मी भारतीय आहे
मी शान भारताची
मज पुरेपुर जाण आहेच कर्तव्याची..
मज प्रिय माझी माती
मी लावतो कपाळी
उठताच पक्षी गाती
मज साठी ती भूपाळी…
प्राचीवरी उदेला
रविराज पाहतो मी
मी भाग्यवान किती महाराष्ट्री राहतो मी
उपजाऊ माय माती उपकार थोर तिचे
ऋण फेडण्या सुसज्ज सुपुत्र हो सतीचे…
सेवेस अर्पूनी ती सीमेवरी बडदास्त
ती थंडी ऊन वारा ते घालतात गस्त
जीवावरी उदार अर्पून प्राण त्यांचे
उतराई कसे व्हावे त्या वीर जवानांचे…
ही मायभूमी माझी प्राणाहूनी प्रिय
सुजलाम सुफलाम
सागर चरण घोय
किती परंपरा थोर ही बुद्धिमान भूमी
नरवीर जन्मले ते येथे कितीक नामी…
वंदितो चरण रोज
धुलिकण माळतो मी
माझ्याच भूमीवर
दररोज भाळतो मी
मांडीवरी तिच्या मी
घेईन चीरनिद्रा
ती शकुन साजरी हो आहे पहा सु भद्रा….

– रचना : प्रा.सौ.सुमती पवार
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800