आज 1 मे, महाराष्ट्र व कामगार दिन. या निमित्ताने मराठी साहित्य आणि संस्कृती चा थोडक्यात घेतलेला हा आढावा.
महाराष्ट्र व कामगार दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
भीमथडीच्या तट्टांनाही यमुनेचे पाणी पाजण्याची विजिगिषु ऊर्जा प्रकट करणाऱ्या, कविवर्य व पत्रकार राजा बढे यांच्या लेखणीतून उतरलेल्या आणि पद्मश्री शाहीर साबळे यांच्या पहाडी आवाजाने अजरामर केलेल्या महाराष्ट्र गीताला राज्याच्या मंत्रिमंडळाने या वर्षाच्या प्रारंभीच 31 जानेवारी 2023 रोजी राज्यगीताचा दर्जा देऊन गौरवान्वित केले.
महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि उत्सवांचे, अंगावर रोमांच उभे करणारे हे गौरवगीत तमाम मराठी माणसांच्या काळजावर कोरणारे शाहीर कृष्णराव साबळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे, हे विसरायला नको.
बहु असोत सुंदर संपन्न की महा…
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा…
या श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेल्या व शंकरराव व्यासांनी संगीतबद्ध केलेल्या गीतातील या काव्यपंक्ती म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक अस्तित्वाचं मर्मच आहेत.
छत्रपती शिवरायांचा आणि ज्ञानोबा- तुकारामांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र धर्म हा विशिष्ट जातकुळीचा किंवा वंश परंपरेचा धर्म नव्हे. हा धर्म आहे मनोधारणेचा, सांस्कृतिक नीतीमूल्यांचा आणि विचारसरणीचा !
गेली आठ- नऊशे वर्षं हा धर्म वाढता वाढता वाढला, तो मराठी भाषेच्या संपन्नतेमुळं. तिच्या वैचारिक वैभवामुळं. मराठी भाषेनेच आपला हा महाराष्ट्र धर्म सतत प्रवाहित ठेवला.
महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींनी मराठी भाषेला धर्म आणि साहित्य, संवादाची भाषा केले. ज्ञानदेवांनी माय मराठीचं इतक्या सार्थपणे वर्णन केलं आहे की, या भाषेच्या सर्वात्मकतेतून या मराठी भूमीत गेली सात-आठशे वर्षं संतांची मांदियाळी निर्माण झाली.
श्री चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास यांच्यापासून थेट संत चोखोबा, संत सावता माळी, संत जनाबाई आणि अगदी अलिकडच्या काळातील संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज यांच्या अभंगवाणीतून आणि आचार- विचारांतून सामाजिक जाणीव सतत पाझरत राहिली. या संतश्रेष्ठांनी माणसांची मनं इतकी मोठी केली की, त्यात देवत्वसुद्धा मावेनासं झालं. मराठी मनाचा सांस्कृतिक आविष्कार असा माय मराठीच्या अंगाखांद्यावरच वाढत राहिला. संत ज्ञानेश्वरांनी तर आपल्या पसायदानात मांडलेला समतेचा वैश्विक विचार सर्वदूर नेला. असा हा सांस्कृतिक महाराष्ट्र इथल्या संतांनी, प्रतिभावंत कवींनी आणि कलावंतांनी, शास्त्रज्ञ- तंत्रज्ञांनी तसेच बुद्धिवंत आणि विचारवंतांबरोबरच कष्टकर्यांनीही जागता ठेवला.
छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य जवळपास दीडशे वर्षं कायम राहिले. पेशव्यांनी मोठ्या निष्ठेने या बलशाली स्वराज्याची सीमा वाढविली आणि मराठी दौलतीची ध्वजा सर्वदूर फडकावली. नंतरच्या काळातील परवशतेतही महाराष्ट्राची जाज्वल्य अस्मिता टिकूनच होती.
स्वातंत्र्यलढ्यातील ‘टिळकपर्व’ ही महाराष्ट्राची मोठी पुण्याईच. या पर्वकाळात राजकीय आणि सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तनाच्या दिंड्या अग्रभागी ठेवून महाराष्ट्राने त्या अभिमानाने मिरविल्या. आपल्या सांस्कृतिक महत्तेतूनच टिळकांनी राजकीय परिवर्तनाचे शिंग फुंकले होते. लोकमान्यांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सांस्कृतिक परिमाण होते.
महात्मा गांधी यांच्या लढ्यासाठी आवश्यक असलेली मानसिक आणि वैचारिक पार्श्वभूमी आणि कार्यकर्त्यांची पिढी या सांस्कृतिक वारशातूनच तयार झाली. स्वातंत्र्यलढ्याच्या या धगधगत्या पर्वात स्वातंत्र्यवीर सावरकर, सेनापती बापट, विनोबा भावे, शंकरराव देव, लोकनायक बापूजी अणे, साने गुरुजी, स्वामी रामानंदतीर्थ, क्रांतिसिंह नाना पाटील आदी नेत्यांनी असामान्य पुरुषार्थ गाजवला.
सामाजिक विचारही महाराष्ट्राला नवा नाही. महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदायाने तो शतकानुशतके इथं रुजवला. एकीकडे राजकीय विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघत असतानाच, सामाजिक परिवर्तनातून महाराष्ट्राची संस्कृती टिकविण्याची वादळी सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांनी केली. त्यांनी मराठी पत्रकारितेचा पाया रोवला. लोकहितवादी, न्या. महादेव गोविंद रानडे हे त्याच मालिकेतील कर्ते सुधारक होते. या चळवळीतील महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, छत्रपती शाहू महाराज, महर्षि आण्णासाहेब कर्वे यांचे कार्य म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाबरोबरच इथल्या सांस्कृतिक जीवनाचीही पहाट होय.
घटनाकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीला व्यापक बैठक दिली. इथल्या सर्वहारा व शोषित- वंचित समाजाला जागृत समाजभान दिले. समाजकारण आणि राजकारण या दोन्ही प्रवाहांच्या हातात हात घालून महाराष्ट्राची सांस्कृतिक महत्ता दिसामाशी समृद्ध होत राहिली. श्री चक्रधर स्वामी, ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या नंतरच्या संतांनी, वामन-मोरोपंतांसारख्या पंडित कवींनी आणि मराठी दौलतीच्या उत्तरकाळी शाहीर रामजोशी, सगनभाऊ, अनंत फंदी, होनाजी बाळा यांच्या सारख्या समर्थ शाहिरांनी मराठी भाषा श्रीमंत केली.
केशवसुतांनी आधुनिक कवितेचा प्रवाह प्रवाहित केला आणि त्यानंतर गोविंदाग्रज, बालकवी, माधव ज्युलियन, भा.रा. तांबे, कुसुमाग्रज, कवी अनिल, बा.सि. मर्ढेकर, आदी कविवर्यांनी मराठी कविता संपन्न केली.
आण्णासाहेब किर्लोस्कर, गो.ब. देवल, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर राम गणेश गडकरी यांच्यापासून मामा वरेरकर, मो.ग. रांगणेकर, वि.वा. शिरवाडकर, वसंत कानेटकर आदी प्रतिभावंतांनी मराठी रंगभूमी वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवली. बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर, नानासाहेब फाटक, दुर्गा खोटे, चिंतामणराव कोल्हटकर यांच्यासारख्या मातब्बर अभिनयसम्राटांनी मराठी माणसांवर अधिराज्यच गाजवले. तर वि. स. खांडेकर, ना.सि.फडके, आचार्य अत्रे, ग.दि. माडगूळकर, पु ल. देशपांडे आदी चतुरस्त्र लेखकांनी मराठी भाषेला नवा दिमाखदार डौल दिला.
लक्ष्मीबाई टिळक, इरावती कर्वे, दुर्गा भागवत, मालतीबाई बेडेकर, शांता शेळके, इंदिरा संत अशा अनेक लेखिकांनी संपन्न लेखन केले.
दलित साहित्याच्या निमित्ताने मराठी साहित्यात आतापर्यंत दबून राहिलेले भावविश्वही नवे वळण घेऊन आले. प्रामुख्याने आण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, दया पवार, लक्ष्मण गायकवाड, लक्ष्मण माने, डाॅ. गंगाधर पानतावणे, शरणकुमार लिंबाळे यासारख्या लेखकांनी उपेक्षित वर्गाच्या दाहक अनुभवांचा सूर मोकळा केला.
महाराष्ट्राला भक्तीबरोबरच संगीत आणि लोककला यांचाही फार श्रीमंत वारसा लाभला आहे. माडिया नृत्य, बंजारा गीते, धनगर बांधवांचे गजानृत्य, खंडोबाचा येळकोट, वाघ्या मुरळी, वासुदेव, गोंधळ, गणगौळण, तमाशा, पोवाडे, दशावतारी या सर्व कला म्हणजे मराठी संस्कृतीची पारंपारिक लेणी होत. अलीकडच्ये काळात भाऊ बापू नारायणगावकर, दादू इंदुरीकर, अमर शेख, शाहीर साबळे आदी अनेक अस्सल कलावंतांनी लोकसंगीताची आणि लोककलांची समृद्ध परंपरा पुढे चालविली. संगीत व लोककलेबरोबरच शास्त्रीय संगीत हाही महाराष्ट्राच्या अस्मितेचा सुरेल पैलू आहे.
अभिजात संगीताचे महाराष्ट्र हे भारतातील सर्वोच्च पीठच होय. पं बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर,
पं. विष्णु दिगंबर पलुस्कर, भास्कबुवा बखले, कृष्णराव फुलंब्रीकर, पं. नारायणराव व्यास, अब्दुल करीमखां आदी संगीताच्या जगात सूर्यासारखी तळपणारी मंडळी मराठी मातीतच रुजली. या थोर कलावंतांनी अभिजात संगीताचा प्रसार संपूर्ण भारतात केलाच, पण बालगंधर्व, हिराबाई बडोदेकर, मोगूबाई कुर्डीकर, भीमसेन जोशी , कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे, पं. जसराज, जितेंद्र अभिषेकी, किशोरी आमोणकर, प्रभा अत्रे, माणिक वर्मा, अजित कडकडे आदींसारख्या संगीतातील प्रतिभासंपन्न गायकांची मालिकाच महाराष्ट्राला बहाल केली.
भारतीय चित्रसृष्टीची महाराष्ट्र तर जन्मभूमीच आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे महाराष्ट्राचे कलाभूषण होत. प्रभात फिल्म कंपनीने चित्रपटसृष्टीला देखणा वारसा तर दिलाच, पण अनेक ख्यातनाम कलावंतही दिले. भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, राजा परांजपे, गजानन जहागीरदार, शांता आपटे, ललिता पवार, दुर्गा खोटे, उषा किरण वगैरे कलावंतांची ख्याती सर्वदूर पसरली आहे. अव्वल दर्जाची पार्श्वगायिकाम्हणून अढळपद प्राप्त केलेल्या गानकोकिळा स्वरसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर म्हणजे महाराष्ट्राने आणि मराठी संस्कृतीने जगाला बहाल केलेले अनमोल लेणेच होय.
व्यावसायिक रंगभूमीबरोबरच महाराष्ट्राच्या प्रायोगिक रंगभूमीवरील नाटके पाहून परदेशातील चोखंदळ नाट्यरसिकांनीही गौरव केला आहे. प्रायोगिक रंगभूमीने तर मराठीला जागतिक रंगभूमीवरच्या मंचावर नेऊन बसविले आहे.
साहित्य, कला, रंगभूमी, लोककला व अन्य सांस्कृतिक क्षेत्रांत महाराष्ट्राने जो दूरचा पल्ला गाठलाय्, त्यात लेखक, कलावंत, नट, नाटककार यांचे तर योगदान आहेच, परंतु मराठी रसिकांचाही या दैदिप्यमान इतिहास परंपरेत मोलाचा वाटा राहिलेला आहे.
महाराष्ट्राच्या मातीत उगवून वटवृक्षासारख्या विस्तार पावलेल्या कला, संगीत, साहित्याचा इतिहास आणि हा इतिहास घडविणारी उत्तुंग माणसे यांचा गुणगौरव करताना —
मुक्या मनाने किति उधळावे शब्दांचे बुडबुडे ?
तुझे पवाडे गातिल पुढती
तोफांचे चौघडे…
या ओळी अनायासे ओठांवर आल्यावाचून राहात नाहीत. महाराष्ट्र धर्म आणि त्याचे मराठीपण इथल्या समृद्ध परंपरेच्या प्रत्येक आविष्कारातून सतत खुणावताना दिसते आणि ते खुणावत राहणारच आहे !!

– लेखन : जयप्रकाश दगडे. ज्येष्ठ पत्रकार. लातूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800