लेखिका ज्योत्स्ना तानवडे या साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रमांबरोबरच कर्करोग जागृती, पावसाचे पाणी वाचविणे आणि नेत्रदान चळवळीत सक्रिय आहेत. त्यांनी नेत्रदानासाठी सांगली परिसरात १४-१५ वर्षे जागृती व विद्यार्थ्यांची गाईड म्हणून काम केले आहे. नात्यातील ५ व परिचयातील १४-१५ जणांचे नेत्रदान करविले.
आज पासून सलग तीन दिवस आपण जाणून घेऊ या, नेत्रदाना संबंधीचे त्यांचे कार्य, अनुभव आणि विचार….
– संपादक.
पंचमहाभूतांपैकी एक ‘प्रकाश’ हा अखंड उर्जास्त्रोत आहे, चैतन्याचा झरा आहे. ज्ञानाचा दीपक आहे.
आपल्या सभोवतीचा प्रकाश हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भागच असतो. त्यामुळे त्याचे वेगळे अस्तित्व जाणवतही नाही. पण प्रकाशाशिवाय जगण्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही.
आपल्याला सहसा अंधाराचा सामना करायची वेळच येत नाही. कधीतरी वीज गेली तर थोडीशी जाणीव होते. पण मुद्दामच डोळे मिटून काही काम करून बघा, कधी एकदा डोळे उघडतो असे होते आपल्याला! अंधारात चाचपडणे सहनच होत नाही. त्यामुळे संध्याकाळी प्रकाश कमी झाला की आपण उदास होतो. ती वेळ ‘कातरवेळ’ असते. तसेच ढगाने सूर्य झाकला गेला की अंधारते. आपण बेचैन होतो. मळभ दाटून आले म्हणतो. त्यामुळे पूर्ण अंधाराची आपण कल्पनाच करू शकत नाही.
आम्ही दोघे पती-पत्नी १३-१४ वर्षे एका नेत्रपेढीसाठी ‘नेत्रमित्र’ म्हणून काम करत होतो. त्यावेळी अंधत्वाचे विविध पैलू लक्षात आले. दृष्टिदान संकल्पनेविषयी अज्ञान, गैरसमज, अपुरी माहिती या गोष्टी विशेषत्वाने लक्षात आल्या. ‘हा आपला विषय नाही. आपल्याला काय करायचे ह्या चळवळीशी’ अशी अलिप्तता पण दिसली. पण आम्हाला प्रकाशाचे महत्त्व जास्ती लक्षात आले ते या नेत्रपेढीच्या एका विशेष कार्यक्रमात.
एका वर्षी जागतिक दृष्टिदान दिवसाच्या निमित्ताने नेत्रदानातून दृष्टीलाभ झालेल्या तीन जणांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली. त्यांना समक्ष भेटल्यावर त्यांच्या चेहर्यावरील आनंदच त्यांच्या भावना सांगत होता. एक पंचविशीची विवाहित मुलगी, बाळ झाल्यावर तिची दृष्टी गेली होती. आता दृष्टी आल्यावर स्वतःच्या मुलाला डोळ्यांनी प्रत्यक्ष बघता येते हीच सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे हे सांगताना रडू आवरू शकत नव्हती.
एक पन्नाशीच्या बाई आणि ६५ वर्षांचे आजोबा हेही खूप भारावले होते. त्या बाई घरातून फारशा बाहेर न गेलेल्या. मग घर हेच विश्व आणि घरातली कामे करणे हेच एकमेव उद्दिष्ट. पण नजर गेली आणि चुलीवर स्वयंपाक करणे, विहिरीकडे जाणे थांबले. परावलंबित्वाने नैराश्य आले. ते आजोबा पण घरात डांबले गेले. बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला आणि एकटेपणाने घेरले. पण दोघांनाही दृष्टीदानामुळे पुन्हा जगण्याच्या प्रवाहात सामील झाल्याने अत्यानंद झाला होता. स्वयंपाकपाणी, घरातली कामे, एकटे फिरायला जाणे, बाजारहाट, बँकेतली कामे या सर्व गरजेच्या गोष्टी स्वतः करताना मिळणारा आनंद शब्दांबरोबर त्यांच्या चेहर्यावरून ओसंडत होता.
आपल्या दृष्टीने ही किती क्षुल्लक कामे आहेत ना. पण त्यांना त्यासाठी परावलंबित्व आले होते. अशा लोकांना इतरांकडून दुर्लक्षित होते पण शक्य आहे ना ? थोडक्यात निरुपयोगीपणाची जी अगतिक भावना त्यांच्या मनाला घेरून होती ती आता दूर झाली होती.
त्यांच्याबरोबर आम्हाला सर्वांना पण समाधानाचा आनंद मिळाला होता आणि मन वेगळ्याच प्रकाशाने भरून गेले होते. आपण करत असलेल्या कामाची ही अतिशय सुंदर फलश्रुती बघून मन भरून आले.
नेत्रदान जागृतीच्या कामामुळे खूप अनुभव आले. अनेक लोकांशी जोडले गेलो. हे काम करताना आम्ही आमच्या कुटुंबातील पाच जणांचे नेत्रदान करवून त्यांच्या जगण्याची सफल सांगता केली. तसेच ओळखीच्या इतर ८-१० जणांचे नेत्रदान करवून या कार्यात आपला खारीचा वाटा उचललेला आहे आणि अमूल्य समाधानाचे वाटेकरी झालो आहोत.
क्रमशः

– लेखन : ज्योत्स्ना तानवडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800