Thursday, September 18, 2025
Homeसाहित्यओठावरलं गाणं : ९३

ओठावरलं गाणं : ९३

नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत. मित्रांनो आजकाल व्हॅलेंटाईन डे, हा एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करण्याचा प्रेमी युगुलांचा  खास दिवस समजला जातो.  रेडिओच्या वेळचा काळ मात्र वेगळाच होता. आजच्या काळासारखं त्या वेळेस प्रेम असं सहजपणे व्यक्त होत नसे. या गाण्यातील तरूणीला पण हाच प्रश्न पडला आहे म्हणून तर कवयित्री शांता शेळके यांचे शब्द उसने घेऊन ती त्याला विचारते आहे –

“प्रिती जडली तुझ्यावरी
कळेल का ते तुला कधी
काय उमलले मनामधी

माझ्या जिवाच्या जिवलगा “माझं तुझ्यावर प्रेम आहे” असं मी थेट सांगू शकत नाही‌. माझी देहबोली आणि डोळ्यांचे इषारे पण तुला समजत नव्हते. या गाण्याचा आधार घेउन जरी मी माझं प्रेम शब्दातून हे व्यक्त केलं तरीही त्या शब्दांपेक्षा, तू एकदा जरी माझ्या डोळ्यात पाहिलंस तर माझ्या ह्रदयात असलेल्या तुझ्याविषयीच्या प्रेमाचं फुलपाखरू तुला माझ्या डोळ्यात दिसून येईल. फक्त तुला त्याची जाणीव कधी होईल, तुला ते कधी कळेल याची मी वाट पाहाते आहे.

नजर भेटता नजरेला बिंब लोचनी ते ठसते
धडधडते काळीज उरी, वीज नसांमधुनी घुसते
ओठांवर जे थरथरते ओळखशील ते तू कधी

मी तुला माझ्या डोळ्यात अशासाठी पहायला सांगितलं कि आपण दोघं जेव्हा नजरेची भाषा बोलतो (जी तुला अजूनही कळत नाही) तेंव्हा तेव्हा तुझ्या राजबिंड्या रूपाला मी माझ्या नजरेत साठवून ठेवते. अशा वेळेस शब्दांशिवाय जेंव्हा माझ्या प्रेमाला मी डोळे भरून पहाते काळजाची धडधड वाढत जाते, नसानसातून वीज सळसळत रहाते आणि मन सांगत असतं “अग वेडे हीच योग्य वेळ आणि संधी आहे तुझं प्रेम व्यक्त करण्याची, आपल्या प्रियकराला मनातलं गूज सांगून टाकायची.” तरीही माझ्या ओठावर आलेले शब्द तसेच मागे वळतात, ते मागे वळताना माझ्या शरीराला अनामिक कंप सुटतो आणि माझ्या ओठांवर आलेलं आपल्या प्रितीचं गूज तुला कधी समजेल याची मी वाट पहाते.

पैलतीरावर मूर्ती तुझी वाट बघे मी ऐलतीरी
घुमतो पावा एक इथे सूर घुमे लहरी लहरी
कसे पोचवू गीत तुला अफाट वाहे मधे नदी

आकाशातला चंद्र आणि आजुबाजूच्या परिसरातील निसर्गाची आपल्या प्रेमाला नेहमीच साथ असते. पण आज मात्र पावसामुळे नदीच्या पात्राची पाण्याची पातळी वाढली आहे. निसर्गाची साथ आज आपल्याला हवी तशी मिळत नाहीये. आधीच मी लाजाळूचं झाड, त्यातून नदीच्या या काठावर मी आतुरतेने तुझी वाट पहात आहे तर पैलतीरावर “इकडे यायचं कसं” हा प्रश्न तुला पडला आहे. माझ्या ह्रदयात घुमणारे प्रितीच्या पाव्याचे सूर पाण्याच्या लहरींसोबत नर्तन करत हवेत विरून जातायत. दोन तीरांच्या मध्ये वहात असलेल्या या नदीमुळे गाण्याच्या अनुषंगाने दिलेली प्रितीची कबुली तुझ्यापर्यंत कशी पोचवायची यापचं मलाही कोडं पडलं आहे.

ताण सोसवे मुळी न हा व्याकुळ झाला जीव अता
फुलल्या वाचून सुकायची अशीच का ही प्रेमकथा
साद घातली मी तुजला देशील का पडसाद कधी

माझं प्रेम कधी एकदा तुला कळेल असंच सारखं आता मला वाटतं आहे. सारखे मनात तुझेच विचार येत असतात. तुला माझी प्रीत कळावी आणि तुझ्या आयुष्याची जोडीदार म्हणून तू कधी माझा स्वीकार करतो आहेस असं मला झालं आहे. खरंतर प्रितीचा हा ताण मला आता सोसवत नाहीये, म्हणूनच मी या गाण्यातून प्रेमाची भाषा कळून यावी म्हणून मी माझ्या प्रियकराला साद घातली आहे. लवकरात लवकर आपली प्रीती ओळखून तू मला प्रतिसाद देशील ना?

पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेल्या या गोड गाण्याला संगीतदिग्दर्शक यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलं आहे. पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं हे गाणं ऐकत असताना ते आपल्या ह्रदयात झिरपत जातं.

विकास भावे

– लेखन : विकास भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा