Sunday, July 13, 2025
Homeलेखपरशुराम

परशुराम

अश्वत्थामा, बलि,व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य आणि परशुराम ह्या सात चिरजीवांपैकी एक परशुराम, ह्यांची आज जयंती आहे. त्या निमित्त त्यांच्या बद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.
– संपादक

अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषण:
कृप: परशुरामश्च सप्तैते चिरंजीविन:।।

परशुराम हे विष्णूचा सहावा अवतार आणि जमदग्नींचे चौथे पुत्र. काही ठिकाणी या अवताराचा उल्लेख ‘अंशावतार’ असा ही केला जातो.

हरिवंश पुराणानुसार, सतयुग आणि त्रेतायुगाच्या संधिकालात स्वतः पृथ्वी माता पृथ्वीवासियांच्या रक्षणार्थ आणि क्षत्रियांच्या क्रूरते पासून मुक्ती मिळावी म्हणून भगवान् विष्णू कडे मदत मागायला गेली होती. त्या प्रार्थनेच्या अनुषंगाने जमदग्नि आणि रेणुकेचा चौथा पुत्र परशुराम म्हणून त्यांनी जन्म घेतला. तो दिवस वैशाख शुद्ध तृतीयेचा म्हणजे अक्षय तृतीयेचा होता. जन्माच्यावेळी त्यांचे नाव ‘राम’ ठेवले होते. त्याशिवाय रामभद्र, भार्गव, भृगुपति, जामदग्न्य इत्यादी नावांनीही ते ओळखले जातात.

पित्याच्या आज्ञेने त्यांनी भगवान् शंकराची तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येच्या बळावर त्यांनी परशु‌ हे अस्त्र प्राप्त केले आणि त्यांचे परशुराम हे नांव झाले.

परशुरामाने सुरुवातीला महर्षी विश्वामित्र आणि ॠचीकच्या आश्रमात विद्याध्ययन केलं. ॠचीकने त्यांना दिव्य वैष्णव धनुष दिले आणि ब्रम्हर्षी कश्यपांकडून त्यांनाअविनाशी वैष्णव मंत्र प्राप्त झाला.

ब्राह्मण कुळात जन्म घेऊन ही त्यांच्यात क्षात्र गुण कसे आले? त्या बाबत एक कथानक आहे.

भृगु ॠषींनी दिलेली फळे खाऊन चुकीच्या झाडांना आलिंगन केल्याने परशुरामांच्या आजींना तुला क्षत्रिय कलागुणांचा पुत्र होईल असे भृगु ॠषींनी म्हणताच
‘माझ्या पुत्रा पेक्षा माझा नातू तसा व्हावा’ अशी तिने विनवणी केली आणि त्या प्रमाणे परशुराम ब्राह्मण असूनही क्षत्रिय कलागुणांचे असल्याने परशुरामांचा स्वभाव क्षत्रियांसारखा झाला.

परशुरामांनी पृथ्वीतळा वरुन क्षत्रियांचा नायनाट करण्याची प्रतिज्ञा कां बरं केली असावी ? त्याचे कारण ह्यात सापडते. माहिष्मतीचा राजा कार्तवीर्य सहस्रार्जुनाने जमदग्नी ॠषींच्या आश्रमात कामधेनू गाईला पाहिले. तिने सगळ्यांसाठी जेवण तयार केलेलं पाहून तो बळजबरीने तिला व तिच्या बछड्यास घेऊन गेला. परशुरामांना हे कळताच रागाच्या भरात त्यांनी कार्तवीर्य सहस्त्रार्जुनाचा वध केला. जमदग्नी ॠषींचा वध करून कार्तवीर्य सहस्त्रार्जुनाच्या मुलाने आपल्या पित्याच्या वधाचा बदला घेतला. पित्याच्या शरीरावर एकवीस घाव बघून एकवीसदा क्षत्रियांचा नायनाट करेन ही प्रतिज्ञा परशुरामांनी केली.

हा क्षत्रिय संहार पाहून महर्षि ॠचिक स्वतः प्रकट झाले आणि त्यांनी परशुरामांना ह्या नरसंहारी कृत्या पासून थांबवले. त्यावेळी परशुराम महेंद्र पर्वतावर तपाचरणासाठी निघून गेले.

जो पर्यंत परशुराम ह्या पृथ्वीवर आहेत तो पर्यंत क्षत्रिय कुळाचा उत्कर्ष होणार नाही हे कश्यपां कडून समजल्यावर, या पृथ्वीचे स्वामित्व मी सोडले असल्यामुळे मला आणि माझ्या शिष्यांना येथे राहता येणार नाही; असे सांगून भगवान परशुरामांनी पृथ्वीवर संपूर्ण विजय मिळविल्यानंतर कच्छ जवळ एक मोठा यज्ञ केला. त्या यज्ञात महर्षी कश्यपांना जिंकलेली सर्व पृथ्वी केली आणि ते दक्षिणेकडे कोकण क्षेत्रात उतरले.

वरील कथेमध्ये पृथ्वी असा शब्द आहे. त्याबद्दल मी असे ऐकले आहे की आज आपण संपूर्ण जगालाच पृथ्वी असे म्हणतो. पण पूर्वी पृथ्वी ही संकल्पना लागवडीखाली असलेल्या प्रदेशासाठीच वापरली जात असे. इक्ष्वाकू वंशातील राजा पृथु संन्यस्त झाला आणि त्याने जंगलात राहून वृक्ष, वनस्पतींच्या जीवनाचा अभ्यास केला. त्यामधून खाण्या योग्य अन्न, कृत्रिमरित्या लागवड करून तयार करता येते, हे त्याने सिद्ध केले आणि प्रामुख्याने शिकारीवर अवलंबून असलेला समाज शेतीकडे वळला. परशुरामांच्या काळात फक्त उत्तर भारतात लागवड सुरू झाली होती. त्यामुळे तेवढ्याच भागाला पृथ्वी असे म्हणत असत.

आता एक प्रमाण असं ही आहे की त्यांनी ‘एकवीस वेळा क्षत्रियांचा वध करेन ही प्रतिज्ञा केली नसून.
‘मी पृथ्वीवरील क्षत्रियांचा वधकरून पृथ्वी नि:क्षत्रिय करेन.’ ही प्रतिज्ञा केली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी.
१ कार्तवीर्य पुत्र हयवंश, २ सूर्यवंशज सुचंद्र, ३ दंतक्रूर, ४ कश्मीर, ५ दरद, ६ कुंती, ७ क्षूद्रत, ८ मालव, ९ अंग, १० वंशकलिंग, ११ विरेह, १२ ताम्रलिप्त, १३ रक्षोवाह, १४ त्रिगते, १५ मर्तिकावत, १६ शिबी, १७ बृहन्दल, १८ सोमदत्त, १९ मिथिला, २० निषाद, २१ मगध ही जिंकून गुरु कश्यप ह्यांना दान केलं आणि गुरु कश्यपांनी क्षत्रिय वर्गास उभं करण्याचं काम केलं.

वाल्मिकी रामायणात त्यांना ‘क्षात्रविमर्दन’ न म्हणता’ ‘राजविमर्दन’ असं म्हटलं आहे.

त्यांच्या बाबतीत काही आणखी ही तथ्यं आहेत.
काही कारणाने रेणुकेकडून पतिव्रतेस कलंक लागण्याजोगे कृत्य घडले.

जेंव्हा जमदग्नींनी माता रेणुकेचा वध करण्याचा आदेश दिला तेंव्हा परशुरामांना सोडून परशुरामांच्या रुक्मवान, सुषेणवसु आणि विश्वावसु ह्या त्यांच्या भावांपैकी कोणीच तो मानला नाही. त्यामुळे प्रसन्न होऊन जमदग्नींनी त्यांना वरदान मागण्यास सांगितलं. त्यावर परशुरामांनी आईला जिवंत करून तिच्या आयुष्यातून ही आठवण पुसून टाकण्याचे वरदान मागितले.

ते चिरंजीव का झाले ? त्याचे कारण ही ह्यातच आहे.

माता रेणुकेचा वध केल्यानंतर जमदग्नींनी परशुरामाला त्याने मागितलेले वरदान तर दिलेच पण प्रसन्न होऊन
“तू चिरंजीव होशील” हे वरदान ही दिले.

त्यांच्या चिरंजीवी होण्यामागे एक आख्यायिका सापडते ती अशी.

चक्रतीर्थ ह्या ठिकाणी परशुरामांच्या कठिण तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान विष्णूने त्यांना वरदान दिले की ‘त्रेतायुगात रामावतार झाल्यावर आणि त्यांचे तेजोहरण झाल्यावर कल्पांता पर्यंत तू तपस्यारत भूलोकावर राहशील.’

भगवान् शंकराची कठोर तपश्चर्या करून जसं त्यांनी त्यांच्या कडून ‘परशु’ हे अस्त्र प्राप्त केल होतं तसंच शंकराने प्रसन्न होऊन त्यांना एक धनुष्य ही दिलं होतं. त्रेतायुगात जेंव्हा परशुराम तपश्चर्या करण्यास हिमालयावर जाऊ लागले तेंव्हा ह्या शिवधनुष्याचे काय करावे ? कुठे ठेवावे ? म्हणजे ते सुरक्षित राहील हा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी ते शिवधनुष्य मिथिला नरेश जनक ह्यांच्याकडे सोपवले. ते धनुष्य उचलणं तर सोडाच पण एके ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ही कोणी ठेऊ शकत नव्हतं. पण सतयुगामधे तेच धनुष्य सीतेने लीलया उचलून दुसरी कडे ठेवले. ह्याच शिव धनुष्यावर प्रत्यंचा चढवून रामाने सीता स्वयंवर जिंकले.

परशुराम एखाद्याला युद्धात परास्त करु शकले नाहीत हे विश्वास ठेवण्या सारखं आहे का ? नाही ना ? पण जवळपास असंच घडलं होतं. ते कथानक हे.

परशुराम आपला शिष्य भीष्म ह्याला युद्धात पराजित करु शकले नाही. अंबिकेमुळे त्या दोघांत वाद झाला. अंबिकेशी लग्न करावं हे त्याचं म्हणणं भीष्मांना मान्य नव्हतं कारण त्यांनी ब्रह्मचर्य व्रत घेतलं होतं. वाद, युद्धात परिवर्तित झाला आणि त्यामुळे त्या दोघांत येऊन त्यांच्या पित्याने शस्त्र ठेवण्याचा आदेश दिला. पुराणांमधील कथनानुसार परशुराम आणि भीष्म दोघेही अवध्य होते. त्यामुळे त्या युद्धात कोणाचीच हार जीत झाली नाही.

महाभारत युद्धाच्या वेळी श्रीकृष्णां बरोबर धृतराष्ट्राशी संधीवार्ता करताना ही परशुरामांनी धृतराष्ट्राला समजावलं होतं.

कर्णाचे आचार्यपद स्वीकारून त्याचे ‘ब्राम्हण असल्याचे’ मिथ्या वचन उघड होताच ‘ ऐन वेळेस तू , मी शिकवलेली विद्या विसरशील’ हा शाप दिला. ह्या घटनांनी ते महाभारत काळातही वावरत असल्याचे आपल्याला कळते.

राम, भीष्म, कर्ण ह्या व्यक्तीं बरोबर त्यांचे असणे या सर्व युगांमधे ते वावरत असल्याची जाणीव करवून देते.

एक कथानक गणपतीचं. ते एकदंत कसे झाले ? त्याचं. ते ही रोचक आहे.

ब्रह्मवैवर्त पुराणानुसार एकदा परशुराम कैलास पर्वतावर भगवान शंकराला भेटायला गेले असता ‘ते ध्यानमग्न अवस्थेत आहेत तेंव्हा आत्ता भेटता येणार नाही.’ हे गणपतीचं बोलणं ऐकून रागाच्या भरात त्यांनी परशूचा वार केला. त्यामुळे गणपतीचा एक दात तुटला आणि ते एकदंत झाले.

“अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु:।
इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।

चारी वेद मुखोद्गत असणारा,पाठीवर बाणांसह धनुष्य धारण करणारा म्हणजेच ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज असणाऱ्या, विरोधात जाणाऱ्याला शापाने अथवा बाणाने मारणारा तो हा परशुराम. ह्यांच्या व्यक्तित्वा वर जरा वेगळा विचार.

‘परशु’ प्रतीक आहे पराक्रमाचं आणि ‘राम’ सत्य सनातनाचं. त्यामुळे परशुरामाचा अर्थ पराक्रमकारक आणि सत्यधारक. परशुराम हे विष्णूचा सहावा अवतार असल्याने, त्यांच्यात आपादमस्तक विष्णू प्रतिबिंबित होतात. बघायला गेलं तर ‘परशु’ ह्या शब्दात शिव तर ‘राम’ ह्या शब्दात विष्णूचे प्रतिबिंब दिसते. म्हणून की काय ते विष्णू चा अवतार असले तरी त्यांच्या व्यवहारात शिव आणि विष्णू दोघांचे समन्वय असल्याने ते शिव हरि भासतात.

