एप्रिल फूल
‘एप्रिल’ महिना म्हणजे सृष्टीतील चराचर बहरण्याचा, मोहरण्याचा, फुलण्याचा ‘वसंत ऋतू’तील ‘चैत्रा’ची चाहूल लागणारा मोहक, आनंदी, चित्तवृत्ती प्रफुल्लीत होण्याचा महिना ! अशा या महिन्यात माणसांतील उपजत खोडकरपणा उफाळून आला नाही तर नवल !
एप्रिल महिन्याची सुरुवातच आपल्या सुहृदयांची हलकेच फसवणूक करुन खिल्ली उडवायचा अधिकृत दिवस म्हणजे ‘एप्रिल फूल’. या फसवणूकीला शिक्षा नाही. ज्याची फसवणूक होईल त्याने आणखी कोणाची तरी फसवणूक करुन आनंदी व्हावे, असे अभिप्रेत असते. आयुष्यात प्रत्येकजण केव्हा ना केव्हा ‘एप्रिल फूल’ बनलेलाच असतो. कोणी कितीही फुशारक्या मारो की, ‘आपल्याला कोणीही मूर्ख बनवू शकत नाही’, ‘आपल्याला कोणीही मूर्ख बनविलेले नाही’, ‘त्यावर विश्वास ठेवता येणार नाही’. किंबहुना असे सांगून तो आपल्याला मूर्खच बनवत असतो.
अगदी आदल्या रात्री झोपतांना आपण स्वत:ला एकसारखे बजावत असतो की, ‘कोणीही एप्रिल फूल बनविण्याची शक्यता राहिल तरी जपून’. पण कितीही खबरदारी घेतली तरी अवचित कोणीतरी असे काही ‘एप्रिल फूल’ बनवून जाते की, आपला संकल्प दरवर्षी पुढील वर्षावर जाऊन ठेपतो. कोणीतरी अबक्यात येऊन सांगते, ‘तुम्हाला अमक्या हिने लगेच बोलाविले आहे’. तुमचा विश्वास बसत नाही, पण तुम्ही जाऊन बघता आणि फसता. मग लक्षात येते की, आपण अनेक मूर्खांमध्ये आणखी एक मूर्ख झालेलो आहोत !
‘एक एप्रिल’ म्हणजे मूर्ख बनविण्याचा दिवस. पूर्वी सकाळी चांगले रेडिओवर ‘एप्रिल फूल बनाया, तो उनको गुस्सा आया’ असे सावध करणारे गाणे लागायचे आणि आपण चपापून मागेपुढे पहात पुढे वाटचाल करायचो. ‘खोड्या काढण्याचाच’ हा दिवस. कोण कशी खोडी काढेल याचा काही नेम नसतो. वर्तमानपत्रात मान खुपसून बसलेल्यांना हळूच शेपूट लागते. कोणीतरी पाठीवर शाबासकी देण्याच्या बहाण्याने ‘मी गाढव आहे’ अशी जाहिरात चिकटपट्टी बेमालूमपणे चिपकवून जातो. अगदी गंभीर चेहऱ्याने निघालेल्या एखाद्याला कोणीतरी ‘पोस्ट ऑफिस उघडे’ आहे असे सांगून विचलित करुन जातो. कितीतरी अशा खोड्या.
काही ठिकाणी रिकाम्या खोक्यांना झिळमिळ चमकीचा कागद लावून मित्रांना भेट म्हणून देण्याचा वाह्यातपणा केला जातो आणि मित्राने ती भेटवस्तू उघडून पाहिली की, ‘एप्रिल फूल’ म्हणून एकच गलका केला जातो. दोन शेजाऱ्यांमध्ये पटत नसेल तर एकजण शेजारच्याच्या दारावर ‘हे घर विकणे आहे’ अशी पाटी लावून त्या घरी चौकशीला येणाऱ्यांची व त्या एकेकाला संतापून दिलेली उत्तरे ऐकून आनंद मिळविला जातो. काही ठिकाणी पत्नी पतीचे पायमोजे आतून शिवून ठेवते आणि ‘एप्रिल फूल’ करते. काही ठिकाणी रस्त्यावर ‘५०-१०० ची नोट’ पडलेली असते त्याची सुत्रे कोणाच्या तरी हातात असतात. उचलणाऱ्याला तो सूत्रधार काही दिसत नाही. जो जो हात पुढे करावा तो तो नोट पळते आहे हे पाहून खजील झालेला माणूस कोणी आपल्याला पाहत नाही ना याची खात्री करुन हळूच निसटतो आणि कसे ‘एप्रिल फूल’ केले म्हणून सूत्रधारासहीत सगळी पोरं टाळ्या पिटतात.
याबाबतीत जेवढी कल्पकता म्हणून वापरता येईल तेवढी कल्पकता वापरुन माणूस खोडकरपणाचा आनंद मिळवतच असतो. हे सगळे प्रकार आठवले की हसू आल्याशिवाय रहात नाही. एरव्ही गंभीर असलेला माणूस यादिवशी हटकून खोडकर होऊन जातो. ‘एप्रिल फूल’ तर बनायचे नाही. पण दुसऱ्यांना ‘एप्रिल फूल’ बनून मनमुराद आनंद लुटायचा ही हौस तो भागवून घेतोच घेतो.
सुरुवातीला, काहीच कळायचे नाही. ‘एप्रिल फूल डब्बा गुल’ असे कोणी आनंदाने ओरडले की वाटायचे हा ‘फुलाचा एक प्रकार’ असावा. कुठे आहे फूल म्हणून विचारल्यावर समोरच तर आहे असे सांगितल्यावर कळायचे की आपणच ते फूल आहोत. आपल्यालाच ‘उल्लू’ बनविलेले आहे. एप्रिल फूल बनविण्यातून कितीतरी गंमती-जंमती होऊन जातात. एकाने त्याचे पत्र लिहून तिला दिले आणि तिचे पत्र लिहून त्याला दिले. दोघे त्याप्रमाणे भेटले तर कळले की त्यांनी ती पत्रे लिहिलीच नव्हती. लिहिणारा तिसराच आहे. आणि मग स्वत:चे अक्षर पत्रातील अक्षरापेक्षा वेगळे कसे आहे ते एकमेकाला पटवून देता देता त्यांना आपले एप्रिल फूल झाल्याचे लक्षात येते आणि सुखद धक्काही बसतो. त्यातूनच त्यांच्या मैत्रीला सुरुवात होते.
वर्तमानपत्रातूनही असेच सुखद धक्कादायक मथळे झळकतात. लोकं आश्चर्याने सविस्तर बातमी वाचून काढतात आणि दुसऱ्या दिवशी मात्र ती बातमी म्हणजे एप्रिल फूल होती असा खुलासा वाचल्यानंतर वाचकाच्या लक्षात यायचे की आपण हातोहात एप्रिल फूल झालो आहोत. काही ठिकाणी एक एप्रिलला खरोखर निर्णय झाले तरीही त्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार होत नाही. तर काही निर्णय खास एप्रिल फूल म्हणून जाहीर केले जातात, ज्यांची अंमलबजावणी अपेक्षित नसते. एका शायरने काश वो एप्रिल फूल बनाने के लिए ही सही, कह देते की मुझे तुमसे मोहब्बत है असे म्हंटलेले होते. अर्थात, असे एप्रिल फूल होत नसते.
एप्रिल फूल संबंधी सामाजिक माध्यमांत व्हॉट्स-ऍपवर एक कथा वाचनात आली होती, अकबराने एकदा बिरबलाला फरमावले, आपल्या राज्यातले सर्वात पाच मूर्ख लोक शोधून माझ्यासमोर आणून उभे कर. हा खाविंद, पण मला एक महिन्याची मुदत द्यावी. एक महिन्यानंतर बिरबल दोनच व्यक्तींना घेऊन दरबारात येतो. बादशहा विचारतो, अरे मी तुला पाच मुख आणायला सांगितले होते. बिरबल म्हणाला खाविंद, एक एक मूर्खाला सादर करण्याची इजाजत मिळावी. बिरबलाने पहिला मूर्ख सादर केला. महाराज हा माणूस बैलगाडी चालविताना एक मोठे ओझे डोक्यावर घेऊन बसला होता. का तर म्हणे बैलाला जास्त ओझे पेलायला नको म्हणून.. आणि महाराज हा दुसरा मूर्ख. ह्याच्या घराच्या छपरावर उगवलेले गवत गायीने खावे म्हणून तो तिला शिडीवरुन छपरावर नेण्यासाठी प्रयत्न करीत होता. बादशहा म्हणाला ठिक आहे. आता तिसरा मूर्ख दाखव. महाराज मी या राज्याचा प्रधान आहे. माझ्याकडे खूप जबाबदाऱ्या आहेत, त्या सोडून मी पाच मूर्खांच्या शोधात फिरतोय म्हणून मी तिसरा मूर्ख. ठीक आहे आता लवकरच चौथा आणि पाचवा मूर्ख मला दाखव. महाराज आपली क्षमा मागतो पण आपण या राज्याचे राजे असून प्रजेकडे दुर्लक्ष करुन मला नको ती कामे करायला सांगता हा मूर्खपणाच नाही का ? म्हणून चौथा नंबर आपला. असू दे, असू दे.. आता लवकर पाचवा मूर्ख मला दाखव, नाहीतर शिक्षेला तयार हो. महाराज, पाचवा मूर्ख आपल्यासारख्या मूर्खाच्या कोड्याचे उत्तर जाणून घेण्यासाठी दैनंदिन कामकाज आणि जबाबदाऱ्या सोडून हातातल्या मोबाईलला चिकटून बसला तो… म्हणजे संदेश वाचणाऱ्यालाही हळूच मूर्ख बनविणारी ही गोष्ट.
अशीच आणखी एक मजेशीर गोष्ट सामाजिक माध्यमांतूनच व्हॉटस्ऍपवर वाचनात आली होती. एक एप्रिल हा दिवस एप्रिल फूल म्हणून साजरा केला जातो. फूल म्हणजे मूर्ख. या दिवशी लोक एकमेकांना मूर्ख बनवितात. हा दिवस स्टीव्ह एप्रिल नावाच्या माणसाच्या मृत्यूपश्चात साजरा केला जाऊ लागला. त्याचा जन्म १ एप्रिल १५७९ला झाला होता. तो अगदी महामूर्ख होता. त्याने त्याच्या संपूर्ण आयुष्यात १२० व्यवसाय केले पण एकाही व्यवसायात त्याला यश मिळविता आले नाही. तो १९ वर्षाचा असताना त्याने एका ६५ वर्षाच्या म्हातारीशी लग्न केले. पुढे वर्षाभरातच त्याच्या मूर्खपणामुळे तिने त्याला घटस्फोट दिला. त्याला नेहमी खोट्या गोष्टी वाचायला खूप आवडायच्या, जशी तुम्ही आता वाचत आहात. एप्रिल फूल- एप्रिल फूल !! तर बघा, पाहता-पाहता वाचकालाच एप्रिल फूल करणारी ही गोष्ट. आहे की नाही गंमतीशीर !
एप्रिल फूलची सुरुवात खरी तर पाश्चात्त्य देशातील. एप्रिल फूलचा पहिला उल्लेख सन १३९२ मध्ये जीओफ्री चॉसरच्या कॉन्टरबरी टेल्स् मधील नन्स प्रिस्ट टेलमध्ये a vain cock chauntecleer is tricked by a fox on syn March bigan 30 days and two. वाचक ही ओळ ३२ मार्च म्हणजे १ एप्रिल अशी समजतात. पण तसे नव्हते. अभ्यासक असे मानतात की, हस्तलिखितावरुन ओळी उतरवण्यात चूक झाली. चॉसरने खरे तर syn march was gon असे लिहिले होते ज्याचा मूळत: अर्थ मार्चनंतर ३२ दिवस म्हणजे २ मे असा होतो.
आणखी एका आख्यायिकेनुसार सन १५०८ मध्ये फ्रेंच कवी इलॉय दी’ ॲमरवलने एप्रिल फूल म्हणजे एप्रिलचा मासा असा संदर्भ दिला जो फ्रांसमध्ये हा दिवस साजरा होत असल्याचा पहिला संदर्भ आहे. असे म्हणतात, नंतर सन १५८२ मध्ये १३ वे पोप ग्रेगरी यांनी आधीची ज्युलियन दिनदर्शिका बदलून ग्रेगरियन दिनदर्शिका आणली. त्या आधी १ एप्रिलला नवं वर्ष साजरे करायचे. नव्या दिनदर्शिकेनुसार १ एप्रिल ऐवजी १ जानेवारी हा नववर्ष साजरे करावे असा आदेश काढला. अनेकांना ते रुचले नाही. विरोध, आंदोलने झाली. पण हा निर्णय मान्य करावाच लागला. काहींनी मात्र त्यासाठी ठाम नकार दिल्यामुळे त्यांना मूर्ख ठरविण्यात आले. तेव्हापासून १ एप्रिल हा एप्रिल फूल डे म्हणून साजरा केला जाऊ लागला.
