Sunday, July 13, 2025
Homeपर्यटनमाझी ऑस्ट्रेलिया सफर : ६

माझी ऑस्ट्रेलिया सफर : ६

ऑस्ट्रेलियाच्या बारा दिवसांच्या दौऱ्यातील १२ मार्च २०२३ हा माझा शेवटचा दिवस होता.

‘आकाशवाणी सिडनी’ ला भेट देऊन आम्ही मॅक्वेरीफील्डला परतत होतो. दुसऱ्या दिवशी मला भारतात परत जायचे होते. पण शॉपिंग तर काहीच केले नव्हते. काय विकत घ्यायचे प्रश्नच होता म्हणा ! तसे तर सगळे महागच होते तिथे. एक कॉफी सात डॉलर म्हणजे ३५० ते ४०० रुपये ! मात्र कपडे तसे बऱ्या किमतीला मिळाले. मुलांसाठी पटापट शॉपिंग करून आम्ही घरी परतलो आणि पुढील मिटींगच्या कोऑर्डिनेशनमधे गुंतलो.

निलीमा आणि प्रशांत बेर्डे या दाम्पत्याच्या घरी मुक्कामाचा माझा शेवटचा दिवस होता म्हणून निलिमाच्या मुलीने, तनयाने माझ्यासाठी काही खास खाद्य पदार्थ करायचे ठरवले होते. ते बनविण्यासाठी खूप काही जिन्नस आणलेले दिसत होते. पण भारतीय नव्हे तर मेक्सिकन पद्धतीचे जेवण बनणार होते !

तनयाने आमच्यासाठी बनवलेले मेक्सिकन जेवण

आज आम्हाला ‘सह्याद्री सिडनी’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती घ्यायच्या होत्या. ज्या शिवजयंती उत्सवासाठी मी सिडनीमधे आले होते त्या सोहोळ्याचे व्यवस्थित शूटिंग मी आणि माझ्या मित्रमंडळींनी केलेच होते. पण त्या समारंभात कार्यकर्ते एवढे व्यग्र होते की त्यांना मुलाखत द्यायला वेळच नव्हता. ती त्यांची प्रायॉरिटीही नव्हती. सोहळ्यात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी शंभर कार्यकर्ते झटत होते.

निलीमा बेर्डे यांनी सर्व कार्यकर्त्यांना एकत्र मेसेज टाकून e – prasaran च्या मुलाखतीसाठी मॅक्वेरीफील्डच्या गार्डनमधे एकत्र बोलावले होते. कितीजण येतील याबद्दल मी साशंकच होते. कारण गेले तीन चार महिने कार्यकर्ते या सोहळ्यासाठी खुप झटत होते. त्यांना एकही शनिवार, रविवार आपल्या घरासाठी मिळाला नव्हता. घरची कितीतरी कामे खोळंबली असतील. या उपक्रमाला त्यांच्या घरच्यांनी उत्तम साथ दिली होती.

सायंकाळी साडेपाचला तयार होऊन मी आणि निलीमा गार्डनमध्ये पोचलो. सर्व कार्यकर्त्यांना घेऊन भाऊसाहेब पाटील, शेखर महाजन तेथे उपस्थित राहिलेले दिसले. सर्वांशी मोकळेपणे संवाद व्हावा असे वातावरण होते.
शिवजयंतीचा मोठा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या कमिट्या केल्या होत्या त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यकर्ते सांगायला लागले, “या कार्यक्रमाला अनेकांचे हातभार लाभले. आर्थिक मदत मिळाली.” छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेम प्रत्येकाच्या हृदयात दिसत होते. ऑस्ट्रेलियातील तमाम मराठी लोकांना एकत्र कसे आणले येथपासून ते दोनहजार लोकांचे जेवण तरुणांनी कसे बनवले इथपर्यंत अनेक प्रश्न माझ्या मनात होते. त्या त्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे मिळाली. आदर्श इव्हेंट मॅनेजमेंटचा जणू एक वस्तुपाठच या शिवप्रेमी तरुणांनी घालून दिला होता !

आकाशात पाऊस भरून आला होता. मला सर्व कार्यकर्त्यांचा निरोप घ्यायचा होता. मन भरून आले. या सर्व गुणी आणि मेहनती लोकांना सोडून मायदेशी परतताना मला हुंदका आवरत नव्हता. निरोप घेऊन निलीमाकडे परतले.

दुसऱ्या दिवशी पहाटे निघायचे म्हणजे बॅग भरायला हवी होती. ते काम सुरु झाले. एअरपोर्टवर निघताना निलिमाने अगदी भारतीय पद्धतीने निरोप दिला. सकाळी नाश्ता करून दिला. कुंकू लावून गिफ्ट दिले. घरातील सर्व मंडळी नमस्कार करायला सकाळीच उठली होती. मी या निरोपाने हरखूनच गेले. निलीमाची लेक बारावीला होती. पण ‘माझी मुलगी बारावीला आहे, तर माझ्याकडे पाहुणे नको बाई…’ असा पवित्रा काही तिने घेतला नव्हता. जसे सर्व घरातले आहेत तशीच मीही एक सदस्य या अकृत्रिम स्नेहाच्या नात्याने वागवले होते. मुली आपापला अभ्यास व्यवस्थित करत होत्या.
माझा मित्र किशोर जोशी याने मला सकाळी सातला एअरपोर्टवर सोडले.