ब्रह्माचे काम उत्पत्ती, विष्णूंचे काम पालन आणि शिवाचे काम संहरण अशी तिघांची तीन कामे आहेत;
असं आपण म्हणतो. परशुराम विष्णूंचा अवतार म्हणजे पालन पोषण हा त्यांचा गुणधर्म. तर त्यांच्या नावातलं राम हे पालन/ रक्षणाचं शास्त्र. शस्त्रधारण केल्याने लक्षात येते शक्ती. शास्त्राने मिळते ज्ञान, शांती आणि संस्कार. परशुराम, परशुच्या रूपात शस्त्र आणि रामच्या रूपात शास्त्र ह्या दोघांचे प्रतीक आहेत. ते शस्त्र आणि शास्त्राचे समन्वयक आहेत. ह्यांच्यात तेज, ओज आणि शौर्य हे तिन्ही गुण फारच दुर्मिळ पण एकत्र समाविष्ट आहेत.

परशुरामांची शस्त्रशक्ती अक्षय आहे आणि शास्त्र संपदा अनंत. विश्वकर्माद्वारे अभिमंत्रित दिव्य धनुष्यावर फक्त आणि फक्त परशुरामच प्रत्यंचा चढवण्यास समर्थ होते. हे त्यांच्यातील अक्षय शक्तीचे द्योतक आहे.
पितृ आज्ञेने मातेचा वध केला त्यामागे त्यांच्यात दडलेला राम हे कारण आहे. राम हे सत्य सनातन. सत्य हे दिव्यता आणि सात्विक सत्ता. मातेच्या वधा नंतर त्यांना जीवनदान देऊन, झाला प्रकार स्मरणात न राहण्याचे वरदान मागून त्यांनी परत एकदा पुत्रधर्माचं पालन केलं.

अपरान्ताची वसाहत
गुजरातमधील भरूचपासून दक्षिणेकडे थेट कन्याकुमारीपर्यंतची चिंचोळी भूपट्टी भगवान परशुरामांनी वसविली. तोपर्यंत पृथ्वी या संकल्पनेत समाविष्ट नसलेला हा अपरान्ताचा भाग शिष्यांची ६४ कुळे या भागात आणून त्यांनी लागवडीखाली आणला. या घनदाट अरण्यात नागरी वस्ती आणि आर्य संस्कृतीप्रणीत यज्ञव्यवस्था परशुरामांमुळे सुरू झाली. साहजिकच या संपूर्ण पट्ट्यात परशुरामांची अनेक लहानमोठी मंदिरे आणि ठाणी पाहायला मिळतात. मुंबईतील वाळकेश्वराचा बाणगंगा तलाव परशुरामांनीच बांधला, असे मानले जाते. कन्याकुमारीचे कन्याकुमारी मंदिरही परशुरामांनीच बांधले असून त्या मंदिराजवळचा पापनाशन तीर्थ म्हणून ओळखला जाणारा तलावही त्यांनीच बांधला. माता अहल्येला भ्रष्ट केल्यामुळे गौतम ऋषींकडून शापित झालेल्या इंद्राला पापक्षालनासाठी या स्थानीच यावे लागले हे संपूर्ण अपरान्त क्षेत्र परशुराम भूमी म्हणूनच ओळखले जाते.

पश्चिम दिशेचे संरक्षणकर्ते म्हणून ते कोकण किनारी वास्तव्य करून आहेत. कश्यप ॠषींना पृथ्वी दान करून स्वतःसाठी समुद्राला मागे हटवून अपरांत भूमीची म्हणजेच कोकणाची निर्मिती करणाऱ्या श्री परशुरामांचे प्राचीन मंदिर चिपळूण जवळ १२ किमी अंतरावर आहे. – लोटे परशुराम गावी, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. त्यांनी अनेक ठिकाणी १०८ शक्तीपीठांची स्थापना केली.देशात बऱ्याच ठिकाणी त्यांची मंदिरे ही आहेत.

अशा ह्या चिरंजीवी परशुरामाने शस्त्र आणि शास्त्र ह्यात एकत्र वास्तव्य करून ह्या जगाला एक आदर्श घडवून दिला आहे . म्हणून त्यांची जयंती साजरी करून आपण त्यांचे स्मरण करत असतो.अक्षय तृतीयेला विष्णूची षोडशोपचारे पूजा करून व्रत ठेऊन त्यांचे स्मरण करतात.
अशा ह्या व्यक्तिमत्त्वाला माझे शतशः नमन.

राधा गर्दे

– लेखन : राधा गर्दे. कोल्हापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments