आज, १ मे. महाराष्ट्र दिनानिमित्ताने हा विशेष लेख. महाराष्ट्र दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
आज महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. आजच्या महाराष्ट्र दिनाचे वैशिष्ट्य हे की महाराष्ट्र शासनाने सर्व प्रकारचे शिक्षण हे मराठी माध्यमातून देण्याचा संकल्प सोडला आहे आणि ही खऱ्या अर्थाने मराठी पाऊल पुढे पडण्याच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट झाली आहे.
खरं म्हणजे याची सुरुवात खूप आधी व्हायला पाहिजे होती. आजकाल इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटलेले आहे. परंतु खऱ्या अर्थाने जर जगायचे असेल, खऱ्या अर्थाने जर जग समजून घ्यायचे असेल तर मराठी माध्यमातून शिक्षण घेणे हे केव्हाही चांगले.
जागतिक शिक्षण तज्ञांच्या मतांचा आधार घेतला तर असे लक्षात येईल की त्यांचा कल मातृभाषेतून शिक्षण याकडेच अधिक आहे. मातृभाषेतून शिक्षण दिले तर मुलांना त्याचे आकलन लवकर होते. तुम्ही जपानचे उदाहरण घेतले तर जपान हे प्रगतीशील राष्ट्र आहे. प्रत्येक चांगली गोष्ट ही जपानची आहे. त्याला कारणही तसेच आहे. तुम्ही जर जपानमध्ये उच्च शिक्षणासाठी गेलात तर तुम्हाला सर्वप्रथम जपानी भाषा शिकावी लागेल आणि नंतरच तिथलं शिक्षण तुम्हाला घेता येईल. आज इंग्रजीचा एवढा बोलबाला आहे. पण जपानने मातृभाषेतून शिक्षण देणे,मातृभाषेतून उच्च शिक्षण देणे याला प्राधान्य दिले आहे.
आजच्या दिवशी अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर या गावाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. मराठी भाषेतील सर्व प्रमुख ग्रंथ याच गावात लिहिल्या गेलेले आहेत. महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे ज्या ठिकाणी लीळाचरित्र ग्रंथाचे लेखन करण्यात आले त्या ठिकाणाला नुकतेच भेट देऊन आलेले आहेत. महाराष्ट्र शासनाने रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठाची घोषणा करून एक चांगली गोष्ट केलेली आहे. रिद्धपूरचे महत्व अनन्यसाधारण आहे. ते नवीन पिढीला नाही समजणार.
मराठी भाषेची खरी सुरुवात झाली ती महानुभाव पंथीय लोकांकडूनच. सर्वश्री गोविंद प्रभू, चक्रधर स्वामी, म्हाइंभट या मान्यवरांचे कार्य अनन्यसाधारण आहे .ते शब्दातीत आहे.
मी परवा तामिळनाडूमध्ये तंजावर येथे गेलो. आम्ही येत असल्याची सूचना श्री संभाजी राजे भोसले यांच्या नातेवाईकांना दिली होती. ते राजवाड्यात राहतात. भोसले च्या ऐवजी ते भोंसले असे लिहितात. मला आश्चर्याचा धक्का बसला. राजेसाहेब जेव्हा मला त्यांच्या ग्रंथालयात घेऊन गेले तर त्या ग्रंथालयाची देखरेख करायला दोन आयएएस अधिकारी शासनाने नेमलेले पाहून मला खरोखरच तामिळनाडू सरकारचं कौतुक करावंसं वाटलं. तंजावरला सरस्वती वाचनालय मध्ये सर्व भाषेतील दुर्मिळ ग्रंथाचे जतन करण्यात आलेले आहे. मी तिथे ताडपत्रावर लिहिल्या गेलेले ग्रंथ पाहिले.
आपल्याकडे रिद्धपूरला मराठीमध्ये हजारो ग्रंथ हस्तलिखितच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. खरं म्हणजे ती लिपी वाचन करणारी मंडळीही आता कमी होत चाललेली आहे. कारण ते सांकेतिक लिपी मध्ये आहेत तत्कालीन लिपीमध्ये आहेत. ती लिपी समजणारे फार कमी लोक आता राहिलेले आहेत. म्हणून शासनाने सर्वप्रथम ते ग्रंथ दीर्घकाळ राहतील या दृष्टिकोनातून जतन करणे गरजेचे आहे. मराठी विद्यापीठाच्या माध्यमातून ते होईल अशी अपेक्षा करूया.
आपण मराठी लोक संपूर्ण भारतामध्ये फिरतो. जगामध्ये फिरतो. पण जिथे मराठी भाषेचा जन्म झाला त्या रिद्धपूरला आपण किमान एक तरी चक्कर मारली पाहिजे. तिथली हस्तलिखिते पहावी अशी किमान अपेक्षा करायला हरकत नाही.
अशा या थोर मराठी भाषेला आपण जपलं पाहिजे. मराठी संस्कृतीला जपलं पाहिजे. तेव्हाच कुठे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र दिन साजरा होईल आणि आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, मराठी पाऊल पडते पुढे…..

– लेखन : प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक. मिशन आय ए एस
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800