स्त्री म्हटले की साज शृंगार आलाच. परंतु विधवा म्हटले की समाजाला या गोष्टी आजही मान्य नाहीत. तिच्यावर घरीदारी रुढी परंपरेचा बडगा उगारला जातो. आनंदी जगण्याचा तिचा हक्कच हिरावून घेतला जातो.
एकल महिलांची बिकट अवस्था ओळखून तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसावा, तिने स्वतःसाठीही जगावे, तिच्या प्रज्ञा आणि प्रतिभेचा आविष्कार इतरांना दिसावा यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानने महिला दिनाच्या निमित्ताने या महिलांसाठी फॅशन शो आयोजित करण्याचे धाडसी पाऊल नुकतेच उचलले आणि विशेष म्हणजे एकल महिलांनी देखील याला भरभरून प्रतिसाद दिला.
महाराष्ट्रातीलच नव्हे तर बहुधा भारतातील ही पहिली आगळीवेगळी स्पर्धा असावी. या स्पर्धेत 77 महिलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेच्या निमित्ताने एकल महिलांच्या प्रतिभेचा अविष्कार बघायला मिळाला.
रॅम्प वॉक करताना या सर्व महिलांनी थोर क्रांतीकारक, समाज सुधारक महिला यांची वेशभूषा करून रॅम्प वॉक केला. त्यामध्ये ताराराणी, रमाई, जिजाऊ, सावित्री, राणी लक्ष्मीबाई, आनंदी जोशी या भूमिका अतिशय समर्पकपणे साकारल्यात.
वेस्टर्न राउंड मध्ये देखील ज्युरीनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे या महिलांनी दिली.
या स्पर्धेत अकोल्याच्या सुरेखा मंडलिक “हिरकणी महाराष्ट्राची“. या प्रथम पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. दुसरा क्रमांक रश्मी शर्मा- कोपरगाव यांनी तर तिसरा क्रमांक अश्विनी तावरे- बारामती यांनी पटकावला. या विजेत्यांना सोन्याची नथ, पैठण्या व इतर भरघोस बक्षीसे मिळाली .
या कार्यक्रमामुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते इतक्या भारावून गेल्या की, त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. या महिलांच्या पाठीशी महिला आयोग भक्कमपणे उभा आहे असे यावेळी बोलताना त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कोयटे व स्वाती मुळे यांनी केले. डॉक्टर गावित्र यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला आयोगाच्या माजी सदस्य प्रा. छाया शिंदे होत्या. तर समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे, प्रतिमा कुलकर्णी, एकल महिला पुनर्वसन समिती अकोला यांची प्रमुख उपस्थित होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक गावित्र, आदिनाथ ढमाले, किरण शिंदे, श्रद्धा शिंदे, सुनीता ससाने, सुधा ठोळे आदींनी परिश्रम घेतले.
हा आगळावेगळा कार्यक्रम पाहून सर्व उपस्थितांचे डोळे पाणावले. त्या सर्वांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले. काही महिला तर इतक्या भारावून गेल्यात की अजूनही आपण स्वप्नात आहोत, असाच भास त्यांना होतो. पती गेल्यानंतर पहिल्यांदा आम्ही मनासारखं राहिलो, अशा प्रतिक्रिया रडून महिलांनी दिल्यात.
या स्पर्धेविषयी बोलताना प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता मालकर म्हणाल्या, की कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात एक लाख 40 हजार मृत्यू झालेत. या मृत्यूत 60 टक्के मृत्यू हे पुरुषांचे असल्याने किमान 70 हजार महिला कोरोनामुळे विधवा झाल्यात. अधिक तर मृत्यू 21 ते 50 वयोगटातील आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात वीस ते तीस हजार गरजू कुटुंबांच्या पुनर्वसनाचा आणि कोरोना विधवांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यातच अगदी लहान वयातही वैधव्य आलेल्या महिलांची संख्या जास्त आहे. एकट्या कोपरगाव तालुक्यात ही संख्या 320 आहे. विधवा होण्याचं वय नसताना काळाने घाला घालून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हिरावून घेतला. घरातला कर्ता पुरुष गेल्याने दवाखान्यासाठी झालेले कर्ज, पदरी चिमुकली मुलं यामुळे या महिलांची अवस्था
अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनासाठी गेल्या दोन वर्षापासून प्रतिष्ठान विविध उपक्रम राबवत आहे.
त्यांना आत्मनिर्भर, स्वावलंबी होण्यासाठी विविध प्रकारची मदत केली जाते. आतापर्यंत आमदार निधी मधून साडेसात लाखाची मदत, 90 हजाराचा दिवाळीचा किराणा, लोकसहभागातून 17 शिलाई मशीन वाटप, कापडी पिशव्या, परकर शिवणे, वाळवण बनवणे असे छोटे मोठे उद्योग महिलांना दिले गेलेत. आर्थिक स्वावलंबना बरोबरच या महिलांना समाजात सन्मान मिळाला पाहिजे यासाठी हळदी कुंकू, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव यात या एकल महिलांना आरती करण्याचा मान देखील मिळवून देण्यात आला. त्यांच्या मुलांसाठी विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप केले गेले. हे सर्व होत असताना त्यांच्या मनाचा, भावनांचा विचार केला गेला.
खरोखरच समाजातील एकल महिलांची संख्या आणि त्यांची परिस्थिती पाहता, इतरही भागातील संस्थांनी सातत्याने असे कार्यक्रम करणे गरजेचे आहे.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
“एकल महिलांचा फॅशन शो”
हा विचार च इतका छान व एकल महिलांचा आत्मसन्मान मिळुन देणारा आहे.
खरंच लेख वाचुन सर्व फॅशन शो डोळ्यासमोर दिसत होता.नकळत डोळ्यातुन पाणी आले.
खरंच खूप खूप छान असा कार्यक्रम भारतात अगदी सर्व ठिकाणी होवो हीच मनापासून ईच्छा.
न्युज स्टोरी टुडे .ने खुप छान विषय घेतला.
🤝
‘एकल महिलांचा फॅशन शो ‘हा लेख वाचून मीही भारावून गेले. कल्पना इतकी भन्नाट आहे. त्याला प्रतिसाद ही इतका सुंदर मिळाला आहे…. खरंतर असे कार्यक्रम म्हणजे सामाजिक कार्यच आहे.
“न्यूज स्टोरी टुडे ‘ने हा कार्यक्रम इतक्या सुंदर रीतीने येथे मांडला आहे, सर्व फोटोसहीत आणि आवश्यक माहिती सकट. मी त्यांचे खरोखर अभिनंदन करते.
🤝🤝 धन्यवाद मेघना ताई