शुभ्र नेहरुशर्ट, शुभ्र धोतर आणि शुभ्र टोपी याच वेशात ज्यांना मी आयुष्यभर पाहिले, ज्यांचे जीवन अगदी साधे सरळ भाबडे आणि तितकेच खडतरही होते त्या माझ्या वडिलांनी माझ्या आयुष्यातील जवळ जवळ सगळाच भाग व्यापलेला आहे. माझे बालपण, किशोर आणि तरुण वय त्यांच्या सावलीत गेलेले आहे
रविवार दि १५/४/१९१७ रोजी त्यांच्या जन्माने घरातल्यांना आनंद झाला म्हणून त्यांचे नाव ‘आनंदा’ ठेवण्यात आले. त्यांच्या पाठोपाठ यमुना ‘दगु’ ‘मुरलीधर’ झाले. नगरसूल गावात शेती होती. लहानपणी आंब्याच्या झाडावरुन पडण्याचे निमित्त झाले आणि वडिल डाव्या हाताने अधू झाले. शेतीच्या कामासाठी कुचकामी ठरले. शेळ्या मेंढ्या सांभाळायच्या कामाचेच फक्त उरले.
मालेगावच्या मामा त्यांना आपल्याकडे शिकायला घेऊन गेले. तिथे व्हर्नाक्युलर फायनल म्हणजे सातवीपर्यंत शिकले. ते सांगायचे, तेल्याच्या दुकानात ते दिवसभर तेल विकायचे. मोठे कष्टाचे ते दिवस होते.
त्यांनी नंतर नाशिकमध्ये पीटीसी केली. खिर्डीसाठे इथे शाळा सुरु केली. पुढे मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या बाल शिक्षण मंदिर, गोराराम गल्ली नाशिक येथे प्राथमिक शिक्षक म्हणून लागले.
पहिली पत्नी हाडके घराण्यातील होती. वडील नाशिकमध्ये नोकरी करीत होते तरी ती नगरसूलला शेतीकाम करायची. बाळकृष्ण तीन वर्षाचा असताना व उषाचा नुकताच जन्म झाला तेव्हा ती त्यांना सोडून देवाघरी गेली
तेव्हा ते पंचवटीत रहायचे. नगरसूलची सकडे आजी भोईरवाड्यात बहिणीकडे यायची. तिने वडीलांना पाहिले. माझी आई तिची भाची. तिच्यासाठी माझे वडील योग्य वाटले. तिने मग लग्न जुळवले.
तुटपुंज्या पैशात संसार सुरु झाला. पहिल्या पत्नीची मुलं आई सांभाळणार नाही असा त्यांना त्यावेळी सल्ला मिळाल्याने त्यांना त्यांनी आपल्या बहिणीकडे ठेवले. आईला तिच गोष्ट मनस्वी लागली. वडील पगारातून त्या दोन मुलांचा संभाळ करण्यासाठी बहिणीला वरचेवर पैसे द्यायचे त्यामुळे घरात चणचण भासायची. त्यावरुन आई बाबा यांच्यात नेहमी खटके उडायचे.
आई आणि बाबा यांच्या वयातही खूप अंतर होते. आई वयाने लहान सुंदर होती. सगळ्यांमध्ये उजवी होती. त्यामुळे तिचा सगळ्यांकडून दु:श्वास होत रहायचा. कोणी आईला चांगले पहायचे नाही. तिने खालुन वाहून आणलेल्या प्यायच्या पाण्यात आधीची मुलगी राख टाकून द्यायची. खणदूसपणे वागायची
बाबांचा आईवर खूप जीव होता. तिचा संताप राग सहन करुन घ्यायचे. आई रागावली की बाबा घराबाहेर निघून जायचे.
शुक्रवार दि १५ फेब्रुवारी, १९७४ रोजी आई कॅन्सरने गेली तेव्हा वडील एकटे पडले. घरातला स्वयंपाक पाणी एका हाताने करुन ते शाळेत जायचे. घरातली भांडी ते एका हाताने घासायचे. मी तेव्हा आठवीला होतो. असमंजस आणि हट्टी होतो. एकदा दारावर लाकडी टेबल विकायला आले तर मला अभ्यासाला वडीलांनी घेऊन दिले. टेबलाला खुर्ची पाहिजे म्हणून मी हट्ट धरला तर वडीलांनी मला फर्निचरच्या दुकानात नेऊन माझ्या पसंतीने घडीची लाकडी खुर्ची घेऊन दिली. खुर्ची घेऊन आम्ही रामसेतू पुलावरुन येत होतो तेव्हा श्रीराम विद्यालयाचे तेव्हाचे मुख्याध्यापक श्री टेकाडे गुरुजी भेटले. ते माझ्याकडे पाहून म्हणाले गुरुजींना किती त्रास देतो.
एकदा हट्ट करुन मी बाबांना किशोर मासिक घ्यायला लावले होते. दोन रुपये किंमत होती तरी तेव्हा ते महागच होते. तेवढ्या किमतीत तेव्हा दोन तीन किलो गहू मिळायचा.
बाबा जून १९७६ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्या आधी फंडातून पैसे काढून उषाचं लग्न करुन दिले. सेवानिवृत्त झाले पण पेन्शन नाही. खासगी संस्थेत तेव्हा पेन्शन नव्हते. घरातले एकेक पितळी भांडे कुंडे विकून एकेक दिवस कसाबसा चालला होता. तेव्हा आम्ही दोघेच लाटेवाड्यातच पण आतेमामांच्या शेजारी रहायचो. आतेमामांनी आत्या गेल्यानंतर दुसरे गंधर्व लग्न केले होते. बाळकृष्ण आणि उषा तेव्हा आतेमामांकडेच रहायचे. उषाच्या लग्नात जेवण कमी पडले तर आतेमामाने आईच्या हातची मोठी पंचपात्री ठेवून घेतली व पैसे पुरवले तेव्हा पंगतीत वाढता आले.
सणासुदीला इकडे आम्ही दोघे आज काय खायचे या विवंचनेत असायचो तर शेजारी मोठमोठ्याने मामा श्रीखंड काय मस्त आहे असे मुद्दाम आवाज यायचे. आतेमामाने बाळकृष्णाला मालविय चौकात रथ रस्त्याच्या कोपर्यावर पानपट्टी टाकून दिली होती. कधी कधी मीही त्या पानपट्टीवर बसायचो. सेवानिवृत्त झाल्यावर उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते. तेव्हा आतेमामाने पंचवटी कारंजावरील एक पानपट्टी बाबांना चालवायला दिली. तेव्हा मी दहावीत गेलेलो होतो. पानपट्टीच्या माळ्यावर व घरी रात्री आल्यावर रस्त्यावरील लाईटच्या उजेडात मी अभ्यास करायचो. घरात लाईट नव्हती. चिमणीच्या उजेडात आम्ही रहायचो.
खूप जणांनी उधारी बुडवल्याने पानपट्टीही चालली नाही. मग बाबा चार रुपये रोजाने द्राक्षाच्या बागेत रात्री राखणदारी करायला तपोवनाकडे जायचे. येताना जाळण्यासाठी रानातून काड्याकुड्या गोळा करुन आणायचे. एकदा आतेमामाने त्यांच्याकडील कोरिया जपानची भारी पॅन्ट घालायला दिली आणि दुसरया दिवशी मागूनही घेतली होती. सकाळी गाणगापूरहून आणलेल्या सोन्याच्या साखळ्यांच्या गप्पाही कधी कधी ऐकू यायच्या.
मी दहावीत गेलो तेव्हा एकमुखी दत्ताकडे रहात असलेल्या पिसोळकर सरांनी त्यांची जुनी खाकी फुलपॅन्ट जी मागे सीटवर विरली होती ती देऊन ठिगळ लावून वापर असे सांगितले होते.
तो काळच वेगळा होता. आज तो धूसर सोनेरी भासत आहे. पावसाळ्यात वडील घरी यायचे तेव्हा मोठी बंद छत्री ते दाराच्या पाठीमागे उभी करुन ठेवायचे. धोतर वर पोटरयांवर खोचलेले असायचे. ‘काय शिळंदार पाऊस’ असे अंगभर ओले कपडे झटकत म्हणायचे. ‘जरा पल्याड जाऊन येतो’ म्हणून टोपी चढवून ते निघायचे. एकदा मला त्यांनी गोदावरी पलिकडे यशवंतराव पटांगणातून चढ असलेल्या मार्गाने त्यांच्या शाळेत नेले होते. बाल शिक्षण मंदिर ही गोराराम गल्लीतील शाळा भरायची तो एक वाडाच होता. वर्गात मुलं जमीनीवर बसकर पट्ट्या टाकून बसायचे. दर शनिवारी वर्ग सारवायचे. वडील उत्तम चित्रकार होते. बालभारतीच्या इयत्ता पहिलीच्या पुस्तकातील रंगीत चित्रे त्यांनी हुबेहुब त्याच रंगात रंगवून वर्गात लावली होती. तेव्हाच्या लोकराज्य वगैरे मासिकातील चित्रे, पक्षांची पिसे, राजा रवीवर्माने काढलेल्या श्रीकृष्णाची चित्रे यांचा सुंदर चित्र संग्रह त्यांनी बनवलेला होता.
इयत्ता तिसरीच्या बालभारतीच्या पुस्तकातील शिवाराची श्रीमंती, जत्रा, माझ्या मामाची रंगीत गाडी इत्यादी धडे कवितांची त्यांनी आपल्या वळणदार निळ्या अक्षरात काढलेली टिपणवही मी अजून जपून ठेवली आहे. त्यांचे अक्षर मोत्यासारखे टपोरे सुंदर होते. एका वहीत माकडा माकडा कान कर वाकडा सारख्या बडबड गीतांचा त्यांनी स्वअक्षरात केलेला संग्रह देखील मी जपून ठेवला आहे. मोडीमध्ये त्यांची आ गो कुडके ही स्वाक्षरी सर्वत्र असायची.शाळेतून सायंकाळी परतताना ते हमखास मालविय चौकातून मोठी बालुशाही घेऊन यायचे.
मला घेऊन ते शाळेत जायचे तेव्हा दुपारच्या सुट्टीत सुंदरनारायण मंदिराजवळील त्यांच्याच एका विद्यार्थ्याच्या हाॅटेलमध्ये घेऊन जायचे व मस्त गोल भजी खाऊ घालायचे.वर्गात ते शिकवायचे तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा अगदी धाक होता. चुकले की त्यांच्याकडून जोरात गुद्दा मिळायचा. कधी कधी तर ते कानही अगदी लाल होईपर्यंत पिळायचे. पाढे बाराखडी धडे कविता ते अगदी घटवून घ्यायचे. मुलांचे पालक शाळेत आले की ते वडीलांशी अगदी घरच्यासारखे बोलायचे.
वडील त्या शाळेचे कीर्द खतावणी सुद्धा लिहायचे. स्व. खासदार वसंत पवार हे त्यांचे विद्यार्थी होते. सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला तेव्हा वडील ८७ वयाचे होते. तेव्हा स्व. खासदार वसंत पवार त्यांना म्हणाले ‘मला ओळखले का गुरुजी ? मी तुमचा विद्यार्थी, तुम्ही माझा कान पिळला होता !’ वडीलांनी आठवून आठवून मग मान हलवली होती.बाल शिक्षण मंदिर या शाळेत मागील बाजूस एक दगडी चौक होता. तिथे सुतकताईचे चरखे असायचे. मोठ्या वर्गातील मुलांना ते सुतकताई सुद्धा शिकवायचे.
बाल शिक्षण मंदिर, गोराराम गल्ली, गोदाकाठ, नाशिक ही शाळा आता नव्या रुपात उभी आहे. पण एकेकाळी ही शाळा वाड्याच्या रुपात होती. या शाळेत माझे वडील १९७५ पर्यंत मुख्याध्यापक म्हणून होते. वर्ग तेव्हा शनिवार रविवार सारवले जायचे. एका वर्गात वडीलांनी बालभारतीच्या पुस्तकातील चित्रं स्वत:काढून लावलेली मला आठवतात.
एकदा हिरे सरांनी फळ्यावर Hire लिहून माझ्या इंग्रजी भाषेची परीक्षा पाहिल्याचे मला आठवते. मी आपलं हायर न म्हणता हिरे असंच वाचत राहिलो याचं आज हसू येते. याच शाळेवर योगायोगाने डीएड ला असतांना पाठ घ्यायला मिळाले. इंग्रजी मधील एक म्हातारी आकाशातील कोळिष्टके साफ करते अशा अर्थाची एक इंग्रजी कविता मी इंग्रजीतून शिकविल्याचे व त्यावर विद्यार्थिनी मराठीतून नेहमी शिकवलेलं समजत नाही मात्र इंग्रजीतून कविता किती छान समजल्याचे उद्गार काढल्याचे मला आठवतात. कविवर्य नारायण सुर्वे यांची गिरणीची लावणी ही कविता मी शिकविल्याचे आठवते. तेव्हाचे विद्यार्थी, डीएडचे विद्यार्थी शिक्षक, तेव्हाच्या वाड्यातील शाळा…
१९८७-८८ मधील या काही चित्ररुप आठवणी ! अशा कितीतरी आठवणी जाग्या झाल्या आहेत.

– लेखन : विलास कुडके
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान.सुंदर.गेले ते दिवस राहिले त्या आठवणी