दोस्तांनो, मागील भागात आपण हाँगकाँग फ्लू, त्यामागची कारणे आणि दुष्परीणाम याबद्दल जाणून घेतले.
महामारी प्रत्येकच वेळी एकदम महाकाय स्वरूपातच येते, असे नाही तर कधी कधी साधे आजारपण देखील कालांतराने समाजविघातक रूप धारण करते. चेचक अर्थात देवी, पिलीया/कावीळ, स्कॅरलेट फिवर अशा काही रोगांचा यात समावेश होतो. ज्याबद्यल उहापोह होईलच मात्र या सर्व रोगांच्या तुलनेत कॉलराने बरेचदा डोके वर काढलेले आढळते.
आज विज्ञान फार पुढे गेले आहे. रोग होऊ नयेत म्हणून बऱ्याच रोगांवर अगदी शिशू अवस्थेत लसी दिल्या जातात, मात्र १८ व्या शतकात जेव्हा कोणतेही तंत्रज्ञान फारसे विकसित नव्हते, त्यावेळी कॉलरा नेमका होतो कशाने हे लक्षात यायला देखील बराच कालावधी लागला होता.
गेल्या २०० वर्षांच्या कालावधीत कॉलराच्या एकूण सात महामारी येऊन गेलेल्या असून पहिल्या कॉलरा साथीचा उगम भारतात १८१७ साली झालेला आढळतो. या व्यतिरीक्त दक्षिण अमेरीकेतील १९९१-१९९४ दरम्यान आणि अगदी अलिकडल्या काळातील कॉलराची साथ म्हणजे २०१६ ते २०२१ मधील येमन कॉलरा.
सूक्ष्मजीव (विषाणू आणि जीवाणू) अठराव्या शतकात सापडले होते, परंतु १९ व्या शतकाच्या उत्तरार्धापूर्वीपर्यंत शास्त्रज्ञ लझ्झारो स्पॅलान्झानी आणि लुई पाश्चर यांच्या प्रयोगांनी रोग निवारणाचा सिध्दांत अथवा रॉबर्ट कोच यांच्या रोगाच्या प्रसारामागचे मूळ कारण सूक्ष्मजीव आणि सूक्ष्मजंतू हे आहेत या सिद्धांतास उत्स्फूर्तपणे मान्यता दिलेली नव्हती. त्यामुळे सामान्यतः सर्वमान्य समजशक्ती नुसार रोगाची सामन्य लक्षणे लक्षात घेऊन त्यानुसार उपचार दिले जायचे.
मात्र असे असले तरींही १९ वे शतक हा औषधशास्त्रातील अमुलाग्र बदलांचा काळ मानला जातो, ज्यात उपचारादरम्यान भूल देण्यासाठी क्लोरोफॉर्म अथवा नायट्रस-डाय- ऑक्साइडचा वापर केला जावू लागला. त्याचप्रमाणे पॅथॉलॉजी देखील विकसीत झालेल्या होत्या.
मानवी शरीराचा शास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास व्हायला लागल्याने, उपचार तंत्र विकसीत झालेले होते. मात्र एवढे बदल होऊन देखील कॉलरा नेमका होतो कशाने, हे जाणून घेणे प्रशासन आणि आरोग्य खात्यापुढे एक आव्हान होऊन बसलेले होते.
वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरण यामुळे साथीच्या रोगाचा प्रादूर्भाव अधिकच वाढत चाललेला होता. आपण बालपणी शाळेत प्रयोगातून विज्ञान शिकायचो तसेच काही नवनवीन प्रयोग तत्कालिन वैद्यक बाधित रुग्णांवर करून पहात होते. मानवी आयुष्याला या साथीच्या रोगापासून वाचविणे या ध्येयाने तेव्हाचे वैद्यक पछाडलेले होते. आजही डॉक्टर्स कोविड रुग्णांची आतोनात सेवा करताय.
इसवी सन १८३२ च्या लंडनमधील काॅलराच्या साथी दरम्यान डॉक्टर थॉमस लट्टा यांना असे आढळून आले होते की, बाधितांच्या बाहूतून द्रवरूप सलाइन सोडले तर रुग्ण बाधित झालेला असला तरीही तो वाचतो. मात्र डॉक्टरांच्या या उपचारात शास्त्रीय तंत्राचा अभाव असल्याने ही उपचार पध्दती काळाच्या ओघात गुडूप झाली.
ज्याप्रमाणे वाढत्या समाज माध्यमांमुळे आज बरेचदा चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीचा सहज प्रसार होतो, तसेच त्याकाळी वर्तमानपत्र आणि वैद्यकीय पत्रिका यांच्या वाढत्या प्रसारामुळे या रोगावरील उपचाराच्या माहितीस पेव फुटू लागले. उठ सुट कुणीही वाटेल तो उपचार सुचवू लागला. याची प्रचिती तत्कालिन पत्रिका आणि वृत्तपत्र वाचल्यानंतर येतेच.
उपचाराबाबत गोंधळ आणि उपचारात होणारे बदल यातून १९ व्या शतकात लसींचा वापर बऱ्याच प्रमाणात वाढलेला होता. मात्र या रोगावर कोणत्याही उपचारापेक्षा जास्त गरजेचे होते ते शुध्दीकरण, स्वच्छता आणि साफसफाई.
लंडनच्या एडवन चांडविक याने स्वच्छतेबाबत चौकशी केली आणि उपलब्ध माहितीच्या आधारे स्वच्छतेच्या मोहिमेला युध्दपातळी वर सुरुवात केली. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी या कार्यात हिरीरीने भाग घेतला होता. लंडनमधील सांडपाण्याच्या नाल्या साफ करण्यात आल्या होत्या. साफसफाई अगदी हवी तशी झालेली होती. मात्र शुद्ध पवित्र थेम्स नदीचे पाणी यामुळे दुषित झालेले होते.
भारतातली जशी गंगा तशीच लंडनची थेम्स! मात्र पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत असणारी, ही नदी दुषित झाल्याने रोगाचा प्रादूर्भाव अधिकच वाढला होता.
१८२९ ते १८३७ दरम्यानच्या कॉलराच्या दुसऱ्या लाटेत संशोधकांची अनेक मते मतांतरे होती. फ्रान्समधली डॉक्टर्स कॉलऱ्याला विशिष्ट समुहाच्या गरीबीशी किंवा अस्वच्छ परीसराशी जोडत होते, तर रशियन या रोगाला संसर्गजन्य समजून बाधितास विलगीकरणात ठेवत होते. अमेरिकेच्या मते हा रोग स्थलांतरीत मुख्यतः आयरीशांनी आणलेला होता. तर काही ब्रिटीश याला दैवी शक्तींचा हस्तक्षेप समजत होते.
माणूस आजतागायत शिक्षणाने फार पुढे गेलाय मात्र परंपरेने त्याने अंधश्रद्धा देखील त्याच्या सोबत आणल्यात. काही तर अंधश्रध्देच्या अति आहारी गेल्याने आपदा काळात बऱ्याच समाज विघातक बाबी करताना दिसतात.
लंडन मधील कॉलराच्या तिसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढलेले होते. सदर परिस्थितीचा उल्लेख राणी व्हिक्टोरीया हिने आपल्या रोजनिशीत केलेला आहे. राणी लिहीते की, लंडनच्या ब्रॉडस्ट्रीट मधील कॉलराच्या उद्रेकाने काही दिवसातच ६०० जणांचा बळी घेतला होता, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या उद्येशाने तिने फ्लोरेन्स नाइटींगेल ज्या सुश्रुषालयात कॉलरा अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या त्यांची भेट घेतली.
कॉलरा हवेतील विषारी कणांमधून पसरतो असे मियास्मा थेअरीचे म्हणणे होते, मात्र डॉ. स्नो यांनी या साथीच्या रोगामागचे नेमके कारण शोधून काढले. ब्रॉडस्ट्रीट पंप मुळे पिण्याचे पाणी दूषित होत असल्याने आणि त्यातून कॉलराचा प्रादुर्भाव होत असल्याने त्याचे हँडल काढून घेण्यात यावे असे प्रशासनास सुचविले परंतु डॉ. स्नो यांचा हा सिद्धांत प्रशासनास मान्य नव्हता.
पुढे या साथीने लंडन मधे बरेच बळी घेतले. सन १८६६ साली सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणी सुरू असताना या साथीने डोके वर काढले आणि जवळपास ५५९६ बाधितांचा या रोगाने बळी घेतला. डॉ. स्नो यांच्या मृत्यूनंतर तब्बल आठ वर्षांनी त्यांचा सिद्धांत प्रशासनास मान्य नसतानाही सर्वमान्य झाला आणि त्यामुळे डॉ. स्नो कॉलरा अभ्यासाचे आद्य संशोधक ठरले.
प्रशासनाकडून त्वरित उचलण्यात आलेल्या पावलांमुळे पुढचे अघटीत टळले होते मात्र आधीचे संकट देखील प्रशासन टाळू शकले असते. पुढे कोच यांनी देखील याच सिद्धांताचा पाठपुरावा केला.
इसवी सन १८८५ मधे स्पेन मधील डॉ जैम फैरान ज्यांनी लुई पाश्चर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केलेले होते ते कॉलरावर लस निर्माण करणारे पहिले संशोधक ठरले. त्यांनी कॉलराच्या जंतूंवर थेट प्रक्रिया करून मोठ्या प्रमाणावर लसीचे उत्पादन केले आणि या साथीच्या रोगावर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र आजही पिण्याचे शुद्ध पाणी हा एरणीचा विषय आहे.
आजही सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लागल्याने कॉलऱ्यासारखे साथीचे रोग पसरत आहेत. परिसर स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी या साध्या बाबींविषयी जनता जागरूक असेल तर प्रशासन देखील नक्कीच दखल घेईल आणि या साथीच्या रोगांवर आळा घालता येईल.
क्रमश……

– लेखन : तृप्ती काळे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800