Monday, July 14, 2025
Homeसाहित्यओठावरलं गाणं : ९९

ओठावरलं गाणं : ९९

नमस्कार .
“ओठावरलं गाणं’ या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन: पूर्वक स्वागत. “पहाटेच्या या प्रहरी म्हणा हरी हरी हरी” हे स्नेहल भाटकर यांनी गायलेलं एक सुंदर गाणं पूर्वी रेडिओवर हमखास लागत असे. त्याच पठडीतलं रेडिओवर लागणारं आणखी एक गाणं आज आपण पहाणार आहोत ज्याचे शब्द आहेत –

“उठा उठा सकळीक वाचे स्मरावा गजमुख
गौरीहराचा नंदन गजवदन गणपती

मनाला प्रसन्न करणाऱ्या सकाळचं रूप किती सुंदर आहे, मनमोहक आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो गुलाबी थंडी आहे म्हणून झोपून राहावंसं वाटत असलं तरी अंथरूण सोडून आणि पांघरूण भिरकावून देत घराच्या बाहेर या. वातावरण भारून टाकण्याची क्षमता असलेल्या या प्रहराची जादूच अशी आहे कि गणपती अथर्वशीर्ष किंवा नारदमुनींचं संकटनाशन स्तोत्र हे आपोआपच तुमच्या ओठांवर खेळू लागेल. मानव जातीच्या प्रगतीसाठी त्या शिवपुत्राला अनन्य भावाने शरण जाणं एवढं काम तर‌ आपण सारेजण सहजपणे करू शकतो.‌ कुणीतरी शुचिर्भूत होऊन मंदिरात सहस्त्रावर्तन करायला बसावं तर कुणी “ॐ गं गणपतये नम:” हा जप करावा. सकाळच्या वेळी कानावर पडणाऱ्या भजनातून मन तर प्रसन्न होतंच पण मनात सात्विक भावही जागृत होतात. शिवाय गजाननचं मोहक रूप आठवल्यावर सकारात्मक विचार मनाचा दरवाजा निश्चितच ठोठावतील. एकदंत म्हणा, विनायक म्हणा, पार्वतीचं बाळ म्हणा किंवा गौरीहराचा नंदन म्हणा या देवाची पूजा, प्रार्थना केल्यावर आपलं मन प्रसन्न होतं, चित्त शुध्दी होते, अंत:करण पवित्र होत जातं.

ध्यानी आणूनी सुखमूर्ती स्तवन करा एके चित्ती
तो देईल ज्ञानमूर्ती मोक्ष सुख सोज्वळ

आपण सामान्य माणसं विघ्नहर्ता म्हणून त्याची पाद्यपूजा करतो, रामदास स्वामींच्या आरतीमधून त्याचं स्तवन करतो. अशा या परमेश्वराच्या मूर्तीकडे पहाताना “एकतत्व नाम दृढ धरी मन” अशी जेंव्हा आपल्या मनाची एकाग्रता होईल तेंव्हा अंत:करणात वसलेली सुप्त बुध्दी जागृत होऊन ज्ञान गंगा तर दुथडी भरून वाहू लागतेच पण मोक्षाच्या सौख्याचा मार्ग देखील याच्या आशिर्वादाने दिसू लागतो. आपल्या मनाचा समतोल साधला जाऊन सुखदुःखाच्या धारांनी मन जराही विचलित होत नाही हाच खरा प्रसाद आपल्याला या जगन्नियंत्याकडून मिळतो.

जो निजभक्तांचा दाता वंद्य सुरवरां समस्तां
त्यासी गाता भवभय चिंता, विघ्नहर्ता निवारी

आपल्या सगळ्यांचा लाडका बाप्पा मोरया, गजानन, भालचंद्र अशा विविध नावांनी ओळखला जात असला तरी भक्तांच्या मागण्या आणि मनोकामना पूर्ण करणारा हा एकमेव देव आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात – मग ते मंगलकार्य असूदे, घरातली किंवा सार्वजनिक सत्यनारायण पूजा असू दे, हॉस्पिटल, हॉटेल वा सदनिकेचं बांधकाम असूदे – काम काहीही असलं तरी ते सुरू करण्यापूर्वी आमच्या कडून तुझी पूजा केली जाते. सर्व काही निर्विघ्नपणे सुरळीत पार पडावं म्हणून आम्ही हक्काने तुला साकडं घालतो आणि तू देखील भक्तांच्या इच्छेचा मान राखून, त्यांच्या मागणीचा अव्हेर न करता “निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा” या वचनाला जागून आमचं रक्षण करतोस. जेवढा आम्हा भक्तांना आहेस तेवढाच वंदनीय गणेशा, तू स्वर्गलोकातही आहेस.

तो हा सुखाचा सागर श्रीगणराज मोरेश्वर
भावे विनवितो गिरीधर भक्त त्याचा होऊनी

गजाननाचं दर्शन झालं कि मनात आनंदाचा सागर उसळतो आणि आम्ही त्याच्या समोर अधिकच नतमस्तक होतो. त्याच्या दर्शनाने मनाला जे सात्विक सुख आणि समाधान मिळतं त्याची तुलना जगातील कुठल्याही सौख्याशी होऊ शकत नाही. समस्त मानवजातीला तुझा आशीर्वाद लाभून, मानवजातीवर येणाऱ्या सूक्ष्मातिसूक्ष्म संकटाचंही तुझ्या कृपाशीर्वादाने निराकरण व्हावं आणि तुझी कृपादृष्टी सदैव आमच्यावर राहू दे एवढंच मागणं तुझा निस्सीम भक्त या नात्याने हा गिरीधर तुझ्याकडे मागतो आहे.

संगीतदिग्दर्शक वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं आशा भोसले यांच्या आवाजात ऐकताना गजाननाच्या मूर्तीसमोर आपणही आपोआपच नतमस्तक होतो.

एका ठिकाणी या गाण्याचा उल्लेख “पारंपारिक” असा केला असला तरी “भावे विनवितो गिरीधर” ही ओळ वाचनात येते त्यावरून रामदास स्वामींच्या संप्रदायातील एक कवी गिरीधर स्वामी यांनी बहुदा हे काव्य लिहिलं असावं असं मला वाटतं.

विकास भावे

– लेखन : विकास भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments