Thursday, November 21, 2024
Homeसंस्कृतीअक्षय तृतीया

अक्षय तृतीया

आज अक्षय तृतीया आहे. त्या निमित्ताने या सणाचे महत्त्व सांगणारा हा लेख. लेखक श्री मनोज कुळकर्णी यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे.
आपणास अक्षय तृतीयेच्या मनःपुर्वक शुभेच्छा.
– संपादक

अस्यां तिथौ क्षयमुर्पति हुतं न दत्तं।
तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया।
उद्दिश्य दैवतपितृन्क्रियते मनुष्यै:।
तत् च अक्षयं भवति भारत सर्वमेव।

पुराणानुसार, महाभारतात एका प्रसंगी भगवान कृष्ण युधिष्ठिराला म्हणतात, ‘हे राजा या दिवशी केलेल्या दान व हवनाचा नाश होत नाही म्हणून आपल्या ऋषीमुनींनी याला ‘अक्षय्य तृतीया’ असे संबोधले आहे. या दिवशी पितरांची व परमेश्वराची कृपा मिळवण्यासाठी केलेले काम अक्षय अविनाशी असते. तसेच या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी) होते’.

अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. याप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते.

अक्षय्य शब्दाचा अर्थ आहे ‘कधीही नाश होत नाही असा’. या दिवशी केलेला जप, दान, ज्ञान हे अक्षय्य फळप्राप्ती देणारे असते. म्हणून याला अक्षय्य तृतीया असे म्हणतात. भविष्यपुराण, मत्स्य पुराण, पद्मपुराण, विष्णुधर्मोत्तर पुराण, स्कंदपुराणात याचा विषेश उल्लेख केलेला आढळतो. या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे श्रेष्ठ फळ मिळते. वैशाख महिना हा भगवान विष्णु साठी आवडता आहे. म्हणून विशेषतः विष्णू व देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते.

या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे.

या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे. म्हणून जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो असा समज आहे. या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दारे ही उघडतात.
नर-नारायण या दोन देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता असे मानले जाते.

या दिवशी पाण्याचे मडके, पंखे, पादत्राणे (चप्पल-बूट), छत्री, जवस, गहु, तांदूळ, वस्त्र यांचे दान करणे पुण्यदायी असते. परंतु दान हे सत्पात्री असावे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.

महाराष्ट्रातील खान्देश मध्ये अक्षय तृतीयेच्या सणाला “आखाजी” म्हणून संबोधले जाते, खान्देशात आखाजी हा सण दीपावली इतकाच महत्त्वाचा गणला जातो. सालदार, बलुतेदार अक्षय तृतीया या दिवसापासून नवी सुरुवात करतात.

अक्षय म्हणजे “जे कधीही संपत नाही” आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय्य तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फल देते. म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते, त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही.

अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा अतिशय पवित्र सण आहे. सर्व हिंदू तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

आखाती तीजमागे अनेक हिंदू श्रद्धा आहेत. काही जण याचा संबंध भगवान विष्णूच्या जन्माशी जोडतात, तर काही जण भगवान श्रीकृष्णाच्या लीलाशी जोडतात. सर्व समजुती श्रद्धेशी संबंधित असण्यासोबतच खूप रोचक आहेत. काही अख्यायिका ह्या अक्षय तृतीया दिवसाबद्दल सांगितल्या जातात, जसे….

1. हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूने श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. या दिवशी विष्णू सहाव्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले आणि म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, त्रेता आणि द्वापर युगापर्यंत विष्णू पृथ्वीवर चिरंजीवी (अमर) राहिले. परशुराम हे सप्तर्षींपैकी एक ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते. हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले आणि म्हणूनच अक्षय्य तृतीया आणि परशुराम जयंती सर्व हिंदू मोठ्या थाटामाटात साजरी करतात.
2. दुसर्‍या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती. भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती. या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते आणि म्हणूनच या दिवसाचा हिंदूंच्या पवित्र सणात समावेश होतो. या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तीची पापे नष्ट होतात असा समज आहे.
3. महर्षी वेद व्यास यांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला ‘अक्षयपात्र’ प्राप्त झाले होते. या अक्षयपात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीच संपत नाही. या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे. या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेले दानाचे पुण्यही अक्षय मानले जाते, म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे माणसाचे भाग्य वाढते.4. अक्षय्य तृतीयेची आणखी एक कथा महाभारतात प्रचलित आहे. या दिवशी दुशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता. या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी दान केली होती.
5. अक्षय्य तृतीयेमागे हिंदूंची आणखी एक रोचक श्रद्धा आहे. श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला तेव्हा अक्षय्य तृतीयेच्या दिवशी त्यांचा गरीब मित्र सुदामा कृष्णाला भेटायला आला. कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त चार तांदळाचे दाणे होते, तेच सुदामाने कृष्णाच्या चरणी अर्पण केले. पण आपला मित्र आणि सर्वांचे हृदय जाणणाऱ्या देवाने सर्व काही समजून घेऊन सुदामाचे दारिद्र्य दूर केले, त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले. तेव्हापासून अक्षय्य तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व वाढले आहे.

आजकाल अक्षय तृतीया ला असं म्हणतात की सोनं खरेदी कराव म्हणजे घरात समृध्दी राहते म्हणून जो तो ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे 1 ग्रॅम ते काही तोळे सोनं खरेदी करतो. नवीन वाहन, घर खरेदी तसेच कुठल्याही नवीन शुभ कार्याची सुरुवात ह्या शुभ दिनी करतात.

माझ्या मते जर प्रत्येकाने रोजच अक्षय तृतीया आहे असे समजून जर सदभाव, सदसद विवेकबुद्धी, सदाचार आणि लोकांबद्दल प्रेमभावना ठेवली तर नक्कीच आपल्याकडे अक्षय सुख, समृध्दी, शांती आणि उत्कर्ष राहील.
सर्वाँना अक्षय सुख, समृध्दी, उत्तम आरोग्य आणि स्वस्थता लाभो हीच लक्ष्मी विष्णू चरणी प्रार्थना.

मनोज कुळकर्णी

– लेखन : मनोज कुलकर्णी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments