Thursday, September 18, 2025
Homeसाहित्यकविता दिनाच्या कविता...

कविता दिनाच्या कविता…

आज 21 मार्च. जागतिक कविता दिन आहे. त्यानिमित्ताने कवितेला काही कविता पुढे देत आहे.
कविता दिनाच्या सर्व कवींना हार्दिक शुभेच्छा.
-संपादक
1) शब्द

शब्द ल्याले अलंकार
शब्द धरतात ताल
शब्द पकडती लय
त्यास म्हणावे रे काव्य

शब्द खेळतात रंग
शब्द आशयात दंग
शब्द थोडे भाव दिव्य
त्यास म्हणावे रे काव्य

पक्षी अक्षरे भरारा
उडे गगनी पसारा
गमे खग पट भव्य
मज सुंदरसे काव्य

सुनील देशपांडे

– रचना : सुनील देशपांडे. नाशिक

2) काव्य-खुणा

शब्दांच्या या गावा
कवितेचाअसे गाळा
शब्द वेचता कवी
फुले कवितेचा मळा

निरव शांततेचा भास
शब्द धुंद असे मनी
पाहता जाईचा कुंज
शब्द वाटे त्यास कामिनी

आर्त स्वप्न उरी बाळगावी
काव्य लोचने सजलेली
गंध शब्दांत शोधतो
ओठातून गीत-कविताओघळलेली

लोपतील प्रथम काव्य खुणा
चारोळ्या सजतील पुन्हा
कविता करतो कवी
का ? ठरतो तो गुन्हा

शब्द सरीतेचा तो दास
कवितेत आहे सरस्वतीचा वास
उलथून टाकी ही सृष्टी
लेखणीत त्याच्या काव्यनिवास

आस

– रचना : आस. मुंबई

3) कविता…

कविता म्हणजे जणू शब्दांची रांगोळी,
अचानक सुचलेल्या, गाण्याच्या ओळी,
क्वचितच गवसली, सोनेरी मासोळी,
कष्टकरी घामांची, कधी सारणांची मोळी,

कविता म्हणजे आहे पहाटेचं स्वप्न,
सुर तालांमध्ये कुणी मोहरून मग्न,
नाही वेळ भान, म्हणे नको आता विघ्न,
मी तुझा नी तू माझी, नको कुणी अन्य,

कविता, कधी होते,पेटता निखारा,
रक्त पेटविते, भग्न, करते निवारा,
वाण घेऊन ते हाती, प्राण क्रांतीसाठी,
वेदना घेऊन, गीत येत असे ओठी,

मातीच्या ध्यासाची आहे कवितेला आण,
कविताच, नवं जग, करते निर्माण,
सारे काही पचविते, जणू आहे माय,
पोसते नी जोपासते, संस्कारांची साय..!!!

हेमंत भिडे

– रचना : हेमंत भिडे

आज २१ मार्च ‘जागतिक कविता दिन’ यानिमित्ताने मी “अशी असावी कविता” ही कविता लिहिली आहे. ही कविता अष्टाक्षरी असुन प्रत्येक ओळीत आठ अक्षरे, दुसर्‍या व चौथ्या ओळीत शेवटी यमक आणि पाच कडवे, प्रत्येक कडव्याची सुरुवात ‘अशी असावी कविता’ या ओळीने सुरुवात होते. शिवाय प्रत्येक ओळ दोन अक्षरी शब्दांने सुरुवात होते.तर अशी अष्टाक्षरी नियमाने बांधलेली कविता आपणास जागतिक कविता दिनास सप्रेम भेट.
(काही ओळीत जोडाक्षरे आली आहेत. तेंव्हा जोडशब्द स्वतंत्र न मोजता तो एककामध्ये धरुन आठ अक्षरे धरावीत.)

अष्टाक्षरी कविता

४) अशी असावी कविता

अशी असावी कविता
साज नित नवा हवा
सुर गवसता कवी
पक्षी होवुन उडावा ॥१॥

अशी असावी कविता
मज मिलनाची आस
खरं प्रेम समजता
फुले आरती सरस ॥२॥

अशी असावी कविता
भाषा खेळता बहर
नशा चढावी कविता
भाषा नाचावी बहर ॥३॥

अशी असावी कविता
मज जगणे सुलभ
येता गंध कवितेचा
श्वास ही होवो सुलभ ॥४॥

अशी असावी कविता
प्रेम रोज माझे फुले
शब्द ओंजळीत घेता
काव्य होवुनी फुलले ॥५॥

पंकज काटकर

– पंकज काटकर. काटी, जि. उस्मानाबाद

5) शब्दांचे ईश्वर तुम्ही शिल्पकार अक्षरांचे |
चित्रण भाव भावनांचे हे वैशिष्ट्य काव्याचे ||
क्रांतीची तुम्ही ज्वाला दूत तुम्ही शांतीचे |
किती किती गुण गाऊ मी तुम्हा कवींचे ||

प्रवीण देशमुख

– रचना : प्रवीण देशमुख. कल्याण

6). मोती दाणे … तावावर…..!

कसं येतं गाणं पहा .. ओठांत कळे ना बाई
जात्यावर दळतांना आपसुक गाते आई..
अशी लागते हो लय,मोती सांडतात पहा
मन म्हणते बाई तू , फक्त लिहितच रहा…

केंव्हा काय येई ओठी, मुळी जाणत नसते
एक मात्र खरे आहे, खरी कविता असते
वेळ काळाचं गणित, कळतचं नाही तिला
हात धरून कायम, असते हो संगतीला..

पानातून पाऊस तो, तशी लागते ती गळू
धुक्यातून अधांतरी, पहा लागते ती पळू
नक्षत्रेच होते पहा, कधी बने चंद्र तारे
घराघरातून कधी, खळाळती गंध वारे..

कधी मोगरा होऊन, अलगद ती श्वासात
कधी पांखरू बनुन, गच्च फिरते रानात
जणू चांदणे ओठात .. चांदण्याच पडतात
चांदरसातून पहा .. भिजूनीच त्या येतात …

अंगावरती सांडती ..जणू चांदण्यांची फुले
काया अवघी कविता, अंगोपांगी पहा डुले
हिरे माणके नि मोती..वेली रसरसतात
तावावर मोती दाणे ..
सुंदर ते हासतात …..

प्रा. सुमती पवार

– रचना : प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

7). कविता दिन

आहे आज कविता दिन
कविता नव्हती कधी दीन

न समजून तिजला केली चूक
राजकारणाची भागवली भूक

कविता वाचणं लेखन करणं
एवढं सोपं नसतं बरं
ज्यांच्या आयुष्यात दुःख दडलेले
तेच लेखन कवितेत खरं

प्रेम, आभासी कविता
क्षणिक सुखासाठी
झिजवते स्वतः हून
शब्दांच्या सामर्थ्यासाठी

तुलना कवितेची होऊ शकत नाही
तौल्य मापन अंतिम निर्णय देता का काही

कविता कागदावर लिहून
मन मोकळं करायचं
शब्द गर्भार ठेवून
कवितेनं प्रसवायचं

कळा कविता सहन करते
आयुष्यात किती तरी मास
मिटेल शीण नक्कीच
उत्तरार्धात एकच आस

कविता बिरारी

– रचना : कविता बिरारी. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. खूप खूप मनापासून आभार अप्रतिम न्यूज टुडे गुढीपाडवा शुभेच्छा खूप खूप मनापासून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा