शालान्त परीक्षा : यश अपयश !
दिवंगत तु॰ ना॰ देवरे हे हिन्दी, उर्दू, अरेबिक भाषांचे जाणकार होते॰ 1950 च्या दशकात महाराष्ट्रात,
‘महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे. ही हिंदीचा प्रचार करणारी शासकीय संस्था स्थापन झाली होती॰ तिचे हे देवरे; गो॰ प॰ नेने यांच्याबरोबरचे अध्वर्यु॰
या देवरे यांची मुलगी सुधा ही 1959 साली शालान्त परीक्षेत बोर्डात पहिली आली होती॰ सुधा देवरे नंतर 1962 साली सुलभा शेटये ही आणि हिचा धाकटा भाऊ 1965 साली असे बहिण भाऊ शालान्त परीक्षेत बोर्डात प्रथम आले होते॰ 1963 साली शुभांगी सबनीस; अशा नंतर किती तरी विद्यार्थिनी बोर्डात प्रथम आल्या॰
1995 साली बोर्डात डोंबिवलीची अपर्णा गोळे प्रथम आली. ही माझी पत्नी लीनाची विद्यार्थिनी ! काही वर्षांपूर्वी ‘म. टा.‘ ने शालान्त परीक्षेतल्या गुणवंतांचा सत्कार नाट्य अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर हिच्या हस्ते केला होता. त्यावेळेस या गुणवंतांचा सत्कार या नाट्य अभिनेत्रीच्या हस्ते का केला म्हणून कित्येकांनी भुवया उंचावल्या होत्या. पण ही प्रतीक्षा लोणकर 1981 साली छत्रपती संभाजीनगरच्या बोर्डाच्या शालान्त परीक्षेत गुणवत्ता यादीत आली होती. नंतर आपल्या कोचिंग क्लासमुळे अफाट लोकप्रिय झालेले मच्छिंद्र चाटे हेही याच बोर्डाच्या गुणवत्ता यादीत त्याच वर्षी झळकले होते.
नाट्य आणि चित्रपट व्यवसाय सुरु झाल्यापासून यांत शिरणारे अभिनेते / अभिनेत्री हे जेमतेम प्राथमिक शिक्षण झालेले असत; आणि ते (विशेषत: मुलगे) पळून जाऊन त्या कंपन्यांत सामील होत असत. यांतील कित्येक जण ‘अंगठा छाप‘ असत !
त्या काळातले गद्य अभिनय करणारे केशवराव दात्ये यांनी नाटकाची चांगली समज आल्यावर प्रख्यात नॉर्वेजियन नाटककार इब्सेन याची नाटके वाचायचं ठरवलं. सुरवातीला जवळ जवळ प्रत्येक शब्दाचा अर्थ इंग्लिश डिक्शनरीत बघून, त्यांनी ती वाचली !
नंतर स्वातंत्र्य काळात शिक्षणाचा प्रसार वेगानं झाला; आणि 1961 नंतर मातृभाषेत महाविद्यालयीन शिक्षण घेता येऊ लागल्यावर 5,000 – 10,000 वस्तीच्या गावांतही महाविद्यालये सुरु झाली; आणि शिक्षणाचा प्रसार झपाट्यानं झाला. त्यामुळे आता विविध अभ्यासक्रम आणि विषयांत पदव्या घेतलेले अभिनेते / अभिनेत्री या क्षेत्रात येऊ लागले. इतकंच नव्हे तर नाट्य / चित्रपट विषयांतील प्रशिक्षण घेऊन आता या व्यवसायांत मुलं / मुली येऊ लागले.
स्वाभाविकच, नुसतेच उच्च शिक्षित नव्हे, तर अभ्यासक्रमांत गुणवत्ता यादीत झळकलेले किती तरी अभिनेते / अभिनेत्री आता आहेत.
वरती प्रतीक्षा लोणकर शालान्त परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्याचा उल्लेख आला आहे. अलीकडच्या काळातील एक सुस्वरूप आणि गुणी अभिनेत्री इला भाटे (माहेरची इला पातकर) ही शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकली होती.
1990 च्या दशकात दूर दर्शन मालिका, नाटक आणि चित्रपटांत अभिनय केलेली गुणी अभिनेत्री निशिगंधा वाड ही तर दहावी आणि बारावी अशा दोन्ही परीक्षांत गुणवत्ता यादीत झळकली होती !
तिची खरं तर वैद्यकीय अभ्यास क्रमात सहज निवड होऊ शकली असती, पण तिनं अभिनयात करीअर करायचं ठरवल्यामुळे ती ‘आर्ट्स‘ अभ्यासक्रमात दाखल झाली.
1990 च्या दशकाच्या अखेरीस नाट्य – चित्रपटात दाखला झालेली (आता डॉ.) समीरा गुजर ही देखील बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकली होती. नंतर तिनं संस्कृत विषयात Ph. D. केली.
गेल्या काही वर्षांत नाटकांत आणि चित्रपटांत संभाजी आणि शिवाजी महाराज यांच्या भूमिका करून अफाट लोकप्रियता मिळवलेला डॉ. अमोल कोल्हे हा ही दहावी / बारावीच्या परीक्षांत गुणवत्ता यादीत चमकला होता. नंतर त्यानं वैद्यकीय अभ्यासक्रमही चांगले गुण मिळवून पूर्ण केला.
प्रख्यात नाट्य लेखक, दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर हे ही शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत आले होते.
नासिकच्या ‘गोखले शिक्षण संस्थे‘ चे अत्यंत बुद्धिमान परंतु वादग्रस्त ठरलेले पदाधिकारी डॉ. मो. स. गोसावी यांनी, शालान्त परीक्षेत पहिले आलेले / गुणवत्ता यादीत झळकलेले विद्यार्थी नंतर तितकेच यशस्वी ठरले का, हे जाणून घेण्यासाठी, 1980 च्या दशकात एक सर्वेक्षण केलं होतं. बहुतेकांनी नंतर प्रगती केली; पण बऱ्याच जणांना ते यश टिकवता आलं नाही; असाच त्यांचा निष्कर्ष होता. या पैकी कित्येक जण नंतर परदेशांत (अमेरिकेत) स्थायिक झाले असं दुसऱ्या एका सर्वेक्षणात आढळून आलं !
स्वत: डॉ. मो. स. गोसावी यांनी त्यांचा शालेय दिवसां पासून असलेला प्रथम क्रमांक पदवी / पदव्युत्तर परीक्षेपर्यंत कायम राखला !
वरती इला भाटे हिचा गुणवत्ता यादीत चमकल्याचा उल्लेख आहे. हिला पण ते यश बारावीच्या परीक्षेत टिकवता आलं नाही; आणि त्यामुळे तिला तिच्या मनाप्रमाणे वैद्यकीय अभ्यासक्रमाला जाता आलं नाही ! मात्र, नुकतेच निधन पावलेले निवृत्त सनदी अधिकारी शरद काळे हे शालान्त परीक्षेत पहिले आले होते. त्यांनी त्यांचे यश I.A.S. परीक्षेपर्यंत टिकवून ठेवले. तीच गोष्ट 1961 साली शालान्त परीक्षेत सर्व प्रथम आलेला, माझा वर्ग मित्र, डॉ. हेमचंद्र प्रधान याची !
यानंही त्याच्या यशाची कमान सतत चढती ठेवली !
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी आणि नव्वदच्या दशकात राष्ट्रपती झालेले डॉ. शंकर दयाळ शर्मा यांनीही त्यांचे यश कायम राखले. हे दोघेही महाविद्यालयीन परीक्षांत सर्व प्रथम आले होते. सी. डी. देशमुख यांनी तर शालान्त परीक्षा ते I. C. S. परीक्षेपर्यंत आणि नंतरही यशाची पताका फडकत ठेवून या सर्वांचे मुकुटमणी म्हणून स्थान प्राप्त केले आहे !
जाता जाता….
या इला पातकरचे वडील माधव पातकर हे ही नाट्य अभिनेते होते; आणि 1962 साली ऑक्टोबरमध्ये आचार्य अत्रे लिखित विक्रमी नाटक ‘तो मी नव्हेच !‘ याचे सुरवातीचे दिल्ली, ग्वाल्हेर, नासिक असे प्रयोग करत मुंबईला येत असताना नासिक — मुंबई प्रवासात कारला अपघात झाला; आणि त्यात ते दुर्दैवीरित्या निधन पावले.
यांच्याबरोबर, याच अपघातात, दुसरे नाट्य – चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दत्तोपंत आंग्रेही निधन पावले.
विसाव्या शतकाच्या सुरवातीला शालांत परीक्षेत पहिले आलेले, संतती नियमन चळवळीचे आद्य प्रणेते र. धों. कर्वे हे नंतर पदवी परीक्षेत चक्क अनुत्तीर्ण झाले !
निशिगंधा वाड हिने तर तीन विषयांत Ph. D. पूर्ण केलेली आहे ! तीन विषयांत Ph. D. केलेली माझ्या माहितीतील ही एकमेव व्यक्ती ! छत्रपती संभाजीनगर स्थित डॉ. यु. म. पठाण यांनी दोन विषयांत Ph. D. केली आहे. निशिगंधाची सख्खी बहिण आणि अन्य चुलत, मामे भावंडं ही सुद्धा गुणवत्ता यादीत चमकली आहेत !
1962 साली पहिल्या आलेल्या सुलभा शेट्येचे 1984 – 85 च्या सुमारास ऐन चाळीशीत कर्क रोगाने निधन झाले होते॰ हिच्यावर प्रा॰ म॰ वा॰ धोंडांनी मृत्यु लेख लिहिला होता॰
1963 साली झालेल्या शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकलेला दापोलीचा सुरेश तांबे हा ते यश नंतर टिकवू न शकल्यामुळे त्याला अभियांत्रिकेत पदविका अभ्यासक्रम घ्यावा लागला; आणि त्याच परीक्षेत गुणवत्ता यादीतील तिसावा क्रमांक केवळ एका गुणानं हुकलेला सुभाष सावरकर यानं इंटर सायन्स परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदकाची कमाई केली !
हे दोघेही माझ्याबरोबर VJTI मध्ये होते !

– लेखन : प्रकाश चान्दे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800