Monday, July 14, 2025
Homeपर्यटनअमेरिका : खोबऱ्याची बर्फी पांघरलेले डोंगर

अमेरिका : खोबऱ्याची बर्फी पांघरलेले डोंगर

अमेरिकेतील रिनो, नेवाडा इथे मार्च महिन्यात जाण्याचा आणि राहण्याचा योग आला आणि इथेच मला हे पांढरीशुभ्र बर्फी लपेटून बसलेले डोंगर दिसले. ते इतके देखणे दिसत होते ते की वाटलं असेच जावे आणि मूठ मूठ भरून त्या डोंगरावर विखुरलेली बर्फी गोळा करून आणावी !

यापूर्वी मी स्वित्झर्लंडचे सुंदर, धवल डोंगर पाहिले होते. त्या सौन्दर्याने मी पाघळले होते. पण ते सौन्दर्य नाजूक, कोमल आहे. त्याला साजूक तुपाचा हात लागला आहे तर नेवाडाचे सौन्दर्य जरा कठोर, कोरडे भाजलेले. याचे कारण नेवाडा हे वाळवंट आहे. हा संपूर्ण भूभाग ‘डेजर्ट’ म्हणून ओळखला जातो. हे मला अधिक अभ्यास केल्यावर समजले.

माझ्या मुलीचे अपार्टमेंट स्पार्क इथे आहे. ही एक सुबक, देखणी तीन मजली उंचीच्या दहा बारा इमारतींची कॉलनी आहे. मार्च म्हणजे थंडीचा कडाका. तापमान शून्य ते पंधरा सेल्सिअस पर्यंत जातयेत होते. त्यामुळे जरासे ऊन पडले की मी जॅकेट चढवून बाहेर पडत असे.

रिनोला राहायला गेल्यावर मी दुसऱ्याच दिवशी थंडीची बंधनं झुगारून घरा बाहेर पडले. इमारतींना वळसा घालून बाहेर उघड्या मैदानावर आले आणि अहो आश्चर्यम ? ते डोंगर अगदी काही अंतरावर माझ्या समोर बसलेले दिसले. अंगभर खोबऱ्या सारखी पांढरीशुभ्र बर्फी लेवून. मधून मधून चांदीच्या वर्खां ऐवजी कॉफी रंगाचा भाजका चुरा दृष्टीस पडत होता. नेहमीपेक्षा वेगळेच दृश्य दिसत होते. टक लावून पाहत बसावेसे वाटत होते.

त्या डोंगरांनी माझ्यावर मोहिनी टाकली. मग मनातल्या मनात त्यांची नजर काढून मी घरी परत आले. आठवण म्हणून त्यांच्यावर लिहायला बसले.

अमेरिका हा प्रचंड मोठा देश आहे आणि एकूण ५० राज्यात विभागला गेला आहे. अमेरिकेतील प्रत्येक राज्याचे वैशिट्य वेगळे. कायदे कानून वेगळे. भूगोल वेगळा आणि इतिहास वेगळा. या देशाचा इतिहास मोठा नाही पण भौगोलिक देणगीचा पुरेपूर उपयोग करून यांनी आपली समृद्धी जोपासली आहे, याचा प्रत्यय अमेरिकेतील कोणत्याही राज्यात गेलात तरी येतो.

नेवाडा राज्याच्या पश्चिमेला कॅलिफोर्नियाची सीमा आहे. पण तरीही दोन्ही राज्यात अनेक नियम आणि कायदा या बाबतीत फरक आहे.

नेवाडा राज्यात पूर्वी पाउट, शोशोन आणि वशॊ नावाच्या आदिवासी वस्ती होत्या. स्पॅनिश लोकांनी या प्रदेशाचा शोध पहिल्यांदा लावला. त्यांनी हे इथले बर्फ पांघरलेले डोंगर पाहिले आणि त्याला नेवाडा म्हणजे बर्फ पांघरलेले डोंगर असे नाव दिले.
स्पेन मध्ये अशा डोंगरांचा प्रदेश ‘सिएरा नेवाडा’ म्हणून ओळखला जातो.

अमेरिकेतील सर्व राज्यांना लोकसंख्ये अनुसार क्रमांक दिले तर नेवाडा हे ३२ क्रमांकावर येते.
नेवाडात रिनो, लास वेगास, कार्सन, स्पार्क्स अशी प्रसिद्ध शहरे आहेत.

