Saturday, March 15, 2025
Homeसेवाशहीद दिन : याद करो कुर्बानी...

शहीद दिन : याद करो कुर्बानी…

शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांचा आज स्मृतिदिन, शहीद दिन आहे. या निमित्ताने या थोर देशभक्त वीरांचे हे स्मरण….
शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना विनम्र अभिवादन.
– संपादक

भारतीय स्वातंत्र्यासाठी इंग्रज अधिकारी सँडर्स याच्या हत्येचा आरोप ठेवून शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना २३ मार्च १९२३ रोजी फाशी दिले गेले. हे तिघे त्यांचे जहाल विचार, प्रखर देशभक्ती व निधड्या वृत्तीमुळे इंग्रजांना अतिशय डोईजड झाले होते.

संपूर्ण हिंदुस्तानात जहाल क्रांतीची धगधगती मशाल पेटली होती. कुठल्या न कुठल्या आरोपाखाली लवकरात लवकर यांचा बंदोबस्त इंग्रजांना करायचा होता. हे तिघे व अनेक क्रांतिकारी स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहत होते.

इंग्रजांच्या गुलामीतून तर भारत मुक्त झाला. हजारो वीरांनी आपल्या प्राणांची-घरादाराची आहुती देऊन पारतंत्र्यातला भारत देश गुलामगिरीच्या जोखडातून सोडवून येणाऱ्या पिढीला १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश मोकळा श्वास घेण्यासाठी दिला.
आजच्या शहीद दिनी जाणून घेऊ या, या तिन्ही शहीदांची प्रेरक कहाणी…

भगतसिंग :-
भगतसिंग यांचा जन्म १९०७ च्या २८ सप्टेंबर रोजी बंगा येथे झाला. भगतसिंगांच्या जन्माच्या वेळी सरदार किशनसिंग आणि सरदार अजितसिंह यांची जेलमधून सुटका झाली, म्हणून हा मुलगा भाग्यवान आहे असे जाणून आजीने त्याचे नाव भगतसिंग ठेवले. जालियनवाला बागेचे हत्याकांड भगतसिंग यांच्या मनावर खोल परिणाम करून गेले होते. प्रसिद्ध क्रांतिकारक भगवतीचरण हे कॉलेजात भगतसिंगांच्या पुढे २ वर्षे होते तर सुखदेव हे त्यांचे वर्गमित्र होते. वीर सावरकरांचा प्रसिद्ध ग्रंथ ‘दि इंडियन वॉर ऑफ इंडिपेन्डेन्स – १८५७’ भगतसिंगांना तोंडपाठ होता. घरच्या लोकांनी लग्न ठरवल्यावर त्यांनी घर सोडले. देशसेवेचे व्रत घेतल्यामुळे आपण लग्न करू शकत नाही असे वडिलांना कळवून त्यांनी त्यांची क्षमा मागितली.

भगतसिंग कानपूरला आल्यावर ‘बलवंतसिंग’ या नावाने त्यांनी अनेक लेख लिहिले. अनेक धाडसी सत्कार्यात ते सक्रिय होते. लाला लजपत राय यांचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. त्यांना मारणार्यास स्कॉटचा बदला घेत असताना साँडर्स तावडीत सापडल्याने साँडर्सला उडविण्यात आले. या प्रकरणात सर्वजण फरारी झाले. क्रांतिकारकांचे म्हणणे काय आहे हे जाहीररीत्या सर्वांना समजावे यासाठी त्यांनी एक योजना आखली. ‘पब्लिक सेफ्टी’ बिलाविरूद्ध देशभर संताप व्यक्त होत होता. या बिलावर सेंट्रल असेंबलीत चर्चा चालू असताना बटुकेश्वर दत्त आणि भगत सिंह यांनी असेंब्लीत बाँब फेकून गोंधळ उडवून दिला. स्वतःहून अटक करून घेतली. कोर्टात आपली बाजू प्रभावीपणे मांडली. कोर्टाने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा फर्मावली. २३ मार्च १९३१ ला ‘इन्कलाब झिंदाबाद’ च्या घोषणा देत ते तिघेही हसत हसत फासावर चढले.

राजगुरु :-
शिवराम हरि राजगुरू यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड
(आता चे राजगुरूनगर) येथे १९०८ साली झाला. जालियनवाला बाग हत्याकांडाचे पडसाद त्यांच्या मनावर चांगलेच उमटले होते. अनेक पराक्रम करून त्यांनी क्रांतिकारकांच्या मनात मानाचे स्थान मिळवले होते. लाला लजपतराय यांच्या हत्येचा सूड म्हणून त्यांनी साधलेल्या अचूक नेमबाजीमूळे साँडर्स वध घडवून आणलेला होता. पुढे फरारी असताना त्यांना फितुरीमुळे अटक झाली. लाहोर मध्ये झालेल्या खटल्यात त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.

सुखदेव :-
सुखदेव थापर यांचा जन्म लायलपूर येथे दि.१५ मार्च १९०७ रोजी झाला. भगतसिंग यांनी असेम्ब्लीमध्ये बाँब टाकल्यानंतर सुरू झालेल्या छापेसत्रात लाहोरमध्ये छापे टाकण्यात आले. तेव्हा काश्मिर बिल्डींगमध्ये पडलेल्या छाप्यात काही बाँब जप्त करण्यात आले. ते बाँब सुखदेव यांनी तयार केले होते, म्हणून त्यांनाही अटक करण्यात आली.

लाहोर कटाच्या पहिल्या खटल्यात १६ आरोपींचा नेता म्हणूनच सुखदेव यांची नोंद करण्यात आली. नवे सदस्य गोळा करून त्यांना क्रांतिदलात समाविष्ट करून त्यांच्या लायकीप्रमाणे काम देण्यात सुखदेव तरबेज होते. लाहोर केसमध्ये त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.

भगतसिंग, राजगुरूंबरोबर सुखदेव देखील २३ मार्च १९३१ ला लाहोर तुरूंगात फाशी गेले. आज ही या वीरांचे नाव उच्चारताच आपल्या अंगात स्फुरण चढते. अशा या तिन्ही शुर विरांना विनम्र अभिवादन.

संजीव वेलणकर

– लेखन : संजीव वेलणकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments