Sunday, July 13, 2025

कथा

दैव योग

लेखकाचा परिचय :
श्री माधव ना. गोगावले गेली २८ वर्षे शिकागो परिसरात रहिवासी आहेत. अमेरिकेत ते गेली ४२ वर्षे आहेत.
महाराष्ट्र मंडळात ते १९८१ पासून सक्रिय आहेत. १९८७ पासुन २०२० पर्यंत चिनमया मिशन मध्ये ते स्वयंसेवक, बालविहार शिक्षक व अध्ययन गटात सक्रिय होते. महाराष्ट्र मंडळ शिकागो कार्यकारिणीचे ते गेली २ वर्षे सदस्य आहेत. अध्यात्म पीठ, साहित्य कट्टा, जेष्ठ नागरिक सेवादल, इतिहास मंच या समुहाचे संचालक व सहआयोजक म्हणूनही ते कार्यरत आहेत.
सामाजिक कार्यात ते नेहमीच सहभागी असतात.
व्यवसायाने आरोग्य क्षेत्रामध्ये तंत्रज्ञ विभागात कार्यरत असलेल्या श्री माधव गोगावले यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे.
– संपादक

मोहक मोहिनीने गावातील सर्वांना मोहित करून सोडले होते. ती उंच, सडपातळ, सरळ नाकाची, पाणीदार बोलके डोळे, आणि गोरीपान होती. याबरोबरच तिला मधुर आवाजाचीही देणगी मिळाली होती. मोहिनीने आपल्या आकर्षक बांध्याने नव्हे, तर मधुर स्वभावाने सर्वांना आपलेसे केले होते.

मोहिनीचे नववीपर्यंत शिक्षण झाले होते. परंतु विचारांनी ती पदवीधर व्यक्तीपेक्षा कितीतरी पुढे होती. मोठ्या खटल्याच्या घरात तिला दिले होते. थोरल्या जावा, दीर, सासू-सासर्‍यांचे तिने काही दिवसातच आपल्या सेवाभावी व गोड वृत्तीने मने जिंकली. दोन धाकट्या जावा व नंणदा यांची खास मैत्रीण बनली होती. त्यांना काही लागले तर त्या मोहिनीला पुढे करून मोठ्यांची अनुमती घेत.

गावातील कोणी आजारी असतील तर मोहिनी त्यांना गोड-धोड करून नेत असे. बाळंतिणीची ती खास सेवा करायची. गावातील ज्येष्ठांच्या तर ती गळ्यातील ताईत झाली होती. भजन करणे, प्रत्येक सणावारीला गावातील महिलांना एकत्र आणून नागपंचमी, हरतालका, नवरात्री अश्या उत्सवात ती हिरारीने स्वतः भाग घेऊन इतरांना प्रोत्साहन देत असे.

गावात सर्वांत जास्त शिकलेली तीच असल्यामुळे आठवड्यातून एक-दोन वेळा तरी गावातील शाळेत चक्कर मारून गुरुजी आणि मुलांची चौकशी करत असे.

गावात फक्त चौथीपर्यंतच शाळा होती. १५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाला ती स्वतः आपल्या हाताने शाळेतील मुलांसाठी खाऊ करून त्यांना वाटत असे. गावात पूजा, लग्नकार्य असेल तर ती अगदी घरच्या प्रमाणे मदत करत असे, हळदीची गाणी, लग्नातील मंगलाष्टके नेहमीच म्हणत असे. घरचेही तिला समाजकार्यात मदत करत.

आपल्या मधुर गोड वाणीने ती सर्वांना आदराने आजोबा, आजी, दादा, भाऊ, काका, काकू, मामा, मावशी त्यांच्या वयानुसार म्हणत असे. गावातील लहान-मोठे सर्वजण तिला अक्का या नावानेच संबोधू लागले होते. अक्का मदत व सामाज कार्यात सगळ्यात पुढे असे पण राजकारणापासून खूप खूप दूर राहत असे. आपल्या निस्वार्थी सेवा व आदराने सर्वांची लाडकी झाली होती. एखादी बाई तब्येतीने गुंतागुंतीत असेल तर तालुक्याच्या ठिकाणी दवाखान्यात नेत असे.

तिच्या लग्नाला आता आठ-नऊ वर्षे झाली होती.  तिच्यानंतर ज्यांची लग्ने झाली होती त्यांना दोन-दोन, तीन-तीन मुले झाली होती पण तिची कूस मात्र अजुन भरली नव्हती. मोहिनी व तिचा नवरा बालकिसन पुणे-मुंबईतील दोन-तीन स्त्री तज्ञांकडे जाऊन आले होते. त्यांनीही मोहिनीला आपत्य होण्याची शक्यता नाही असे सांगितले होते. त्या काळातील ग्रामीण भागाच्या रिवाजाप्रमाणे तिने आपल्या नवऱ्याला दुसरी बायको करण्यासाठी अनेक वेळा विनंती केली. घरातल्यांनीहि सांगितले परंतु त्याने ती कल्पना प्रत्येक वेळी धुडकावून लावली. मोहिनी घरातील सर्व मुलांची तसेच गावातील मुलांची काळजी घेते त्यामुळे आम्हाला मूल नसल्याने काहीच फरक पडत नाही असे सांगत असे.
आई, सासू, आणि मैत्रिणींनी देवाला नवस करणे अंगारे-धुपारे सर्व केले होते. त्या गोष्टीत मोहिनीला मुळीच रस नव्हता आणि त्यावर विश्वासही नव्हता.

गावात सर्वजण गुण्यागोविंदाने नांदत होते, पण बाहेरील राजकारणी लोकांच्या भूलथापांनी त्यांच्या गावांलाही सोडले नाही.  ह्या वर्षी गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार होत्या. नेहमी बिनविरोध निवडणुका होत असत. पण ह्या वर्षी काही तरुणांना निवडणुका पाहिजे होत्या. उमेदवारी अर्ज भरण्याचे दिवस जवळ येऊ लागले. ज्येष्ठांनी या तरुणांना समजाविण्याचा प्रयत्न केला पण ते आपल्याच तोऱ्यात राहिले.

गुरुवारी भजन झाल्यावर चावडीत गावबैठकीसाठी बहुतेक सर्व ज्येष्ठ मंडळी व तरुण जमले होते. भजने संपल्यानंतर मोहिनी व इतर महिला घरी जाण्यास निघाल्या पण काही ज्येष्ठांनी व तिच्या सासू-सासर्‍यांनी तिला त्या बैठकीला थांबण्यास सांगितले. मोहिनीला त्यात रस नव्हता पण मोठ्यांचा आदर व शब्दाला मान देऊन ती थांबली.
बैठक सुरू होताच बाचाबाची होऊ लागली. काही तरुण उतावळे होऊन बोलत होते. मोहिनी बारकाईने ऐकत होती. त्यातील एका वयस्कर व्यक्तीने मोहिनीला विचारले, “अक्का बरे झाले तू थांबलीस. आता तूच यावर काहीतरी तोडगा काढ”. थोरांनी व महिलांनी एका आवाजात त्या सूचनेवर री ओढली आणि तिला मध्यस्थीची विनंती केली. नको नको म्हणत शेवटी थोरांच्या आदरापोटी अक्का बोलण्यास तयार झाली.
ती म्हणाली, आपल्याला गावासाठी खूप कामे करायची आहेत. मागे ठरल्याप्रमाणे ज्या व्यक्तींना ठरवले होते त्यांना ग्रामपंचायतीचे सदस्य होऊ द्या. पुढच्या वेळी तुम्हा तरुणांना वाव देऊ.
हे ऐकून रवी नावाचा तरुण मोठ्याने ओरडला, “ए वांझोटी तुला राजकारण काय समजते ? तू गप बस”.
क्षणभर सगळीकडे सन्नाटा पसरला. सगळेजण आ वासून आपले आश्चर्य व संताप व्यक्त करत होते.

दहा-पंधरा ज्येष्ठ व काही तरूण एकाच सुरात वरडले – “गधड्या तुला अक्कल आहे की नाही ? चालता हो या बैठकीतून”.  खूप गोंधळ माजला. रवीचा आजा उठला आणि रागारागात रवीकडे जाऊन त्याच्या मुस्काटात मारण्यासाठी हात उगारला, तेवढ्यात मोहिनीने त्यांचा हात धरला व म्हणाली -”आजोबा मला माफ करा. रवी अजून अजाण आहे”.

वांझोटी शब्दाने तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. सगळे ज्येष्ठ व महिला उठल्या आणि एका स्वरात म्हटले आम्ही निघतो.
काही व्यक्तींनी त्यांना विनंती केली थोडा वेळ थांबा, माजी सरपंच म्हणाला या तरुणांचा माज उतरवलाच पाहिजे. त्यांना निवडणूक पाहिजे ना होऊ द्या.
रवी व काही तरूण बाहेर निघून गेले. रवीला आक्काने चावडीत आजोबांपासून वाचवले होते, पण तो बाहेर येताच त्याच्या वडिलांनी त्याला जोरात  कानशिलात लगावली. त्याच्या आईनेही त्याला चांगलेच सुनावले.

चावडीत थोर, महिला व बरेच तरुण अजूनही बसून होते.  नेहमी शांत, प्रसन्न व हासरी मोहिनी थोडीशी निराश होती पण स्थितज्ञाप्रमाणे तशीच उभी होती. ती घरी जाण्यास निघाली पण चार-पाच ज्येष्ठ वृद्ध व तीन-चार माजी सरपंचांनी तिला थांबवले.  एक माजी सरपंच व ह्यावर्षी सरपंच होणार होता त्याने घोषणा केली – यावेळी अक्काच सरपंच होणार.  आम्ही तीला निवडून आणणारच.
सगळ्यांना ते इतके आवडले, काही तरुणांनी अक्काला खांद्यावर उचलून घेऊन घोषणा सुरू केल्या. अक्काची राजकारणात यायची मुळीच इच्छा नव्हती. ती म्हणाली, “मी बाहेरून हवी तेवढी मदत करेल पण मला नको हे”.
तिचे सासू, सासरे म्हणाले, “अक्का तुला गावातील मुलांसाठी खूप काही करता येईल.”  त्याच बैठकीत सर्वांनी एकमताने त्यांचा पॅनल निवडला व निवडणुक लढायचे ठरवले.

रात्रभर मोहिनीला झोप आली नाही. गुपचूप खूप खूप रडली. सकाळी नेहमीप्रमाणे ती महादेवाच्या मंदिरासमोर रांगोळी काढत होती. तिची नेहमीची प्रसन्नता आज लोकांना दिसली नाही. पडल्या चेहर्‍यावरचे भाव तिने लपविण्याचा प्रयत्न केला पण ते बोलके हासरे डोळे आज तिला साथ देत नव्हते.

निवडणुकांचे फलक साऱ्या गावात लागले होते.  गावात कधी नव्हती ती दुफळी झाली होती. निवडणूका चार दिवसात होणार होत्या. रवीची बायको अचानक आजारी पडली. तिचे सासू-सासरे अक्काकडे आले. अक्काने लगेच आपल्या नवऱ्याला सांगून शिकारी बैलांच्या गाडीत रवीच्या बायकोला तालुक्याच्या ठिकाणी दवाखान्यात नेले. तिन दिवसानंतर बरे वाटल्यानंतर तिला गावी आणले.

दुसऱ्या दिवशी निवडणुका झाल्या व काही दिवसातच मतमोजणी होऊन मोहिनीच्या पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून आले. एकमताने अक्काला त्यांनी सरपंच केले.  अक्काने सरपंच पदाची सुत्रे हातात घेतली आणि गावातील अडलेली कामे करण्याचा धडाका लावला. गावातील पाण्याची विहीर खोल केली, घाटाच्या रस्त्याचे काम केले. तालुक्यात जाऊन सरकारी बांधकाम खाते व राजकारणी लोकांनकडून गावच्या रस्त्याचे काम मंजूर केले आणि रस्ता केला. थोड्या दिवसात गावात एसटी बस पण येऊ लागली, फिरता दवाखाना आणला. यासारखे अनेक कामे गावकऱ्यांच्या सहकार्याने चालू ठेवली.

शेवटचा उपाय म्हणून तिच्या आईने एका सुईणीला तिच्याकडे आणले. सुईण मावशीने तिला व तिच्या नवऱ्याला खारीक, खोबरं, डिंक आणि काही औषधी वनस्पती घालून त्याचे लाडू खाण्यास सांगितले. तसे तिने दोन-तीन महिने खाल्ले पण त्याचा परिणाम झाला नाही. सुईणमावशी परत आली आणि तिथे काही आठवडे स्वतःच्या देखरेखीखाली तिला लाडू भरवत राहिली.

चावडी शेजारील छोट्या खोलीत पहिली ते चौथी पर्यंतची शाळा भरत असे. अक्काला हे बरे वाटत नव्हते. गावात नवीन शाळा बांधण्याचा तिचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी ती झटत होती.  पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार यांच्या निधीतून गावाला शाळेसाठी ७५% निधी तिने मिळवला. मग काय गावातील सुतार, गवंडी, टकारी, तरूण सर्वजण आपापली कारागिरी व मजुरी स्वयम् सेवेने देण्यासाठी तयार झाले. ठरलेल्या मुहूर्तावर पाया
खोदण्याच्या मानासाठी तिने गावातील चार-पाच ज्येष्ठांना बोलावले. सर्वांनी अक्काला  विनवले, “आक्का तुझ्यामुळेच हे शक्य झाले व शाळा होईल. तुझ्याच हस्ते पहिली कुदळ पडू दे.”
पाया खोदण्याचा कार्यक्रम अगदी उत्साहात झाला.  घरातील सर्वांची छाती अभिमानाने फुगली होती. सर्वांनी तिचे खूप खूप कौतुक केले.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच मोहिनीला उलट्या झाल्या. आई व सासूने दुपारीच अक्काला तालुक्याच्या गावी डॉक्टरकडे नेले. डॉक्टरने दिलेल्या बातमीने सगळेजण आनंदित झाले. सासू आणि आई तर हवेतच तरंगत होती.  तीन महिने कोणालाही सांगायचं नाही असे त्यांनी ठरवले.

झाले एकदाचे तीन महिने. सासऱ्याने पूजा ठेवून सर्व गावाला जेवण्यासाठी बोलावले आणि आनंदाची बातमी सांगितली. सर्वजण तिच्यासाठी आनंदाने पुलकित झाले. सरपंच अक्काला बाळ होणार होते. वांझोट्या मोहिनीची कूस लग्नानंतर दहा वर्षांनी भरली होती.

शाळा बांधण्याचे काम जोरात चालू होते. आक्का दररोज शाळेकडे एक – दोन चकरा मारून कामाची देखभाल करत असे.
सातव्या महिन्यात रीतीरिवाजाप्रमाणे तिचा मोठ्या उत्साहात ओटीभरणीचा कार्यक्रम झाला. आई “बाळंतपणासाठी माहेरी चल” म्हणत होती पण अक्का “शाळेचे काम चालू आहे मी येथेच राहते” असं म्हणून गावातच राहिली.

शाळेचे काम आता पूर्ण होत आले होते. नवीन वर्षापासून बालवाडी व अंगणवाडीसाठी शिक्षकांचा तगादा तिने पंचायत समिती व जिल्हा परिषद शिक्षण खात्यात लावला होता. विद्यार्थी पट संख्या कमी होती.  गावातील तरुणांना व महिलांना हाताशी धरून शेजारच्या दोन ठाकरवाडीतील मुलांना शाळेत नावे घालून लागणाऱ्या पटा पेक्षा दुप्पट आकडा तिने केला.

एक दिवस कळा आल्यावर तिला तालुक्याच्या ठिकाणी प्रसूती केंद्रात भरती केले. अक्काने एका सुंदर सशक्त गोंडस बाळाला जन्म दिला. दहा दिवसाने बाळाचे वाजत गाजत गावात स्वागत झाले.

ठरल्या तारखेला नवीन शाळेचे उद्घाटन होणार होते. शाळेच्या उद्घाटनासाठी आमदार, सभापती व शिक्षण खात्यातील अधिकारी आले होते. शाळेच्या चारही खोलीत विद्यार्थी बसतील एवढा हजेरीचा पट तयार होता. सर्व मुले आणि गावकरी त्या ठिकाणी हजर होते.

अक्का ओली बाळंतीण असूनही तिथे येऊन तिने उद्घाटनाच्या भाषणात शिक्षण अधिकाऱ्यांना कळकळीने आणखी शिक्षकांची मागणी केली. आमदार व तालुका पंचायत समितीच्या सभापतींनी ते उचलून धरले.  ती नम्रतेने म्हणाली, “आम्हाला आश्वासने नकोत, आणखी तीन गुरुजी पाहिजेत.”  शिक्षण अधिकाऱ्यांना माहीत होते की सरपंच आक्काने किती हेलपाटे मारले होते. अनेक वर्षानंतर गरोदर असूनही समाजसेवा व शाळेसाठी झटत होती. अधिक शिक्षकांसाठी आवश्यक लागणाऱ्या सर्व बाबी तिने पूर्ण केल्या होत्या. तशा तयारीनेच ते आले होते. आनंदाने तिथेच सर्वासमोर तीन शिक्षकांची ऑर्डर काढली.

आक्काची तपश्चर्या फळास आली होती !!!

आक्काने एकाच वेळी आपल्या बाळाला व शाळेला जन्म देऊन अनेक मुलांची शाळेची व्यवस्था केली होती. दैवयोगाने शाळा बाळाचे उद्घाटन रुपी बारसे आणि तिचे बाळ दोघांचे बारसे एकाच दिवशी झाले.

आक्कासाठी आणि गावासाठी किती किती आनंदाचा आणि भाग्याचा दिवस होता तो !

माधव गोगावले

– लेखक : माधव ना. गोगावले. अमेरिका
(मूळ स्त्रोत : रचना त्रैमासिक, शिकागो, अमेरिका)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800

Previous article
Next article
RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments