाठी इतिहास संशोधनाची शास्त्रीय बैठक ठेवून वर्तमानपत्रांनी माहितीचे संकलन केले तर त्या बातम्यांना एक वेगळेच परिमाण लाभेल. बातम्यांची विश्वासार्हता वाढेल सध्या सोशल मीडियावर हवेत बाण मारण्याची प्रवृत्ती वाढलेली दिसते, तिच्यावर निश्चितपणे प्रतिबंध घालता येईल, या दृष्टीने जिल्हा आणि प्रादेशिक पातळीवरील दैनिकांनी अशा इतिहासाच्या प्राध्यापकांच्या सेवेचा लाभ घ्यावा असे वाचक आणि पत्रकारितेचा सेवानिवृत्त प्राध्यापक या नात्याने मला नक्की वाटते.

प्रा. डॉ. किरण ठाकूर

– परीक्षण : प्रा डॉ किरण ठाकूर. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”