Friday, December 19, 2025
Homeपर्यटनअमेरिका : माझ्या दृष्टीकोनातून - समारोप

अमेरिका : माझ्या दृष्टीकोनातून – समारोप

अमेरिका : माझ्या दृष्टीकोनातून या लेख मालेचा, आजचा दहावा आणि शेवटचा भाग आहे. दर गुरुवारी प्रसिद्ध होत राहिलेल्या या वस्तुनिष्ठ लेखमाले मुळे, आपल्याला अमेरिका समजण्यासाठी नक्कीच मदत होईल, अशी अपेक्षा आहे. लेखिका प्रतिभा चांदूरकर यांनी अतिशय नेमक्या शब्दात व तटस्थपणे ही लेख माला लिहिली. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांची काही ठिकाणी तुलना करताना, आपले देशवासी अधिक प्रगत, शिस्तप्रिय, स्वच्छ, कायदाप्रिय कसे होतील ? ही तळमळ त्यांच्या लेखनातून व्यक्त होत राहिली, त्याचा आपण सर्वांनी मिळून विचार केला पाहिजे.
त्यांच्या लेखनातील हे सूत्र मला तरी विशेष भावले. चांदूरकर मॅडम यांचे मन:पूर्वक आभार. त्यांच्या पुढील लेखनास हार्दिक शुभेच्छा.
– संपादक

मस्कार रसिकहो..
माझ्या लेखनाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपली ऋणी आहे.. आजचा भाग शेवटचा आहे..

काही गोष्टी जेव्हा आपल्या आयुष्यात अचानक येतात, तेव्हा त्यांची आधी भीती आणि मग सवय होत जाते.

तशीच एक गोष्ट म्हणजे अमेरिकेत मी ज्या भागात रहात होते, तिथली शांतता !
सुरवातीला त्या शांततेची भीती वाटली. अगदी झाडाचं पान ही खाली पडलं, तरी त्याचा आवाज यायचा..इतकी शांतता. एवढ्या शांततेची सवय भारतात मला नाहीच. एकतर रस्त्यावर घर. सतत रहदारी आणि आवाज, अशीच सवय.

सुरवातीला हॉरर मूव्ही अशाच वातावरणात काढत असतील, ह्याची खात्री पटली मला. एक दोन व्हिडिओ काढून पाठवले ही सर्वांना.
घरात ए्झॉस्ट फॅन, कुकरची शिट्टी, वॉशिंग मशीन, सेफ्टी अलार्म ह्यांचेच काय ते आवाज. कित्येक वेळा दचकायला होत असे. मग अश्यावेळी टिव्हीचा आवाज आपला सोबती होतो. वृध्द लोक सतत टीव्ही का बघतात, ते कळते. सोबतीसाठी !

किती महत्वाची गोष्ट आहे ही सोबत. त्याची जाणीव तेव्हाच होते, जेव्हा आयुष्यात एकटेपण भरून असते.
म्हणूनच अमेरिकेत जवळपास प्रत्येक घरात पेट (पाळीव प्राणी) आहे, त्यांचा सोबती.

अमेरिकेत जशी शांतता आहे, तसेच एकटेपण आहे. जर एकटेपण नको असेल तर तुमचा सर्व नातेवाईक, मित्र मैत्रिणींशी संपर्क हवा. ज्यांना एकटेपण, स्वावलंबन आवडते त्यांना तर काहीच प्रश्न नाही.
जे स्वतःची कंपनी स्वतः एन्जॉय करू शकतात, ते तर कुठेही सुखी राहू शकतात. त्यासाठी छंद हवेत आणि ते जोपासायलाही हवेत.

हे छंद जोपासण्याचे टिव्ही वर बघितलेले काही किस्से सांगते. अमेरिकेचा सर्वात मोठा ओ एस पी म्हणजे बहुतेक सर्व नागरिकांकडे पेट असतात. कुत्रा, मांजर आणि काही ठिकाणी घोडा ही ..
टिव्ही वर शो मध्ये हे पेट्स नाच करतात, रिंग मधून उडी मारतात काही तर गाणं ही म्हणतात. बघून खूप मजा वाटते. त्यासाठी त्यांना ट्रेनिंग ही देत असतील. असे जे व्यस्त असतील, त्यांना एकटेपणाचा त्रास होत नसेल.
म्हणूनच छंद ही महत्वाची गोष्ट आहे..

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शांतता भंग न करणारे त्यांचे सण आणि नियम ही. आपल्याकडे गणपती, नवरात्र, पाडवा हे सण आपण साजरे करतो, ते लाऊड स्पीकर, ढोल ताशे घेऊनच. त्या व्यतिरिक्त इतर धर्मीय ही लाऊड स्पिकरचा वापर करतात. प्रचंड व्हॉईस
पोल्यूशन होत आपल्याकडे. काही घरात आजारी, काही वृध्द, लहान मुलं ह्यांना ह्या पोल्यूशनचा खूप त्रास होतो, ह्याचा विचार आपण करत नाही.
प्रार्थना शांततेत करावी आणि ध्यान धारणा ह्याचे महत्व आपल्या संस्कृतीत असताना, आपण हा प्रचंड आवाजाचा मार्ग का स्वीकारला ह्याचेच आश्चर्य वाटते.

अमेरिकेत सर्व धर्मासाठी एकच नियम आहे. सर्व नियम नाटकं न करता पाळले जातात. हा एक महत्वाचा मुद्दा आहे.
आपल्या देशात नियमांची दयनीय अवस्था करणारे नेतेच आहेत आणि त्यांना साथ देणारे त्यांचे चेले. स्वकर्तृत्व काही नसल्यामुळे कुणाचे तरी चेले बनून भाव मारणं हाच ह्यांचा स्वभाव असावा. सर्वांची माफी मागून मी हे लिहीत आहे. त्याला कारण हे सगळ अनुभवलेले आहे. सगळे असे असतात असे नाही, पण अश्या लोकांचं प्रमाण जास्त आहे, हे मात्र खरे.

आपला देश ही नियमानुसार चालावा अशी इच्छा
बहूसंख्य नागरिकांची आहे. पण त्याच्यात आड येत राजकारण.
राजकारण आणि मीडिया ह्यांचे नातं तर प्रत्येक देशात आहेच. प्रत्येक देशात नेते आहेत. त्यांचे समर्थकही आहेत आणि आता तर प्रत्येक पक्षाचा स्वतःचा मीडिया आहे. देश कुठलाही असो. माझा पक्ष आणि नेताच कसा बरोबर आहे हे ओरडून ओरडुन सांगणं हे ह्या मीडियाचे काम.
असेच काही मीडिया, हॉट चर्चा मी तिथे टिव्हीवर पाहिल्या आणि मला हसायला आले. सगळ जग इथून तिथून तसच झालंय का ? असा प्रश्न ही पडला. मग आठवली काही माणसं, लोकशाही टिकवण्यासाठी प्रयत्न करणारी.

अजून एक चर्चा मी तिथे ऐकली, ती म्हणजे कोणी माथेफिरू गोळीबार करत सामान्य नागरिकांना मारतो त्याची. अमेरिकेत अश्या घटना सर्रास घडतात. कारण एकच बंदुकीचा मिळत असलेला परवाना. मला तर बऱ्याच अमेरिकन नागरिकांच्याकडे पिस्तूल, पँटला अडकवलेली दिसली. पण भारतीय लोकांच्याकडे नाही दिसली. अपवाद असतील.
तर ह्या चर्चा तिथे फारच रंगतात. मीडियावर तर जास्तच. मग त्या व्यक्तीची मन:स्थिती, त्याचा लहानपणापासूनचा इतिहास, त्यांच वागणं, घरची परिस्थिती ह्यावर उहापोह होत असतो.
आपल्याकडे जशी राजकारणात एखादी गोष्ट घडली की चाऊन चोथा करतात, अगदी तशीच.

माझ्या लेकाकडे गिझर रिपेअर करायला एक व्यक्ती आली, तिच्याकडेही गन होती, ती पाहून मी अस्वस्थ झाले.
समजा ह्या व्यक्तीचं कोणाशी भांडण झालं आणि रागाच्या भरात त्याने गन काढली तर ? माझ्या मनात बराच वेळ ते विचार राहिले हे मात्र खरे.
आपण आपल्या मुलांना सल्ला देत राहतो कोणाशी भांडण, वाद घालू नका असा. तरी मनात येत की काही चूक नसताना सामान्य नागरिकांना मारणारे तर दोषी आहेतच, पण ही गन ठेवण्याची परवानगी ही चुकीची आहे.

खरे तर त्यांची पोलीस यंत्रणा अतिशय सक्षम आहे. सुरक्षितता वाढवली तर गन ठेवण्याची गरज वाटणार नाही. त्या मानाने आपला देश खरच सुरक्षित वाटतो. आपल्या प्रत्येकाच्या खिशात गन ठेवण्याची वेळ अजून तरी आली नाहीये आणि तशी येऊ ही नये हीच इच्छा.

अमेरिकेत आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे तिथल्या लायब्रऱ्या. तिथली भव्य देखणी वास्तू. उत्तमरित्या सांभाळलेल्या. त्या बघून मला खूप आनंद झाला.
अनेक प्रकारचं साहित्य होते त्यात. मला बघायला मिळाल्या ह्यातच समाधान मानाव लागलं. सुट्टी असल्यामुळे तिथे बसून वाचनाचा आनंद मला घेता आला नाही. परत असा आनंद मिळावा, ही इच्छा मात्र आहे.
आपल्याकडे मात्र अश्या प्रकारे सांभाळल्या जात नाहीत ह्याच वाईट वाटल.

प्रत्येक देशात काही चांगले, काही वाईट असतेच. म्हणून संपूर्ण देश चांगला किंवा वाईट म्हणता येत नाही.
अमेरिकेत आम्हाला माझा भाचा, फॅमिली फ्रेंडचे भाऊ, वहिनी भेटले. खूप प्रेमाने सर्व करणारे. त्यांच्यामुळे अमेरिकेत बऱ्याच ठिकाणी फिरलो. काही गोष्टी राहून गेल्या. परत योग येईलच.

हे सगळे ऋणानुबंध आहेत, अस मी मानते. आम्ही दोघेही त्यांचे खूप ऋणी आहोत. हे ऋणानुबंध जपण्यासाठी ते भारतात आले तर त्याची ही तितक्याच प्रेमाने सेवा करण्याचा योग येऊ दे आणि परत परत अमेरिकेला भेट देण्याचा योग येऊ दे, अशी मनापासून इच्छा..

जगण्याचा खरा अर्थ म्हणजे प्रेम देणे आणि घेणे. मग देश कुठलाही असो !
धन्यवाद..
समाप्त.

प्रतिभा चांदूरकर

– लेखन : प्रतिभा चांदूरकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ.मृदुला राजे on माहितीतील आठवणी : 37
सौ.मृदुला राजे on चित्र सफर : 58
गोविंद पाटील सर on बहिणाबाईं…