‘तिचे आकाश‘
विभावरी शिरूरकर यांच्या १९३४ साली प्रसिध्द झालेल्या ‘कळ्यांचे निश्वास’ या कथासंग्रहापासून स्त्री जीवनातल्या आशा, आकांक्षा, दुःख ह्यांना वाचा फुटल्या. तेव्हांपासून आजतागायत सर्व नामवंत कथालेखिकांनी स्त्रीचं अनुभवविश्व आपल्या कथेतून विविध प्रकारे चित्रीत केले आहे, करीत आहेत.
१९६० ते अगदी १९९०-९५ पर्यंतच्या काळात सामाजिक, राजकीय विषयात स्त्रीचा सहभाग, स्त्रीला स्वतःच्या अस्मितेचे आलेलं भान अनेक कथेतून उमटलेलं आहे.
स्त्री ही माणूसच आहे तिला मनोव्यापारादी व्यापक क्षेत्र मिळाल्याने, रोजगाराची संधी उपलब्ध झाल्यामुळे मोठ्याप्रमाणात समाज आणि कौटुंबिक जीवन बदलत आहे.
म्हणूनच आजच्या एखाद्या नवोदित लेखिकेचा पहिला कथासंग्रह वाचण्याची इच्छा झाली आणि काही दिवसातच ‘तिचं आकाश‘ हा मोहना मोर्डीकर यांचा पहिलाच कथासंग्रह हाती आला.
विविध दिवाळी अंकातून वाचलेल्या स्त्रीच्या जीवनातील मनोविश्लेषनात्मक अभिरूचीत रस घेणा-या कथा आणि नव्याने पहिलाच कथासंग्रह प्रकाशित झालेल्या स्त्री लेखिकांचे मनोगत असलेल्या कथालेखन यांचा तुलनात्मक आढावा घेण्याची संधी मला मोहना मार्डीकर यांच्या ‘तिचं आकाश’ या कथासंग्रहामुळे मिळाली.
मोहना यांनी २१ कथा लिहिल्या आहेत. आपल्या
सभोवतालच्या समाजात होणारे बदल समस्यांच्या रूपाने पुढे येऊ लागल्याने त्या समस्यांची उकल लेखिका आपल्या कथेतून कशाप्रकारे करतात याचे कांहीसे कुतुहल मला वाटल्याने त्या सर्व कथा वाचल्या आणि त्यातून लेखिका उत्तम प्रकारे यशस्वी झालेल्या दिसत आहेत.
दररोज वृत्तपत्रातून येणाऱ्या बातम्यातून स्त्रियांच्या असुरक्षिततेच्या समस्येपासून तर भ्रूणहत्या, बलात्कार, लिव्ह इन रिलेशनशीप, विवाहबंधनात जखडून न घेण्याची इच्छा, विवाहबाह्य संबंध, घटस्फोट, आईबापांना न विचारता केलेले विवाह, दत्तक मुलेमुली, मायलेकींचे संबंध, नोकरीनिमित्त परदेशात स्थायिक झालेले मुले, मुली, त्यामुळे निर्माण झालेले तणाव, व्यसनाधीन पती, स्त्रीच्या भावनांचा कोंडमारा, अवयवदान असे अनेक विषय स्त्री मनाच्या बाजूने हाताळण्याचा प्रयत्न लेखिकेने या कथांतून केला आहे.
बदलत्या समाजव्यवस्थेतलं परिवर्तन स्रीला स्वीकारावे लागते. त्यातून स्त्री मनावर निर्माण होणारे परिणाम, कौटुंबिक वातावरणातील भलेबुरे नातेसंबंध, तारुण्य,
मात्तृत्व, मेनोपाँज, या अवस्थेतील अनुभव, यांचं मनोविश्लेषनात्मक दर्शन या कथांतून होतं !
फार दिवसांनी अमेरिकेतून आलेल्या आपल्या मुलासुनेचा, नातवांचा सहवास मिळावा अशी माफक इच्छा असलेल्या तिची झालेली घोर निराशा, याची ‘स्वप्नातल्या कळ्यांनो’ ही पहिलीच कथा खुप काही सांगून जाते. अशा विविध भावविश्वाच्या मनोवेधक एकवीस कथांचा संगम या पुस्तकातून निश्चितपणे झाला आहे.
एकूणच स्त्रीच्या जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा याची जाणीव लेखिकेने या कथांतून व्यक्त केली आहे. तसेच स्त्रीला कुटुंबात जगतांना स्वतःच्या अस्तित्वाला पदोपदी जी मुरड घालावी लागते याचे काहीसे अस्वस्थतेचे दर्शन या कथांमधून होते.
तिचं म्हणजे एका मध्यमवर्गीय, मराठी सुखवस्तु, कलासक्त, अभिजात संगीताचा कान व मन लाभलेल्या भाववेडी, स्वप्नवेडी, ध्येयप्रवण अशी प्रातिनिधिक स्त्रीचे क्षितिज दर्शविणार आणि तिचं आकाश असणाऱ्या ह्या संग्रहातील प्रत्येक कथा खुप काही सांगून जातात. त्या मुळातच वाचल्या पाहिजेत.
कथा या साहित्य प्रकाराला खुप समृध्द आणि सकस गुणवत्तेची प्राचीन परंपरा आहे. अनुभवांची, भावनांची, विचारांची देवघेव कथेच्या माध्यमातून होत असते. अनेक थोर कथालेखकांच्या कथा वाचून, नव्याने लेखन करणाऱ्या स्त्री लेखिकांना हा बदलत्या समाज व कौटुंबिक जीवनातील कथासंग्रह निश्चितपणे प्रेरणा देणारा ठरेल यात शंका नाही.

– परीक्षण : सुधाकर तोरणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800