संत योगिनी लल्लेश्वरी
स्त्री संत मालिकेतील स्त्री संत कवयित्री यांचे स्थान अद्वितीय आहे.
दररोजच्या उपयोगातील आणि व्यवहारातील प्रसंगांना अनुसरून त्यांनी केलेल्या अभंग किंवा ओव्याची रचना जनसामान्यांना जास्त आपलीशी वाटणारी आणि नकळत काहीतरी शिकवण देणारी आहे.
संतांबरोबरच समाज प्रबोधनाला हात लावणाऱ्या अनेक स्त्री संत कवयित्री होऊन गेल्या. संत कवयित्री संत योगिनी लल्लेश्वरी यांची आज ओळख करून घेऊया…
लल्लेश्वरी योगिनी यांना प्रेमाने लल्ला असेही म्हणत.. श्री शंकराची एक परमकोटीची भक्त. संतांच्या मांदियाळीत सर्वप्रथम येते ज्यांनी मध्ययुगीन रहस्यवाद अथवा गूढवादाचा म्हणजेच ईश्वराशी प्रत्यक्ष योग अथवा मिलन होण्यामध्ये विश्वास ठेवणे प्रचार केला जो तदनंतर संपूर्ण भारतात पसरला.
संत रामानंद आणि त्यांच्यानंतर आलेल्या संतांचा लल्लेश्वरीवर प्रभाव असण्याची शक्यता नव्हती कारण संत रामानंदांची कारकीर्द इ.स. १४०० – १४७० होती तर कबीराने स्वत:चे दोहे इ.स. १४४० – १५१८ मध्ये गायले… गुरु नानक ह्यांची कारकीर्द १४६९ – १५३८ होती तर तुलसीदास ह्यांची कारकीर्द १५३२ नंतर आणि संत मीराबाईची कारकीर्द तर त्याहूनही नंतर सुरु झाली. ज्या संयुक्त संस्कृती आणि विचारधारेची तिने शिकवणूक दिली आणि ज्या धर्मबंधुत्वाचा पाया घातला तो सर्वकाही शैव धर्मातील अव्दैत तत्वज्ञान तसेच मुस्लिम सुफी तत्वांचा सुरेख संगम होता.
लल्लेश्वरी योगिनी यांनी अत्यंत लवकर, म्हणजे १३ व्या शतकातच अहिंसा, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ह्यांची शिकवण दिल्यानेच की काय मुस्लिम समाजाकरिता ती ’”लल्ला अरिफा’” होऊन पूज्य झाली तर हिंदूंकरिता ती “’लल्लेश्वरी योगिनी”’ ह्या नावाने पूज्य ठरली.
लल्ला काश्मिरमध्ये इतकी प्रसिद्ध होण्यामागे काय कारण असावे ? ती अशिक्षित परंतू अत्यंत सूज्ञ होती. तिची वचने ज्ञानाने परिपूर्ण आहेत. ह्या तिच्या वचनांमध्ये तिने, योग, देव, धर्म आणि आत्मा ह्या सर्व गोष्टींसकट, जीवनातील प्रत्येक गोष्टीचा निर्णय आणि निवाडा केला आहे. तिचे शब्द प्रत्येक काश्मिरी माणसाच्या ओठावर आहेत.
लल्लेश्वरी योगिनी, सर्वतोमुखी लाल डेड–लल्ला माता हिने तिच्या समकालीन व्यक्तिंच्या जीवनावर तसेच विचारपद्धतिवर गंभीरपणे प्रभाव टाकला.तिची वचने प्रत्येक काश्मिरी व्यक्तिच्या हृदयाला भिडतात. तसेच त्यांच्याकडून वेळप्रसंगी नीतिवचनांच्या रुपात वापरली जातात. तिने तिच्या वचनांमधून विश्वबंधुत्वाची तसेच ईश्वराशी तादात्म्यभावाची शिकवणूक दिलेली आहे. लाल डेडची काव्ये आणि वचने अनेक भाषांमध्ये अनुवादित झाल्याने ती काश्मिरच्या सरहद्दी ओलांडून सर्वत्र पोहोचली आहे.
आता पर्यंत मिळालेल्या पुराव्यानुसार लल्लेश्वरी योगिनीचा जन्म इ.स. १३२६ अंदाजे, म्हणजे ६८८ वर्षांपूर्वी, सुल्तान अल्लाउद्दीनच्या काळात पद्मपोरा सध्याचे पांपोर काश्मिर मध्ये राहणार्या चेता भट नावाच्या काश्मिरी ब्राह्मणाच्या पोटी झाला. तिचे आईवडिल श्रीनगरच्या आग्नेय दिशेला साडेचार मैल दूर असलेल्या पांड्रेनाथन, पूर्वीचे पुराणाधिष्ठान ह्या गावी राहत होते. तत्कालीन पद्धतिनुसार तिचे लग्न कमी वयातच केले गेले होते. तिची सासू तिला अत्यंत क्रूरपणे वागवित असे आणि जवळजवळ उपाशीच ठेवत असे. काश्मिरमध्ये एक गोष्ट सर्वांच्याच ओठी आहे – एक मोठी बकरी मारली काय ? की छोटी मारली काय ? लल्लाच्या जेवणाला फक्त एक दगडच असणार ही गोष्ट म्हणजे तिच्या सासूचा एका ताटात एक मोठा दगड ठेऊन त्यावरुन हलकासा भात पसरुन एक ढीगभर भात तिला वाढलेला दाखविण्याच्या नित्यनेमाचा अप्रत्यक्ष उल्लेख होय…तिचा सासरा एक चांगला माणूस होता आणि तिच्यावर तो दयाही दाखवित असे. परंतू सासूने तिचे जगणे मुष्किल करुन ठेवले होते. ती लल्लाची निंदा तिच्या मुलासमोर करीत असे, तिला नवर्यापासून किंवा सासूपासून कोणतेही सुख मिळत नव्हते.
लल्लेश्वरीच्या उपासमारीचे सत्य तिच्या सासर्याला केवळ योगायोगाने समजले. त्याला पत्नीचा संताप आला आणि त्याने तिची खूप निर्भत्सना केली परंतू यामुळे ती लल्लावर आणखीनच चिडायली लागली. तिच्या सासूने अनेक प्रकारच्या खोट्यानाट्या गोष्टी सांगून आपल्या मुलाचे म्हणजे लल्लाच्या पतीचे कान भरले. सरतेशेवटी अनेक प्रकारच्या विसंगती आणि प्रपंचातील क्रूरपणा पाहून लल्ला ने सर्वसंगपरित्याग करुन ब्रह्मतत्वामध्ये स्वातंत्र्य मिळविले.
जेव्हा लल्ला सव्वीस वर्षांची होती तेव्हाच तिने प्रपंचाचा त्याग केला आणि ती भगवान शंकराची भक्त झाली. तिला सिध श्रीकांत ह्यांच्या रूपाने गुरु मिळाला आणि सरतेशेवटी तिने त्यांनाच आध्यात्मिक क्षेत्रातील प्रगतिमध्ये मागे टाकले. तिने सिध श्रीकांताच्याकडून योगविद्येचे शिक्षण घेतले आणि अमृततत्व अथवा मोक्षधाम प्राप्त केले.
ती एवढे करुन थांबली नाही. तिच्या सभोवती सगळीकडे भांडणे आणि गोंधळ माजला होता. तिच्या प्रांतातील स्त्रीपुरुषांना तिच्या मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता होती. तिला विशेष कार्य करावयाचे होते आणि ते तिने अत्यंत परिणामकारक पद्धतिने करुन दाखविले. तिचे जीवन आणि वचने ह्यांनीच लोकांचे चारित्र्य घडविले तसेच प्रेम आणि सहनशीलतेचा पायंडा घालून दिला..
एक भटकती धर्मोपदेशक संपादन..
सरतेशेवटी तिने एकांतवासाचे जीवन त्यागून ती भटकती धर्मोपदेशक बनली. तिने काटेकोर संन्यस्त जीवनाचा स्वीकार केला सर्व प्रकारच्या सुखसोयींचा त्याग करुन स्वत:च घालून घेतलेल्या नियमांचे पालन करुन तिने समाजापुढे एक उत्तम आदर्श ठेवला.
संत मीराबाई प्रमाणेच लल्लाने तिच्या अत्यंत प्रिय अशा भगवान शंकराची गीते रचून गाईली आणि तिच्या हजारो हिंदु आणि मुसलमान अनुयायांनी तिची प्रख्यात वचने तोंडपाठ केली.
तुर्यावस्थेत असताना विवस्त्र असलेल्या संत लल्लेश्वरींची गुंडांच्या घोळक्याने चेष्टा केली असता वाटेने जाणार्या एका सभ्य कापडविक्याने ते पाहून त्यां गुंडांची निर्भत्सना केली. ते पाहून लल्लाने दोन एकसारखेच साधे कापडाचे एकसमान वजनाचे तुकडे कापड विक्रेत्याकडून घेतले आणि स्वत:च्या दोन्ही खांद्यांवर टाकले आणि त्याच्यासोबत ती चालू लागली. वाटेत काहींनी तिची निंदा केली तर काहींनी तिची स्तुति केली. प्रत्येक स्तुतिच्या वेळी ती उजव्या खांद्यावरील कपड्याला एक गाठ मारी तर प्रत्येक वेळी निंदा ऐकताच, एक गाठ ती डाव्या खांद्यावरील कपड्याला मारी. संध्याकाळी तिने दोन्ही कापडाचे तुकडे त्या कापड विक्रेत्याला परत करुन त्यांचे वजन करवू घेतले दोन्ही कापड्यांच्या वजनात गाठी मारल्यामुळे काहीही फरक पडला नव्हता अशा प्रकारे तिने कापड विक्रेत्याला तसेच तिच्या अनुयायांना दाखवून दिले की लोकांच्या स्तुती अथवा निंदेमुळे माणसाने मनाचा तोल जाऊ देऊ नये. तिची शिकवण आणि आध्यात्मिक अनुभव लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता तिने त्यांचा प्रचार लोकांच्या भाषेतच केला… अशा प्रकारे तिने मौल्यवान काश्मिरी साहित्य तसेच लोकगीतांचा भक्कम पाया घातला. तीस टक्क्यांपेक्षा अधिक काश्मिरी म्हणी आणि वाक्संप्रदायांचे मूळ तिच्या वचनांमध्येच सापडते.
लल्लेश्वरी योगिनीच्या महानिर्वाणाची निश्चित तारीख माहिती नाही परंतू असे म्हटले जाते की तिने बिजबेहारा म्हणजे सध्याचे वेजीब्रोर मध्ये देहत्याग केला…
सत्य सांगायचे झाले तर लाल डेड अथवा माता लल्ला सारख्या संत ब्रह्मैक्य झाल्यामुळे जगदाकर होऊन राहतात आणि भक्तांना सदैव मार्गदर्शन करीत राहतात…
क्रमशः

– लेखन : संगीता कुळकर्णी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800