फ्रान्समधील ही गोष्ट युरोपभर पसरली आणि त्यानंतर एप्रिल फूल दिवस सर्वत्र साजरा करण्यात येऊ लागला.
आणखी एक गोष्ट कॉन्सन्टाईन दी ग्रेट यांच्या काळातील आहे. काही विदूषक राजदरबारात गेले. आपण या राजापेक्षाही चांगला कारभार करु शकतो असे त्यांचे मत पडले. उदार राजाने एक दिवसासाठी गंमत म्हणून त्यातल्या एका विदूषकाच्या हाती राज्यकारभार सोपविला, तर एका विदूषकाने फर्मानच काढले, वर्षातला एक दिवस सगळ्या जनतेने मूर्खासारखे वागायचे आणि विदूषकासारखे चाळे करायचे. विदूषकाचा हेतू एवढाच की इतरांना हसविणे किती कठीण असतं ते लोकांना दाखवून द्यावे आणि तेव्हापासून एप्रिल फूल दिवस साजरा केला जाऊ लागला.
पाश्चातांचे अनुकरुन म्हणून आपल्याकडे हा दिवस अलिकडच्या काळात साजरा करण्यात येतो. जगात मूर्खांची कमी नाही. एक शोधावा तर हजारों सापडतील अशी स्थिती आहे. शहाण्या लोकांचा गोड-गैरसमज आहे की, जगात त्यांची संख्या कमी आहे. प्रत्येकजण शक्यतो दुसऱ्याला मूर्खच समजत असतो. स्वत:कडे मात्र ती बिरुदावली येणार नाही यासाठी आटापिटा करतो. समर्थ रामदासांनी दासबोधात मूर्खांची लक्षणे वर्णिलेली आहे.
परस्त्रीशी प्रेमा धरी. श्वशुरगृही वास करी. कुळेविण कन्यांवरी. तो एक मूर्ख.
आपली आपण करी स्तुती. स्वदेशी भोगी विपत्ति. सांगे वडिलांची किर्ती. तो एक मूर्ख.
अकारण हास्य करी. विवेक सांगता न धरी. तो बहुतांचा वैरी. तो एक मूर्ख.
बहुत जागते जण. तयामध्ये करी शयन. परस्थळी बहु भोजन करी. तो एक मूर्ख.
औषध न घे. असो न वेधा. पथ्य न करी सर्वथा. न मिळे आलिया पदार्था. तो एक मूर्ख.
आदरेविण बोलणे. न पुसतां साक्ष देणे. निंद्य वस्तु अंगिकारणे. तो एक मूर्ख.
दोघे बोलत असती जेथे. तिसरा जाऊन बैसे तेथे. डोई खाजवी दोहीं हाते. तो एक मूर्ख.
कलह पाहत उभा राहे. तोडविना कौतुक पाहे. खरे अस्ता खोटे साहे. तो एक मूर्ख.
लक्ष्मी आलियावरी. जो मागील वोळखी न धरी. देवीं ब्राह्मणी सत्ता करी. तो एक मूर्ख.
आपले काज होये तंवरी. बहुसाल नम्रता धरी. पुढीलांचे कार्य न करी. तो एक मूर्ख.
मूर्खपणाची देखील बरीच उदाहरणे आढळतील.
खजिन्यातील सोन्यांच्या नाण्यांऐवजी तांब्याची नाणे सुरु करणारा राजा, ज्या फांदीवर बसला तिच फांदी तोडणारा शेखचिल्ली, बाज विणत असलेल्या बिरबलाला अकबर बादशहाने काय चालले बिरबल ? असे विचारणे अशी अनेक उदाहरणे आहेत. तसं पाहिलं तर एप्रिल फूलचं महत्त्व कोणासाठी ? ज्यांनी वर्षभर शहाण्यासारखं आयुष्य घालवलं त्यांच्यासाठी. जे सतत दुसऱ्याला मूर्खच बनवितात किंवा जे तहहयात मूर्खच असतात त्यांच्या दृष्टीने एपिल फूलचा दिवस म्हणजे मूर्खपणाच वाटतो.

– लेखन : विलास कुडके
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800