Friday, November 22, 2024
Homeसेवामी ‘वसुंधरा’ बोलतेय !

मी ‘वसुंधरा’ बोलतेय !

आज २२ एप्रिल. हा दिवस “जागतिक वसुंधरा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने जाणून घेऊ या, ही वसुंधरा आपल्याला काय सांगतेय ते !
– संपादक
जशी आई मुलांची काळजी घेते त्याचप्रमाणे निसर्ग आपली काळजी घेत असतो. या निसर्गाचा पाया म्हणजेच ‘वसुंधरा” (पृथ्वी).

पण आपण कधी विचार करतो का आज या पृथ्वीची आपण काय अवस्था केली आहे ? आज ती अनंत वेदना, यातना सहन करत वातावरणात जे बदल होत आहेत त्याची झळ सोसताना दिसतेय. या सर्वाला फक्त आपणच जबाबदार आहोत. निसर्गतः दिलेली देणगी हि अमर्याद आहे. या नैसर्गिक वातावरणात सर्वप्रथम मानवानेच बदल घडविले.

पृथ्वीवरील सर्वात हुशार प्राणी हा मानव आहे कारण त्याची विचार करण्याची प्रक्रिया सर्व प्राण्यांपेक्षा विकसित आहे. हि विचार करण्याची प्रक्रिया दोन प्रकारची आहे ती म्हणजे एक सकारात्मक आणि दुसरी नकारात्मक. यावरून एक म्हण लक्षात येते “मनुष्य हा निसर्गाचा निर्माता व विध्वंसक” आहे. म्हणजेच इंग्रजी भाषेमध्ये “Man is the creator of Environment and Man is the Destructor of Environment.”

जेव्हा आपण मानवाला निसर्गाचा निर्माता म्हणतो तेव्हा आपण पर्यावरणाचा समतोल राखतो त्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण करतो, संवर्धन करतो. “वृक्षवल्ली ! आम्हा सोयरे !!” म्हणत झाडे लावतो, त्यांची निगा करतो. वातावरण शांत, गार ठेवतो. प्रदूषण विरहित शहर ठेवतो. शुद्ध हवा, पाणी, अन्न आरोग्यास पोषक असे वातावरण ठेवतो. आणि आपणच जागतिकीकरण, औद्योगिकरण, शहरीकरण, मॉल्स नावाखाली आपल्या हव्यासापोटी मोठ्या प्रमाणात जंगलतोड करीत आहोत, निसर्गात बदल घडवित आहोत. आपण मूलतः निसर्गातील जी जैव विविधता आहे ती नष्ट करीत आहोत. अनेक दुर्मिळ, झाडांच्या जाती प्रजाती, प्राणी, पक्षी नामशेष होत असताना पाहतोय.

मुख्य म्हणजे जंगलतोड करताना आपण हे विसरतो कि, आपला जन्मता निसर्गाशी जोडलेला दुवा म्हणजे प्राणवायू (ऑक्सिजन). हा प्राणवायू आपल्याला झाडांकडूनच मिळतो. झाडे तोडताना आपण हा विचार नाही करत कि आपण असेच झाडे तोडत राहिलो तर आपल्याला हा प्राणवायू (ऑक्सिजन) जो जीवनावश्यक आहे तो मिळणार कुठून ? याचा विचार सर्वानी करून प्रत्येकाने जंगलतोड थांबवून झाडे लावले पाहिजे. वृक्षारोपण केले पाहिजे. आणि फक्त वृक्षारोपण करून उपयोग नाही तर प्रत्येकाने ते झाड जोपासण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. आणि पृथ्वीला हरीभरी ठेवली पाहिजे.

आज आपण तापमानातील बदल पाहतोय. उष्माघाताने माणसांचे प्राण जाताना पाहतोय. या बदलाचे कारण हि आपणच आहोत कारण मोठ्या प्रमाणात.

आपल्यात आणि झाडांमध्ये प्राणवायू व कार्बन – डाय – ऑक्साईड ची सतत देवाणघेवाण चालू असते. म्हणजेच आपण श्वासोच्छवासावाटे प्राणवायू घेतो व कार्बन – डाय – ऑक्साईड वायू सोडतो आणि झाडे कार्बन – डाय – ऑक्साईड वायू घेतात व प्राणवायू सोडतात. हि नैसर्गिक क्रिया आहे पण मानवाने निसर्गात हस्तक्षेप करत बदल घडविले. जंगल तोडले तर जो कार्बन – डाय – ऑक्साईड वायू आपण श्वासोच्छवासावाटे सोडतो तो कार्बन – डाय – ऑक्साईड वायू वातावरणात तसाच राहतो याचा विपरीत परिणाम हा पृथ्वीवरील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होते. परिणामी वातावरणातील तापमान वाढीमुळे उष्माघाताचे संकट आहेच पण या तापमान वाढीमुळे हिमालयातील बर्फ वितळतो व समुद्रातीळ पाण्याची पातळी वाढते. याचाच परिणाम हा “जागतिक तापवृद्धी” मध्ये होतो. यालाच आपण “ग्लोबल वार्मिंग” असे म्हणतो. या जागतिक समस्येने आपण वेढले आहोत.

आज आपण जागतिक, राष्ट्रीय, जिल्हा, स्थानिक पातळीवर अनेक समस्यांना तोंड देत आहोत. आज आपण अनेक प्रकारच्या प्रदूषणाला आमंत्रण दिले आहे. जसे वायू प्रदूषण, पाणी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जमिनीचे प्रदूषण, घनकचरा प्रदूषण या सर्वांचा विपरीत परिणाम पृथ्वीवर होत आहे. तिचे आजचे रूप पाहून खूप वाईट वाटते.

आज सुपीक जमिनीचे रूपांतरण हे पडीक जमिनीत होऊन जिकडे पाहावे तिकडे ती जमीन कचऱ्याने आच्छादलेली दिसते. ओस पडलेली, रुक्ष, तापलेली आजचे हे तिचे रूप बदलले पाहिजे. ती पुन्हा पूर्वीसारखी टवटवीत, हिरवीगार ठेवणे हे आपलेच कर्तव्य आहे. चला तर “संकल्प धरू आणि वसुंधरा पूर्ववत करू”

प्रा डॉ यशोधरा वराळे.

– लेखन : प्रा.डॉ.यशोधरा वराळे. प्रभारी प्राचार्या डॉ.आंबेडकर विधी महाविद्यालय, मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments