Sunday, July 13, 2025
Homeलेखआयुर्वेद उवाच : १५

आयुर्वेद उवाच : १५

निद्रा (झोप)
आयुर्वेदाचे तीन प्रमुख उपस्तंभ मानले आहेत, ज्यांच्या आधारे आयुष्याचे पालन पोषण होते. आहार, निद्रा, ब्रम्हचर्य असे हे तीन उपस्तंभ आहेत. ह्यांचे नियमाला अनुसरून पालन केल्यास आयुष्याचे संगोपन होते अन्यथा आयुष्याचा ऱ्हास होतो.

आज आपण पाहू या त्रयोपस्तंभातील निद्रा हा उपस्तंभ. निद्रेला भूतधात्री म्हणजे मनुष्याचे धारण करणारी अनुषंगाने त्याच्या आयुष्याचे धारण करणारी असे म्हणतात.
* निद्रेचे कारण
यदा तु मनसि क्लान्ते कर्मात्मनः क्लमान्वितः ।
विषयेभ्यो निवर्तते तदा स्वपिती मानव: ।।
जेव्हा मन थकून जाते व इंद्रिय हि थकतात, म्हणजेच ते आपले कार्य नीट करू शकत नाहीत, त्यावेळी माणसाला झोप येते.
ह्याचाच अर्थ इंद्रियांवर अत्याधिक ताण पडल्यावर निद्रेची आवश्यकता असते, अन्यथा त्यांची कार्यक्षमता कमी होते.

* निद्रा योग्य प्रकारे घेतली तर ती शरीराला आरोग्य, पुष्टी, बल, पौरुष्य, समुचित ज्ञान व पूर्ण आयु प्राप्त करून देते.

* ज्याप्रमाणे शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी नियमपूर्वक भोजन आवश्यक असते त्याचप्रमाणे नियमपूर्वक निद्रा हि आवश्यक असते.

* शरीराची स्थूलता आणि कृषता हि आहार आणि निद्रा यावरच अवलंबून असते.

* निद्रेचे प्रकार – चरक आचार्यानी ६ प्रकार सांगितले आहेत.
१ तमोभवा – मनाच्या तम गुणांमुळे उत्पन्न होते.
२ श्लेष्म समुद्भव – शरीरात कफ वाढल्यामुळे येते.
३ मनः शरीरश्रम संभव – मन आणि शरीर थकल्यामुळे येणारी निद्रा.
४ आगंतुकी – बाहेरील प्रभावाने (विष, औषध) इ.
५ व्याधि अनुवर्तीनी – कोणत्याही व्याधी मुळे येणारी निद्रा
६ रात्री स्वभाव प्रभावा – रात्री च्या स्वभावाने येणारी निद्रा (भूतधात्री)

* निद्रेचा हीन, मिथ्या व अति योग
जर संपूर्ण निद्रेचा नाश झाला अथवा निद्रा पूर्ण झाली नाही आणि असे सतत झाले तर मनुष्य रोगग्रस्थ, कृश, दुर्बल होतो. तसेच त्याची इंद्रिय कार्यशक्ती कमी होते व आयुष्याचा नाश होतो.
तसेच निद्रा जर अकाली व अधिक प्रमाणात घेतली तर जाड्याता, कफाधिक्य इ. अनेक रोग होतात.

* दिवसा कोणी झोपावे
सतत गायन करणारे, अभ्यास करणारे, भारी वजन उचलणारे, अधिक पायी चालणारे, शारीरिक श्रम करणारे, मद्यपी, दुर्बल, अजीर्ण रोगी, अतिसारचे रोगी, श्वास रोगी, उचकी लागली असेल तर (मोठ्या रोगातील उचकी), क्रोध शोक भय पीडित व्यक्ती (ह्याची तीव्रता अधिक असेल तर), बालक, वृद्ध, तृष्णा रोगी ह्यांनी दुपारी शयन करावे.

* रात्री जागरण झाले असल्यास त्या व्यक्तीने जेवढे जागरण झाले आहे त्याच्या अर्धा वेळ दिवसा झोपावे परंतु काहीही न खाता. त्यानंतर अन्न सेवन करावे ह्यामुळे दोष वाढत नाहीत (रात्र पाळी करणाऱ्यांसाठी हा सल्ला आयुर्वेदात आहे) .

* उन्हाळ्यात आदान काळ असल्यामुळे तसेच रात्री छोटी असल्यामुळे रुक्ष शरीर असणार्यानी दिवसा झोपण्यास हरकत नाही.

* दिवसा झोपणे निषिद्ध
उन्हाळा सोडून अन्य ऋतूमध्ये, स्थूल व्यक्ती, सतत तेलकट तुपकट पदार्थ खाणारे, स्निग्ध आहार घेणारे, कफ प्रकृती अथवा कफ रोगी, कंठ रोगी, विष पीडित व्यक्ती ह्यांनी दिवसा झोपू नये.
* वाग्भटांच्या मते कंठ रोगी व विष बाधीत व्यक्ती ह्यांनी रात्रीही झोपू नये. विष बाधीत व्यक्ती झोपला असता विष वेग वाढतो व त्याची चिकित्सा असंभव होते.

* अयोग्य व्यक्तीनी दिवसा झोपल्यावर होणारे विकार –
हलीमक( काविळीचा तीव्र प्रकार) , डोके दुखणे जड वाटणे, शरीर जड वाटणे, स्थब्धता येणे, भूक मंदावणे, अरुची, हृदय जडता, सूज, मळमळ, सतत सर्दी, अर्धे डोके दुखणे, शरीरावर लाल चट्टे येणे, पुळ्या येणे,खाज सुटणे, तंद्रा, कंठ रोग, स्मृती नाश, बुद्धी जाड्याता, इंद्रिय दुर्बलता, ज्वर इ.

* रात्री जागरणाने वातवृद्धी होऊन शरीर रुक्ष होते, दिवसा झोपण्याने कफ वाढून जाड्य येते.

* आसिन प्रचलियत – बसल्या बसल्या झोपणे (खुर्च्या अथवा टेबलावर दिवसा) आताच्या भाषेत पॉवर नॅप ना रुक्ष आहे ना जाड्य कर उलट इंद्रियांचे बल वाढवते व कामास पुन्हा स्फूर्ती देते.

* निद्रानाश झाला असता उपाय (वैद्याच्या सल्ल्याने करावे) –
अंगाला तेल लावणे, शिरोअभ्यंग, शिरोधारा, बस्ती, उटणे लावणे, स्नान, मांस रस पान, भात, दूध, दही सेवन, तसेच सुखकर आसन इ. गोष्टी असाव्यात. मन प्रसन्न असावे ह्यामुळे निद्रा चांगली येते.

* अतिनिद्रा निवारण उपाय – (वैद्याच्या सल्ल्याने करावे)
शरीराचे शोधन, शिरोविरेचनं, नस्य, व्यायाम, रक्तमोक्षण, उपवास, झोपण्याचे स्थान योग्य नसणे, मन सतत व्यग्र असणे असणे इ.

* निद्रा निवारण विधीचा अतिरेक तसेच वृद्धावस्था व प्रतिकूल परिस्थितीत निद्रा घेणे ही निद्रा नाशाची मूलभूत कारण आहेत.

निद्रा हि मानवाच्या आयुष्याचे धारण करते, परंतु ती सुद्धा योग्य प्रकारे घेतली तरच, त्यामधली चूक हि आरोग्यासाठी अहितकर आहे.
भेटूया पुढील लेखात तोपर्यंत
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे।

डॉ शार्दुल चव्हाण

– लेखन : प्रा वैद्य शार्दुल चव्हाण. एम डी आयुर्वेद
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments