Wednesday, September 17, 2025
Homeसेवाक्रांतीसुर्य

क्रांतीसुर्य

आपल्या प्रबोधनाने १८ व्या शतकात सामाजिक समतेची मशाल प्रज्वलित करुन समाजात सामाजिक न्याय प्रस्थापित करणारे महानायक म्हणजे क्रांतीसुर्य महात्मा फुले.

महात्मा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुण्यात झाला.
लहानपणापासुनच त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज व पाश्चात साहित्यीक “थाॅमस पेन” यांच्या विचारांचा प्रभाव पडला. म.फुले यांनी सामाजिक समतेची सुरुवात स्वतःपासून केली. प्रचंड सामाजिक विषमता, अंधश्रध्दा, कर्मकांड, बुवाबाजी समाजात पसरली असताना, बहुजनांना माणुस म्हणुन जगण्यास नाकारणारी व्यवस्था असताना सामाजिक समता, सामाजिक न्यायाची सुरुवात करुन आधुनिक स्वतंत्र भारताची निर्मिती केली.सामाजिक समतेचा पाया रचणारा पण प्रबोधनाच्या मांदियाळीत उपेक्षित राहिलेला महानायक म्हणुन म.फुले यांचाकडे पाहावे लागते.

मुलीसाठी शाळा :
सन १८४८ रोजी पुण्यात बुधवार पेठेत त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली. त्यात सहा मुली शिक्षणासाठी येत होत्या. त्यात एक मातंग समाजाची मुलगी होती, मुक्ता साळवे. लहुजी वस्ताद साळवे यांची मुलगी होती ती. लहुजी वस्ताद साळवे, मुलींना पोत्यात घालुन शाळेत आणुन सोडायाचे, शाळा सुटल्यानंतर घरी सुरक्षित नेवुन सोडायचे. याच मुक्ता साळवे यांनी पुढे “महारा मांगाच्या दुःखाविषयी” हा निंबध लिहिला. ब्रिटिनची राणी यांनी या निबंधाबद्दल त्यांचा गौरव केला. सन १८५३ रोजी पुण्यात दुसरी शाळा म.फुले यांनी मुली साठी काढली. तर सन १८५६ तिसरी शाळा ही मुलीसाठी म.फुले यांनी उघडली.

सावित्रीबाईस दिला शिक्षणाचा प्रसाराचा वसा:
सनातन्यांनी म.फुले यांनी शाळा काढल्यावर कर्मठ वृत्तीने फुल्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. पण फुले यांनी दाद दिली नाही. उलट या शाळेत त्यांनी सावित्रीबाई यांना शिकवण्यास आणले. शिक्षणप्रसाराचा वसा त्यांना दिला. महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील पहिली स्री शिक्षिका व पहिली मुख्याध्यापिका म्हणुन सावित्रीबाई फुले यांना त्यांनी उभे केले. येथेच सामाजिक स्रीमुक्तीची सुरुवात या महानायकाने केली.

फातिमा बी यांची मदत :
या शाळेत त्यांना मदत करण्यासाठी मुस्लिम महिलेची मदत त्यांनी घेतली. त्यांचे नाव होते फातीमा बी. फातिमा बी यांनी सावित्रीबाईना साथ देत शिक्षणाचा हा रथ पुढे नेला. त्यामुळे सामाजिक धार्मिक सहिष्णुता कृतीतुन जागवणारा महानायक म.फुले ठरले. कारण मुलीची शाळा काढली तिथे सावित्री बाईंना शिक्षिका केले. मुस्लिम फातिमा बी यांना ही शिक्षिका केले. लहुजी वस्ताद साळवे या मातंग पहेलवानाची मदत घेतली. शाळा भिडे या ब्राह्माणांच्या वाड्यात सुरू केली. सहा मुली पैकी तीन मुली ब्राह्मण होत्या या विशेष.

दलितासाठी शाळा व अस्पृश्यमुक्तीचा मार्ग शोधला:
दलितांना सामाजिक प्रवाहात आणायचे असेल तर त्यांचे अज्ञान नष्ट करणे हा उपाय होता.म्हणुन म.फुले यांनी दलित समाजासाठी पहिली शाळा १८५२ ला पुण्यात सुरु केली. दुसरी शाळा १८५६ ला सुरु करुन दलितांना सामाजिक प्रगतीचा मार्ग मोकळा केला.

पाण्याचा हौद दलितांसाठी खुला केला:
दलितासाठी, अस्पृश्यांसाठी त्याकाळी सार्वजनिक नळावर पाणी भरण्यास प्रतिबंध होता.तेंव्हा ही अडचण ओळखुन म.फुले यांनी स्वःताच्या घरातील पाण्याचा हौद दलितासाठी खुला केला. हे फक्त कार्यच नाही तर दलितासाठी सामाजिक गुलामगिरी मुक्तीचा क्रांतीकारी अध्यायच होता.

महिला प्रबोधनास सुरुवात:
घरातील स्री शोषणापासुन मुक्त होणार नाही तोपर्यत सामाजिक न्याय सत्यात उतरणार नाही हे ओळखुन त्यांनी महिला प्रबोधनाची सुरुवात केली.