सिडनी एअरपोर्टवर आपल्याला पोचवायला आलेला माणूस जवळजवळ सिक्युरिटी चेकिंग पर्यन्त येऊ शकतो. त्यामुळे ‘बिझनेस क्लास’ चा बोर्डिंग पास मिळाल्यावर ‘एक कॉफी हो जाये’ या न्यायाने आम्ही कॉफी, क्रॉईसॅन्ट वगैरे घेतले.

मंडळी, आता मी विमानात बसल्यावर तुम्हाला वाटेल की हा ऑस्ट्रेलियाच्या सफरीचा ‘द एन्ड’ असावा ! पण नाही. विमानात बसल्यावरही सफर सुरूच असते ना. बिझनेस क्लासमधे एका ब्रिटिश बाईशी मी माझ्या पद्धतीने इंग्रजीत बोलले. छान संवाद झाला. बिझनेस क्लासमध्ये एअर होस्टेसने कितीतरी वस्तू दिल्या. मोजे, चपला, नाईट गाऊन, ब्रश, टूथपेस्ट किट. हे सर्व फ्री होते. थोड्या थोड्या वेळाने एअर होस्टेस आणि फ्लाईट पर्सर आम्हाला काय हवे नको विचारत होते. खायला प्यायला तर मौजच होती. थोड्या वेळाने एअर होस्टेसने मला माझी जागा बदलून माझ्याच वयाच्या भारतीय बाईबरोबर बसायला दिली. माझ्या जागेवर एक तान्ह्या बाळाची आई येऊन बसली. कारण तिथे सीटसमोर पाळणा लावण्याची सोय होती.

मी माझ्या नव्या प्रवासिनीशी ओळख करून घेतली. ती दिल्लीची होती. खरे तर आम्ही हिंदीत बोलू शकलो असतो. पण विमानात इंग्रजीतच बोलायचं असतं या (गैर) समजापोटी इंग्रजीत बोलत होतो.

हा १४ तासांचा प्रवास, पटकन संपणार नव्हता. “आपण गाण्याच्या भेंड्या खेळायच्या का ?” मी तिला विचारले. ती “हो” म्हणाली. बिझनेस क्लासमध्ये गाण्याच्या भेंड्या खेळणारे म्हणून आमचे नाव गिनीज बुक मध्ये जायला हवे खरे ! पण जाऊदे. आम्हाला कुठे एवढा इंटरेस्ट आहे ? आम्ही एकामागून एक गाणी म्हणत सुटलो.

केव्हातरी मला एक अक्षर अडले. तेवढ्यात एअर होस्टेस चहा द्यायला आली. ती लालचुटुक कपड्यातली एअर होस्टेस आमची मैत्रीणच झाली होती. तिला त्या अक्षरावरून गाणे विचारले आणि तिने चक्क सांगितले की ! नंतर आम्ही हा प्रसंग आठवून खूप हसत होतो.

आम्ही एकमेकींची छान ओळख करून घेतली. तर आम्ही दोघी शिक्षण क्षेत्रातील निघालो. हल्लीच्या शिक्षण पद्धतीवर, लग्नपद्धतीवर आणि कुटुंब व्यवस्थेवरही आमची खूप चर्चा झाली. आम्ही दोघींनी आमचे व्हिडिओही बनवले.

चित्रपट पाहण्यासाठी आम्ही ‘सिंघम’ चित्रपट सिलेक्ट केला. त्यात जयंत सावरकर म्हणजे, आमचे अण्णा दिसले. भारतात आल्यावर एका कार्यक्रमात अण्णा भेटले तेव्हा त्यांना मी गमतीने सांगितले, “ऑस्ट्रेलियाहून येताना तुम्ही विमानात भेटलात म्हणून कोण आनंद झाला म्हणून सांगू.”!

विमान दिल्लीला पोचले. सर्व औपचारिकता पूर्ण करून मी बॅगेज कलेक्ट करायला गेले. कनेक्टिंग विमान घेऊन मला मुंबईला जायचं होतं. त्यासाठी एअर इंडियाच्या काउंटरला जाऊन पुन्हा विमानाचा बोर्डिंग पास घ्यायचा आणि हे सामान घेऊन तिथवर जायचे ही कसरत एकटीला करायची होती. मी त्या पोपटी जॅकेट घातलेल्या मदतनिसाला विचारले. तो सामान न्यायला तयार झालं. पण ५०० रुपये घेतो म्हणाला. घासाघीस करूनही कमी होईना. मग दिले त्याच्या ताब्यात. ट्रॉली ढकलत तो लिफ्टजवळ आला आणि ५०० रुपये मागू लागला. मी म्हणाले, “अरे, काउंटरपर्यंत न्यायचे आहे.” तर म्हणे, “कोणासमोर पैसे घ्यायचे नाहीत मला.” तेव्हा माझ्या लक्षात आले एअरपोर्टने ही सर्व्हिस फ्री ठेवली आहे !

पुढे काउंटरला गेल्यावर मी त्याची पैसे मागितल्याबद्दल कम्प्लेंट केली. पण काही फायदा झाला नाही. दिल्लीच्या विमानातून सुखरूप मुंबईला पोचले. माझे मिस्टर आणि मुलगी रात्री ११ला मला रिसिव्ह करायला एअर पोर्टला आलेच होते. मी जणूकाही एखादी स्पर्धा जिंकून आले आहे असे स्वागत झाले.
क्रमशः

मेघना साने

– लेखन : मेघना साने
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments