सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघात आनंद मेळ्यानिमित्त जाण्याचा काल मला योग आला. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी, त्या महिन्यात येणाऱ्या या संघातील सभासदांचा सामुदायिक वाढदिवस साजरा करण्यात येतो आणि त्या निमित्त करमणुकीचे इथे छान कार्यक्रम सादर होतात.
माझाही वाढदिवस एप्रिल महिन्यात येतो आणि हा सामुदायिक वाढदिवस ज्येष्ठ नागरिक संघात साजरा झाला याचा मला खुप आनंद झाला. वाढदिवस असणाऱ्यांच्या जोडीदाराने त्यांना पुष्प देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे असे स्वरूप असते तर माझ्या पतीने अगदी गुढग्यावर बसून मला पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. खरोखर लक्षात रहाण्यासारखा साजरा झाला. माझ्या वाढदिवसानिमित्त रिटर्न गिफ्ट म्हणून मी लिहिलेले ‘कॉमा’ हे पुस्तक, मी प्रकाशित केलेली, जीवनप्रवास आणि समाजभूषण २ अशी तीन पुस्तके या संघाला भेट दिली.
या कार्यक्रमात श्री घोलप, श्रीमती रत्नप्रभा पारपिल्लेवार, श्रीमती विजया हेब्बालकर यांनी कराओकेवर सुमधुर गाणी गायली आणि खर तर गाण्याची आवड या ज्येष्ठ नागरिक संघामुळे जोपासली जातेय याचे विशेष कौतुक वाटले. श्री प्रदीप पनवेलकर यांनी “ही चाल तुरतुरु तुरुतुरु” या गीतावर विडंबन काव्य सादर केले आणि विनोद सांगून त्यांनी सर्वांना मनसोक्त हसवलं.
यावेळी सर्वश्री भगवान शेजाळे, अध्यक्ष मारुती कदम आणि अन्य मान्यवरांची समयोचीत भाषणे झाली. या संघाला श्री आबा जगताप व श्री पांडुरंग आमले हे सतत मदत करीत असतात, याचा यावेळी कृतज्ञतेने उल्लेख करण्यात आला. श्री पांडुरंग आमले यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विठ्ल गव्हाणे यांनी केले. तर प्रास्ताविक सचिव श्री राजाराम खैरनार यांनी केले.
आजच्या कार्यक्रमास 150 सदस्य, त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. केक सह अल्पोपहार झाल्या नंतर
कार्यक्रमाची सांगता झाली.
हा कार्यक्रम या यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यानी खुप मेहनत घेतली.
संघाची वाटचाल…
नोकरीतून निवृत्त झाल्यावर किंवा आपला कारभार मुलाबाळांना सोपवून निवृत्ती चे जीवन जगणारे ज्येष्ठ नागरिक या संघाचे आजीवन सभासद होतात. ते आपल्या समवयस्कांसोबत गायन, वाचन, खेळ, सहलीला जाणे असे छंद जोपासतात. तसेच आदिवासी भागात जाऊन त्यांना जमेल तशी मदत करतात.
सगळ्यांबरोबर व्यायाम, योगा करणे, गप्पा गोष्टी करत स्वतःची आणि आपल्या साथीदाराची तब्येतीची काळजी घेणे या इथे नित्याच्या बाबी आहेत.
सानपाड्यातील सीताराम मास्टर उद्यानात वसलेल्या या
ज्येष्ठ नागरिक संघाचे जवळपास 1700 सभासद असून आतापर्यंत उत्कृष्ट संघ म्हणून या संघाला अनेक सन्मान मिळाले आहेत.
नेहमीच अतिशय खेळीमेळीचे वातावरण असलेला हा संघ २००५ साली स्थापन करण्यात आला. संघ स्थापनेत श्री भगवान शेजाळे, श्री एम पी सी नायर,
श्री एस भटनागर, कै. व्हि बी ओव्हळ, कै.एस पी हसबनीस, श्री जी टी कबनुर, श्री एम जी कदम, श्री एल बी नलावडे, श्री एच एम डोके, श्री टी पन्नीकर यांचे फार मोठे योगदान आहे.
नवी मुंबई महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त श्री विजय नाहटा यांनी संघाच्या अपेक्षांप्रमाणे सर्व काम मनापासून केले, याचा संघाच्या वाटचालीची माहिती देताना श्री भगवान शेजाळे यांनी आवर्जून उल्लेख केला.
विद्यमान अध्यक्ष श्री मारुती कदम, उपाध्यक्ष डॉ विजया कृ गोसावी, दुसरे उपाध्यक्ष श्री विठ्ठल गव्हाणे, सचिव श्री राजाराम खैरनार, सहसचिव श्री शरद रा पाटील, खजिनदार श्री विष्णुदास गो मुखेकर, सह खजिनदार श्री सुभाष प बारवाल, सदस्य सर्वश्री बळवंत पाटील, किरण चव्हाण, हरिश्चंद्र स शिंदे आणि श्रीमती भानुमती शहा विविध उपक्रम राबविण्यात पुढाकार घेत असतात.
या संघाच्या पदाधिकाऱ्यांचा पारदर्शी कारभार
आपलेपणा, उत्कृष्ठ नियोजन यामुळे दिलेल्या मदतीचा गैरवापर होणार नाही, याचा सर्वांना विश्वास वाटतो. हा विश्वास हा संघ नेहमी जपत आल्यामुळे या संघाचे आपण सभासद आहोत याचा सर्व सदस्यांना अभिमान वाटतो.

– लेखन : सौ अलका भुजबळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सौ.अलका भुजबळ ह्यांना …
वाढदिवसाच्या (Belated) हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
आपणांस आरोग्यदायी, ऐश्वर्यसंपन्न दिर्घायु लाभो हिच ईशचरणी प्रार्थना 💐🎂💐👏
॥जिवेत् शरद: शतम्॥॥जिवेत् शरद: शतम्॥
। शतायुषी हो, भाग्यवंत हो ।
….. वेळापुरे परिवार
आपल्या शुभेचछा मिळाल्या आभारी आहे.🤝