रिनो इथे टेस्ला फॅक्टरी असून हे शहर नैसर्गिक सौन्दर्याने नटले आहे. वर्षातील नऊ महिने थंडी असून बाकीच्या महिन्यात उन्हाळा असतो. पण हा हिवाळा, उन्हाळा वाळवंटातील असल्याने थंडी आणि ऊन दोन्हीही टोकाचे आहेत असे अनुभवयास येते. डोळ्यांना प्रखर ऊन दिसत असताना आपण बिनधास्त रस्त्यावर जावे तर थंड बोचऱ्या थंडीने प्रचंड गारठण्याची वेळ येते. सूर्य भर माथ्यावर असताना अंगात जाड थंडीचे कपडे, डोक्यावर वूलन टोपी घालावीत लागते कारण तापमान चक्क शून्य किंवा त्याखालीही असू शकते. त्यामुळेच या डोंगरांवर ही पांढरीशुभ्र बर्फी सदोदित बनत असते.

आश्चर्य म्हणजे डोळ्यांनी ह्या बर्फीचे सुख अनुभवत असताना, गाडीने काही अंतर काटल्यावर पुढे हिरवे हिरवे गालिचे पांघरलेले डोंगर दिसू लागतात आणि डोळ्यावर विश्वास बसत नाही. त्यानंतर मधून मधून करडे, काळे डोंगर दर्शन देत राहतात.

कार्सन सिटी ही नेवाडा राज्याची राजधानी आहे पण लास वेगास हे तुलनेने जास्त प्रसिद्ध शहर प्रत्येकालाच माहित असेल. याचे कारण हे जगातील मोठे जुगाराचे केंद्र आहे. गॅम्बलिंग करण्यासाठी इथे जगभरातून माणसे येतात.

नेवाडा राज्यातील गुन्ह्यांची संख्या कमी असल्यामुळे हे राज्य सुरक्षित मानले जाते. तसेच आणखी महत्वाचे म्हणजे इथे टॅक्स कमी असतो.

पिरॅमिड लेक रिनो पासून साधारण अर्धा तासाच्या प्रवासानंतर (अर्थात कारने) पिरॅमिड लेकला जाता येते. मी गेले त्यावेळी संध्याकाळचे धूसर वातावरण होते. आकाशात चांदण्या उगवत होत्या तर रस्त्यावरच्या पिवळट मातीवर संध्याकाळच्या सावल्या पसरल्या होत्या.

माझ्या मुलीचे ड्रायविंग उत्तम आहे त्यामुळे मी निर्धास्त होऊन तिच्यावर सारथी पद सोपवून आजूबाजूचे निसर्ग सौन्दर्य न्याहाळत होते. बाहेर प्रचंड थंडी होती. १० डिग्री सेल्सिअस म्हणजे तिथल्या लोकांसाठी ‘प्लेजन्ट’ वातावरण होते. मुलीने फक्त एक टीशर्ट तर मी जाड लोकरी जॅकेट आणि हुडी पांघरून. तरीही कुडकुडत होते.

गाडीखाली उतरल्यावर थंड हवेचा झोत अंगावर आला. अंग शहारले. त्यामुळे इतक्या अप्रतिम सौन्दर्य स्थळाचा आनंद उपभोगु शकले नाही. स्थानिक लोक मात्र गाड्या थांबवून कॅम्पिंग साठी डेरा टाकून बसले होते.

बरेचजण मासेमारीसाठी आले होते. या तलावात मोठमोठे ट्राउट, तूइ चुब, सॅक्रमेंटो पर्च असे अनेक मासे मिळतात. स्थानिक लोक ते भाजून खातात.

लेक मिड लास वेगास वरून गाडीने हूवर डॅम बघायला गेलो. लेक मिड हा कोलोरॅडो रिव्हरवरील हूवर धरणामुळे तयार झाला आहे. कोलोरॅडो नदीवरील हूवर धरणामुळे ‘लेक मिड’चा जन्म झाला आहे. याचा काही भाग ऍरिझोना राज्यात तर काही नेवाडा राज्यात आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी दोन टाइम झोन दिसतात.
अमेरिकेत एकूण ५ टाइम झोन आहेत.

हूवर डॅम हा प्रचंड प्रकल्प १९३४ मध्ये बांधला आहे. लास वेगास पासून ३९ किलोमीटर म्हणजे २४ मैलांवर हे प्रचंड मोठे धरण आहे. लेक मिड हा ऍरिझोना, कॅलिफोर्निया आणि नेवाडा या तीन राज्यांना तसेच मेक्सिकोतील काही भागांना पाणी पुरवठा करतो. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे २० मिलियन लोकांचे जीवन या पाण्यावर अवलंबून आहे. तसेच काही शेतीचेही उत्पन्न या पाण्यामुळे होते.

या प्रचंड मोठ्या तलावाचे डायमेन्शन १८० किलोमीटर लांब, १६२ मीटर खोल आहे. या तलावातील पाणी २८.२३ मिलियन एकर फूट आहे.

लास वेगास स्ट्रीप
एका वीकेंडला रिनोवरून लास वेगासला गेलो. साऱ्या दुनियेत प्रसिद्ध असलेले हे शहर बघायला मी उत्सुक होते. हजारो प्रवासी या शहराला भेट देत असतात. अशा ह्या शहरात विशेष असे काय आहे हे पाहण्यासाठी मी गेले. आणि लास वेगास मध्ये उतू चाललेल्या श्रीमंतीची उलाढाल, स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण असलेल्या मोठ्या मोठ्या आकर्षक इमारती, गॅम्बलिंगचे विविध प्रकार, आकर्षक पोशाख केलेल्या युवती पाहताना ह्या शहरात काहीतरी खास आहे याची खात्री पटली.

लास वेगासची रात्रीची रोषणाई पाहताना वेगळीच मजा येते तर दिवसा उजेडात लास वेगासचे सौन्दर्य साधेच पण लक्ष वेधून घेणारे असते.
बेलाजीवो एमजीओ ग्रँड, सीझर्स पॅलेस या वास्तू स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहेत असे मला वाटले.

लास वेगास स्ट्रीप हा भाग क्लार्क काउंटीत असून या अनेक रिसॉर्ट्स, हॉटेल्स आणि कसिनोज यांनी नटलेला आहे. याची लांबी ६.८ किलोमीटर आहे. सहारा अवेन्यू आणि रसेल रोड या मध्ये वसलेली ही भुलभुलय्याची रंगीत दुनिया आहे.

या भागात रात्री, हजारो प्रवासी झुंडी चालताना दिसत होत्या. या गर्दीत हरवून जाऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते. स्ट्रीपवर ‘वेलकम टू फॅब्युलस लास वेगास’ची पाटी आपले लक्ष वेधून घेते.

विविध प्रकारचे चविष्ट खाणे पुरवणारी रेस्टोरंटस ही लास वेगासची आणखी एक ‘स्पेशालिटी’ बनली आहे. जपानची प्रसिद्ध साके आणि सुशी आपल्याला माहित असेल. लास वेगास इथे या दोन खाद्य पदार्थांची चव घेता आली आणि ती आवडली.

लेडी गागा आणि ड्रेक यांचे प्रत्यक्ष शो या स्ट्रीपवर झाले आहेत.

बेलाजीओ येथील आकर्षक, प्रचंड कारंजी ८.५ एकर आवारात असून ती पाहण्यासारखी आहेत. रोज रात्री दर पंधरा मिनिटांनी ही कारंजी संगीताच्या तालावर उडत राहतात. ही कारंजी पाहणे ही पर्यटकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. स्टीव्ह वायें यांची फौंटनची संकल्पना असून हे फौंटन ‘वेट’ यांनी बांधले आहे. २००९ पर्यंत हा जगातला सर्वात मोठा फौंटन शो होता अशी माहिती गुगलने पुरवली.

नेवाडातील आणि पर्यायाने अमेरिकेतील अनेक गोष्टी अभ्यास करून लिहिण्यासारख्या आहेत. सध्या बाहेरचे सृष्टीसौन्दर्य पाहात माझ्या हिटर चालू असलेल्या खोलीत बसून लिहीत आहे. बाहेर कडकडीत ऊन पडलेले दिसत आहे पण तापमान ३ डिग्री सेल्सिअस आहे. बाहेर चिडीचूप शांतता आहे. मधूनच एखाद दुसरी मुलं गडबड (?) करीत जात आहेत. आणि झाडं, गाड्या, इमारती चिडीचूप ! हीच कदाचित जगाला माहित नसलेली अमेरिकेची नि:शब्द शांतता आणि हे सर्व निमूटपणे पाहत असलेले खोबऱ्याची बर्फी पांघरलेले मला आवडलेले ते डोंगर.
बस आता इतकेच !

मोहना कारखानीस

– लेखन : मोहना कारखानीस. अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments