कोळी
कोकण विभागीय माहिती कार्यालयातील, माझे एकेकाळचे सहकारी संजय कोळी यांचे गेल्या आठवड्यात ५२ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाल्याचे कळाले आणि खुप वाईट वाटले.
खरं म्हणजे, शासकीय काय आणि खाजगी काय, कुठल्याही कार्यालयात किंवा इतर कोणत्याही कामाच्या ठिकाणी काम करताना, सर्वच वरिष्ठ, सहकारी, कनिष्ठ अशा सर्वांशी, सर्वांचे सदाकाळ सुर जुळलेले असतातच असे नाही. काही संबंध हे बळे बळेच निभवावे लागतात. त्यात नाईलाज असतो. अपरिहार्यता असते. कामापुरतेच अशा व्यक्तींशी संबंध असतात. अशा व्यक्ती खरे तर नकोशाच वाटत राहतात.
काही व्यक्ती मात्र अपवाद असतात.
त्या व्यक्तींची सहजता, निरागसता, स्वभावातील गोडवा, नैसर्गिक नाते संबंध कायमचे आपल्या मनात घर करून राहतात.
संजय कोळी यांचे व्यक्तिमत्त्व असेच होते. खरं म्हणजे, त्यांचे पद होते, अंधार कोठडी सहायक. या पदावरील व्यक्ती चा तसा लोक संपर्क कधी येत नाही. अर्थात माहिती खात्या बाहेरील लोकांना हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे की, अंधार कोठडी म्हणजे काय ? तर अंधार कोठडी म्हणजे पूर्वीच्या काळी छायाचित्रकाराने काढलेल्या छायाचित्रांचा रोल काढून त्याचे डेव्हलपिंग, प्रिंटिंग करण्याची जागा म्हणजे, अंधार कोठडी. इंग्रजीत या जागेला डार्क रूम म्हणतात. असो. आता डिजिटल तंत्रज्ञानामुळे या सर्व गोष्टींची आवश्यकताच राहिली नाही, हा बाब अलहिदा.
इथे आणखी एक सांगायचे म्हणजे, कोकण भवन कार्यालयात बरीच वर्षे दळवी हे छायाचित्रकार होते. पुढेही काही आलेत. अंधार कोठडी सहायक पदी कोळी होतेच. पण या कार्यालयात प्रत्यक्ष अंधार कोठडी काही स्थापन होऊ शकली नाही. ती का नाही झाली ? हा एक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे कोळी ना ज्या पदासाठी नेमले होते, ते सोडून ईतरच कामे करावी लागत. ती सर्व कामे ते ही आनंदाने करत. हे काम माझे नाही, असे त्यांनी कधी म्हटले नाही. त्यांचा स्वभाव, त्यातील गोडवा, सहजपणा आणि विशेष म्हणजे कुणालाही मदत करायला ते तत्पर असत. यामुळे त्यांचे विश्व ह्या कार्यालया पुरते कधीच मर्यादित राहिले नाही.
गंमत म्हणजे, इतर अधिकारी, कर्मचारी त्यांच्या कार्यालयामुळे ओळखले जातात. पण आमचे विभागीय माहिती कार्यालय, कोळींचे ऑफिस म्हणून ओळखले जायचे. इतका त्यांचा जनसंपर्क अफाट होता.
सहकारी असो, की साहेब असो…सर्वांशी कोळींचे वागणे बोलणे हे गावाकडील माणूस भेटला की जसे बोलतो, तसे ऐसपैस असे. अधिकाऱ्यांच्या अधिकारी पदाचे टेन्शन त्यांना कधी ही वाटत नसे. कुणीही असो, त्यांची, त्यांच्या घरच्यांची ते नैसर्गिक आस्थेवाईकपणे चौकशी करत. टिपिकल खान्देशी माणसाच्या वागण्या बोलण्यातील गोडवा, त्यांची भाषा, लकब त्यांच्यात ठासून भरलेली असे. त्यांच्या कार्यालयातील अस्तित्वानेच सर्व औपचारिक पणा गळून पडत असे.
खरं म्हणजे, त्यांची खूप सर्व्हिस बाकी होती. त्यामुळे ते असे अचानक जातील, अशी अपेक्षाच नव्हती. पण कावीळ होण्याचे निमित्त झाले आणि ती इतकी वाढत गेली की, आटोक्यात न येता कोळी ना घेऊन गेली. हा जसा त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठा धक्का आहे, तसाच तो केवळ कार्यालयातील अधिकारी, सहकारीच नव्हे तर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांसाठीच आहे. असो.
कोळीना भावपूर्ण श्रद्धांजली.

– लेखन : देवेंद्र भुजबळ.
निवृत्त माहिती संचालक. ☎️ 9869484800