नमुनेदार व्यक्ती !
3 डिसेंबर 1989 रोजी मी माझा मुंबई ते दिल्ली असा पहिला विमान प्रवास केला.
त्यावेळेस माझ्या शेजारच्या आसनावर कोण होते ? ‘म. टा.‘ चे तत्कालिन विद्वान, व्यासंगी संपादक गोविंद तळवलकर !
आम्ही बसल्यावर विमान 1 तास उशिरा सुटणार अशी घोषणा झाली. तळवलकरांचा माणूसघाणा स्वभाव मला ऐकून माहित होता. म्हणून मी आपणहून काही त्यांच्याशी बोललो नाही. पण जरा वेळाने तेच माझ्याशी इंग्लिशमध्ये बोलावयास लागले. मी त्यांना मराठीत उत्तरे देत होतो. त्यामुळे त्यांनी मला वैतागून ते इंग्लिशमध्ये बोलत असताना मी मराठीत का बोलत आहे; असा प्रश्न केला. ‘आपण गोविंदराव तळवलकर आहात हे मला ठाऊक असल्यामुळे मी आपल्याशी मराठीत बोलत आहे’ असे उत्तर मी दिले. ते स्वत:चे छायाचित्र कधीही प्रसिद्ध होऊ देत नसले, तरी मी त्यांना कसे ओळखले, असे त्यांनी मला विचारले.
पण ते गप्पा मारू लागले.
सवयीप्रमाणे मी त्यांच्या मला आवडलेल्या अग्रलेखांचा उल्लेख केला; त्यांत अगदी आ. अत्रे यांच्या निधनानंतरच्या ‘कडा कोसळला !’ याही अग्रलेखाचा उल्लेख होता.
तळवलकर सुखावले !
मग मी त्यांना मला त्यांच्या शासन पुरस्कारप्राप्त ‘नवरोजी ते नेहरू‘ या 1974 –75 सालातील पुस्तकाची एक प्रत मला विकत हवी आहे, आणि ती कोठेही उपलब्ध नाही; असं सांगितलं. ती प्रत मला ते उपलब्ध करून देऊ शकतात का, असं विचारलं.
त्यांना आश्चर्य वाटलं, आणि 14 – 15 वर्षांपूर्वींचं तसं वैचारिक पुस्तक मला का हवं, असा प्रश्न विचारला.
त्यावर मी म्हणालो की, त्या पुस्तकात 19 व्या शतकातील प्रकांड पंडित न्या. मू. म. गो. रानडे हे अर्थशास्त्राचे जाणकार असून त्यांनी शेतीवरच्या अर्थशास्त्रावर खूप लेखन केलं आहे; असे उल्लेख आहेत. न्या. मू. रानडे हे अर्थशास्त्राचे जाणकार होते, ही गोष्ट आमच्यासारख्या सामान्य वाचकांना प्रथमच कळली. म्हणून मला ते पुस्तक हवं आहे.
तळवलकर तुडुंब प्रसन्न झाले !
ते म्हणाले की, होय त्यांनीच सर्व प्रथम या गोष्टीचा उल्लेख केला आहे.
मग ते म्हणाले की, लवकरच याची नवी आवृत्ती येत आहे, ती तुम्हाला सहज उपलब्ध होईल. मी म्हटले की, क्षमा करा. 1974 सालच्या या पुस्तकाची किंमत रु.15 /– आहे. नव्या आवृत्तीची किंमत 90 / 100 रुपये असेल. ती मला परवडणारी नाही.
तळवलकर हसले.
म्हणाले बरोबर आहे. त्याची किंमत रु. 90 /– च आहे.
मी त्यांना माझं व्हिजिटिंग कार्ड दिलं आणि सांगितलं की, त्या पुस्तकाची प्रत उपलब्ध असेल तर कळवा; मी ते पुस्तक घेऊन जाण्याची व्यवस्था करेन.
तलवलकरांचा फोन काही मला आला नाही !
मात्र, मग दिल्ली येईपर्यन्त त्यांनी माझ्याशी भरपूर गप्पा मारल्या; आणि माझ्या काही राजकीय शंकांचे निरसनही केले. त्यांत मौलाना अबुल कलम आझाद यांचा फाळणीला का विरोध होता, याची सर्व सामान्य लोकांना अजिबात माहिती नसलेली बाजूही त्यांनी मला सांगितली. आझाद यांच्या ‘ India Wins Freedom ‘ या आत्मचरित्राचा आणि त्यातील सीलबंद केलेली आणि 30 वर्षांनंतर उघडली जावीत अशी पाने, यांवरही ते बोलले.
त्यांना दिल्ली विमानतळावर अनोळखी माणूस उतरवून घेण्यास येणार होता; त्याला कसे ओळखायचे या शंकेने ते ग्रासले होते. पण मला तो त्यांच्या नावाची पाटी घेऊन उभा असलेला दिसला. तसे मी त्यांना सांगताच त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला; आणि प्रसन्नतेने माझा निरोप घेतला.
नंतर काही वर्षांनी ‘ म. टा.‘च्या संपादक मंडळातले नीला उपाध्ये, अशोक जैन, प्रकाश अकोलकर, हेमंत देसाई (बाबू मोशाय) हे माझ्या चांगल्याच परिचयाचे झाले. पण त्यांचा माझ्या या गोष्टीवर कधीही विश्वास बसला नाही.
असाच दिल्ली — पुणे या प्रवासातील आणखी एक नमुनेदार प्रसंग.
मी 1991च्या फेब्रुवारी / मार्चमध्ये एकदा दिल्लीहून येत पुण्याला रेल्वेने येत असतांना मी मराठी पुस्तक वाचत होतो॰ शेजारी एक उंच, धट्टाकट्टा पंजाबी दिसणारा वयस्क माणूस बसला होता॰ त्याने अस्खलित मराठीत मी महाराष्ट्रीय का म्हणून विचारले॰
मी हो म्हटल्यावर आमच्या गप्पा सुरू झाल्या॰
तो पंजाबीच होता॰ पण गेली वीस वर्षे बारामतीत तो व्यवसाय करत असल्याने त्याला मराठी छान येत होते॰ त्यापूर्वी तो काय करत होता असं विचारल्यावर त्यानं 1956 साली मुंबई गोवा रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण चालू होते, त्या पैकी पनवेल – इंदापूर भागाचे टेंडर त्याला मिळाले होते; असं त्यानं सांगितले॰
त्याचं नाव खत्री॰
त्या बरोबर माझी उत्सुकुता चाळवली॰
कारण त्या पैकी इंदापूर – खेड रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण ‘ नंदा कन्स्ट्रक्षन ‘ कंपनी करत होती; आणि त्यांचे कार्यालय महाडला होते॰ रस्ता बांधणीला लागणारा सर्व माल शासन उपलब्ध करून देत असे. फक्त प्रत्यक्ष रस्ता बांधणी या कंत्राटदरांनी करायची. ‘ नंदा कन्स्ट्रक्शन ‘चे व्यवस्थापक कुलकर्णी म्हणून रा॰ स्व॰ संघाचे कार्यकर्ते होते॰ माझे त्या वेळेस महाडला शिक्षक असलेले बंधु गोविंदराव हे एके काळी संघाचे सक्रिय कार्यकर्ते होते॰ म॰ गांधींच्या खुनानंतर झालेल्या सत्त्याग्रहात ते 4 महिने तुरुंगात जाउन आले होते॰ त्यामुळे या बंधूंची आणि त्या कुलकर्णींची छान मैत्री झाली॰
बहुश: दर रविवारी ते कुलकर्णी गप्पा मारावयास आमच्याकडे येत असत॰ मी जरी सहावी – सातवीत असलो तरी त्या गप्पा ऐकत असे॰ माझे हे बंधु गोविंदराव हे अतिशय बुद्धिमान आणि बहुश्रुत होते. त्यांना कुठलाही विषय पटकन समजत असे. त्यामुळे रस्ता कसा बांधतात, त्याचे डाम्बरीकरण, कॉन्क्रिटीकरण कसे करतात; असे अनेक प्रश्न ते कुतुहलानं विचारत. त्यातून खूप माहिती मिळायची॰
लवकरच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात सुरू झाली; आणि या रस्ते बांधणीच्या कामाकडे शासनाचे दुर्लक्ष होऊ लागले॰ अखेरीस शासनाचे दुर्लक्ष इतके वाढले की या खत्रीच्या कंपनीने काम तर बंद केलेच; पण रस्ते बनवण्याचा माल, झालेल्या कामाचे देयक न देणे, अशा गोष्टींवरून शासनावर खटला दाखल केला॰
हे सर्व मला माहित होते॰
ही 1958 च्या सुमाराची गोष्ट.
नंतर त्याच वर्षी आम्ही महाड सोडून ठाण्याला आलो; आणि यातील नियमित माहिती मिळणे बंद झाले॰
त्या नंतर आता 1991 साली हे खत्री मला रेल्वेत भेटत होते॰
मी त्यांना त्या खटल्याचे पुढे काय झाले, ते विचारले॰ ते तर त्या खटल्यासंबंधी सर्व विसरलेच होते॰ अगोदर कुठला खटला म्हणून त्यांनीच मला विचारले॰ मग त्यांना हळू हळू सर्व आठवत गेले॰ ते इतके चकित झाले की त्यांनी मला माझे त्या वेळचे वय विचारले॰ जेव्हा माझे वय अकरा बारा होते असे कळल्यावर ते थक्क झाले !
मग ते म्हणाले की, तो खटला सुरूच होईना॰ नंतर 1 मे 1960 रोजी मुंबई राज्य बरखास्त होऊन महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले॰ मग कोर्टाच्या नियमाप्रमाणे नव्या शासनाविरुद्ध खटला दाखल करा, असे कोर्टानं खत्री यांना सांगितले. 2 – 3 वर्षांत त्यांचाही उत्साह कमी झाला होता॰ त्यांनी त्यांचे पैसे वसूल केले, ते काम सोडलं; आणि बारामतीला अन्य व्यवसाय सुरू केला॰
एकंदर नंतर प्रवास खूप छान झाला॰
नंतर मी गोविंदरावना मला खत्री भेटल्याचं सांगितलं. मग आमची परत त्या गोष्टीची उजळणी झाली.
प्रवासात भेटलेल्या अशाच आणखी काही वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तींबद्दल नंतर कधी तरी…. !

– लेखन : प्रकाश चान्दे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800