सतीप्रथेला विरोध:
“पतीनिधनानंतर पत्नीला पतीच्या चितेवर जीवंत जाळणारा समाज पत्नी निधनानंतर पतीला पत्नीच्या चितेवर सता म्हणुन का जाळत नाही?” हा रोखडा सवाल विचारत त्यांनी सती प्रथेला विरोध केला.सती प्रथा निर्मुलन कायदा कडक व्हावा यासाठी म.फुले यांनी प्रयत्न केले.

केशवपनला विरोध:
पतीनिधनानंतर विधवा स्रीचे केस कापुन मुंडण केले जाई.या प्रथेला केशवपण असे म्हणत. याला फुल्यांनी विरोध केला.त्यासाठी न्हाव्यांचा संप भारतात पहिल्यांदा त्यांनी घडवुन आणला. विधवांना सन्मानाने जगता यावे यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले.

विधवा पुर्नरविवाह:
विधवा पुर्नविवाह यासाठी त्यांनी चळवळ चालवली. त्यासाठी विवाह मंडळ स्थापन केले. कित्येक विधवांचे पुर्नरविवाह त्यांनी लावले. अन्याय ग्रस्त काशीबाई या विधवेचा यशवंत मुलगा दत्तक घेतला.

स्री शोषण मुक्ती चळवळ:
बालहत्या, बालविवाह, पडदा पध्दती, बहुपत्नीत्व याला ही म.फुले यांनी कडाडुन विरोध केला. स्रीयांना शोषण मुक्त करुन सामाजिक समता व न्यायाची खरी सुरुवात त्यांनी केली.

शिवरायांची समाधी शोधुन काढली:
बहुजनाचे आराध्य दैवत छत्रपती आहेत. छत्रपती हीच खरी बहुजनशक्तीची चळवळी ची प्रेरणा आहे. पण शिवाजी महारांची समाधी रायगडावर कुठे आहे हे लोकांना माहित नव्हते. तेंव्हा म.फुले यांनी रायगडावर जाऊन समाधी शोधली. तिथले काटेरी झुडपे, वन, बाभळी तोडून ती समाधी जागा स्वच्छ केली. तिथे दगडी समाधी परत बांधुन त्यावर फुले वाहुन शिवरांयाची पहिली शिवजंयती सार्वजनिक पणे साजरी म.फुले यांनी केली.

शिवरायावर पोवाडा :
शिवरायावर पहिला पोवाडा म.फुले यांनी रचला. पहिल्या शौर्य पोवाड्याची निर्मिती म.फुले यांनी केली.

अखंड ची निर्मिती :
संत तुकाराम यांच्या अभंगावर आधारित त्यांनी अखंड हे कविता लिहिल्या. हा कवितेचा नविन प्रकार साहित्यात त्यांनी रुजवले. या अखंडांनी सामाजिक प्रबोधनास मोठा हातभार लावला.

दिनबंधु साप्ताहिक: त्या काळात सामाजिक मिडिया जलद नव्हता.वृत्तपत्रे यातुनच क्रांती होत होती.ती गरज ओळखुन समाजापर्यत पोहचण्यासाठी म.फुले यांनी “दिनबंधु” साप्ताहिकातुन लेखनास सुरुवात केली.

अनेक ग्रंथाची व साहित्याची निर्मिती:
म.फुले यांनी विपुल लेखन केले. त्यांच्या लेखनाला धार होती. ही लेखणीच प्रबोधनाचा नविन आयाम होता. यातुन त्यांनी अनेक फटके लगावले. निद्रिस्त, कर्मठ, सनातनी समाजावर प्रहार या लेखणी तुन साहित्याच्या माध्यमातुन केले.
१)गुलामगिरी
२)ब्राह्मणांचे कसब
३)अस्पृश्यांची कैफियत
४)शेतकर्‍यांचा आसुड
५)सार्वजनिक सत्य धर्म
असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. यातुन प्रबोधनाची नविन पहाट त्यांनी उभी केली.

सत्यशोधक समाज व चळवळ:
सन १८७३ म.फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.या देशात बहुजनांना अध्यात्म ,कर्मकांड यातुन मुक्त करायचे असेल तर सत्य शोधणारा एक धर्म हवा या साठी त्यांनी सत्य शोधक समाजाची स्थापना केली. याद्वारे, विवाह लावणे, बुवाबाजी नष्ट करणे, अंधश्रध्दा दुर करणे, धार्मिक कर्मकांड, पुजा अर्चना, होमविधी, यज्ञ बळी, हे कसे खोटे आहे हे पटवणे.

“माणुस जन्माने नाही तर कर्माने श्रेष्ठ ठरतो. कर्मच त्याला श्रेष्ठ ठरवतात. त्याने कोणत्या जातीत जन्म घ्यावा हे त्याच्या हातात नाही, पण त्याने आपल्या कर्माने आपले श्रेष्ठत्व सिध्द करावे” हा कर्मज्ञवाद त्यांनी रुजवला.

त्यामुळेच १८ व्या शतकातील सामाजिक समता, क्रांती, सामाजिक न्याय, स्री शोषण मुक्ती, शेतकर्‍यांचा मुक्तीदाता म्हणजे महानायक क्रांतीसुर्य म.फुले. या क्रांतीसुर्यास त्यांच्या जन्मदिनी कोटी कोटी प्रणाम. शतशः वंदन !

पंकज काटकर

– लेखन : पंकज काटकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !