निसर्ग किती बदलतोय, ते आपण बघतच आहोत. हा बदल सर्व देशात झाला आहे.
ताजे, सकस अन्न ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आपल्या देशात नैसर्गिक समृध्दीमुळे हे सुख आपण अनुभवतो. आपल्या भाजी मार्केट मध्ये गेले तर ताजी भाजी, फळे आपल्याला मिळतात.
अमेरिका आणि अन्य देशात तिथल्या हवामानामुळे हे सर्व फ्रीजमध्ये ठेवलेलं असते. कितीही लवकर म्हणले, तरी आपल्या एवढा ताजेपणा त्यात नसतोच.
सगळच फ्रोजन फूड. काही जागी फ्रेश चिकन वगैरे मिळते. पण फार मोजक्या ठिकाणी.
ज्यांना गार्डनिंगची आवड आहे, ते टोमॅटो, चेरी, द्राक्ष वगैरे रोपं लावतात आणि फ्रेश फूड एन्जॉय करतात. त्यासाठी मोठं घर पाहिजे, जागा पाहिजे.
आम्ही बटाट्याचे रेडिमेड परोठे आणून पाहिले. खायला गेलेच नाहीत.
रेडिमेड चपाती वैगरे ठीक आहे. त्यातल्या त्यात बरी लागते.
आपल्या सारखी अन्नाला चव नाही. हवामान, पाणी सगळाच फरक असतो.
आपल्याकडे जेवणाचेही सुख आहे. कंटाळा आला, आजारी आहोत, आपल्याला घरपोच पार्सल मिळते.
तिथे घरपोच पार्सल प्रचंड महाग आहे. तुम्ही स्वतः गाडी घेऊन जायचं आणि आणायचं. नाहीतर घरी बनवायचं. दुसरा पर्याय नाही.
पिझ्झा वगैरे असतात. जे मायक्रोवेव्ह मध्ये टाकून गरम करून खायचे. पण आपण ते रोज खाऊ शकत नाही.
बरिटो हा फेमस प्रकार आहे. जास्त करून तोच खातात. सगळं बनवून ठेवायचं आणि मग तेच दोन तीन दिवस खायचं.
आपल्या सारखं भाजी, किराणा संपला, आणा जवळच्या दुकानातून मिळत नाही. आठवड्याच सामान भरून ठेवायचं.
काही ठिकाणी इंडीयन हॉटेल आहेत. अमेरिकन लोकच जास्त असतात तिथे. त्यांना आपलं जेवण फार आवडतं.
एक किस्सा सांगते. आमच्याकडे हिटरला गरम पाणी येत न्हवते. म्हणून त्याचे काम करायला हैदर म्हणून लेडी केअर टेकर आहे. ती आणि तिचा सहकारी आले होते. मी जेवण बनवून वाढत होते. त्यांना मी विचारलं जेवता का आमच्या बरोबर. ते हो म्हणाले.
सुरवातीला माझा लेक म्हणाला, त्यांना कळलं नसेल तू काय बोलली ते. मग माझ्या मिस्टरांनी प्लेट मध्ये चपाती, अंडाकरी वाटीत घातली आणि दिली. ते जेवले. छान आहे म्हणाले.. थोडं तिखट आहे म्हणाले, मग त्यांना केळ खायला दिलं.ताजे, गरम अन्न आणि त्याचे महत्व किती आहे, ह्याचाच प्रत्यय !
सगळे काम स्वतः करावं लागते. मदतीला घरचे असतात तेवढच. मदतीला कोणाला ठेवायला परवडत नाही.
आपल्याकडे आपण पार्सल मागवू शकतो, जेवण बनवण्यासाठी मदतनीस ठेवू शकतो. अगदी एखादा पदार्थ केला तर शेजारीही आपण आपुलकीने देतो. गरज असेल तर डबा देऊन मदतही करतो. हे सगळे अगदी कॉमन आहे आपल्याकडे.
अमेरिकेत असे सगळे मिळणं शक्य नाही. म्हणूनच जे स्वावलंबी आहेत आणि स्वावलंबन ज्यांना आवडते त्यांनाच अमेरिका योग्य आहे. अर्थात तिथे गेलं की हे सर्व अंगवळणी पडत.
असे असूनही अमेरिकेत गेलेले भारतीय परत येत
नाहीत. असे का?
तर आपल्याकडे असलेला जातीयवाद, वशिलेबाजी, राजकारण, टॅलेंट असून अन्याय, हे सगळ थांबले, तर आपल्या देशाची बुद्धिमत्ता बाहेर जाणार नाही. भारतीय लोक अतिशय हुशार आहेत. पण ह्या सर्व कारणामुळे परदेशात जावं असे त्यांना वाटते.
नियम मोडून दादागिरी करणं, कुठल्या देशात चालतं ?
चांगली लोक गप्प बसतात, म्हणून वाईट लोकांचं फावते.
हे सगळे थांबवणे आपल्याच हातात आहे.
आता तरी सुरवात करू या..
तुम्हाला काय वाटते ?
क्रमशः

– लेखन : प्रतिभा चांदुरकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
पाश्चात्य देशाचे योग्य मूल्यमापन आणि विश्लेषण.