आज परिक्रमेचा सहावा दिवस आज आम्ही भरुच ला आलो आहोत. भृगु क्षेत्र – स्कंद पुराणात सांगितल्या प्रमाणे भरुच किंवा भृगु कच्छ या नावाने ओळखले जाते. ऋषी भृगु यांच्या नावावरून भरुच हे नाव ठेवले गेले.
भृगु ऋषी खगोलशास्त्र आणि चिकित्सा चे विद्वान होते. हिंदू धार्मिक परंपरेत सात महत्वाचे संत मानले जातात आपण सप्तऋषी म्हणून ओळखतो. त्यामधील एक भृगु ऋषी. एकनिष्ठ आणि एक इष्ट नसेल तर काही लाभ होत नाही. भृगु ऋषींच्या मनात एक विचार आला मनुष्य अनेक दुःखाने दुःखी आहे. दुसरा जन्म हा प्रारब्ध भोगण्यासाठी घ्यावा लागतो. परंतु ह्या जन्मात जर चूका किंवा पाप केले नाही तर … दुसऱ्या जन्मात भोगावे लागणार नाही. म्हणून भृगु महर्षीने एक ग्रंथ लिहिला.
त्या ग्रंथाची रचना करण्यासाठी भृगु ऋषी ह्या भुमीवर आले. असा ग्रंथ असला पाहिजे की ज्या मध्ये ज्योतिष आणि सर्वांची कुंडली असेल. तो ग्रंथ आहे “भृगु संहिता”. “भृगु संहिता” हा असा ग्रंथ आहे ज्यात किती जन्मांचे गुपीत आणि ज्योतिषशास्त्राची माहिती उपलब्ध आहे. भृगु संहिता जवळ जवळ पाच हजार वर्षे जुना ग्रंथ आहे. शास्त्रात सांगितले आहे की भाग्य किंवा नशिब खुप प्रभावशाली आहे परंतु पुरुषार्थाने नशिब बदलता येते. भृगु संहितेत लग्न राशी संबंधित सांगितले गेले आहे. व्यक्तीचा भाग्योदय कधी होईल. भृगु संहितेत सर्वांची कुंडली हजारो वर्षांपूर्वी बनवली गेली आहे.
क्रोधात येऊन भृगु ऋषींनी विष्णू भगवंताच्या छातीवर लाथ मारली होती. भृगु ऋषी हे ब्राह्मणांचे शिरोमणी होते म्हणून लक्ष्मी मातेने ब्राह्मणांना शाप दिला नंतर विष्णू भगवंतांनी उ:शाप दिला, “जो ब्राह्मण सरस्वती पूजा करेल त्याच्या कडे लक्ष्मी राहिलं’. भृगु ऋषींची परिक्षा घ्यावी असे भगवान शंकराच्या मनात आले म्हणून त्यांनी नंदीला पाठवले. बैल क्रोधित होऊन भृगु ऋषींच्या समोरच धावत आले आणि भृगु ऋषींच्या पुढ्यातच स्वतःच्या गतीला थांबवून तिथे बैलाचे पायाचे ठसे उमटले ती जागा म्हणजे वृषखात (खड्डा) तिर्थक्षेत्र.
भृगु ऋषींची उपासना खंडित झाली म्हणून ज्योतिषी सटीक तंतोतंत भविष्य सांगू शकत नाही. ग्रथाची रचना झाली परंतु अध्ययनात त्रुटी राहिल्या. म्हणूनच कोणी तंतोतंत भविष्य सांगू शकत नाही. भृगु ऋषींनी तपश्चर्या केली म्हणून प्रभाव पडला आणि सर्व जण तपश्चर्येसाठी आले. इथे 46 तिर्थक्षेत्र बनली त्यातील 10 ठीक आहेत बाकी उपेक्षित आहेत. म्हणून मंदिरात गेले पाहिजे. मंदिरात दान दिले तरच धर्म सुरक्षित राहील आणि जोपर्यंत धर्म सुरक्षित आहे तोपर्यंत आपलं अस्तित्व आहे.
रचाया सृष्टी को जिस प्रभुने |
वही ये सृष्टी चला रहे है |
जो पेड हमने लगाया पहले
उसका फल हम अब का रहे है |
सर्वात जास्त तिर्थक्षेत्र नर्मदा नदी च्या किनार्यावर आहेत म्हणून नर्मदा परिक्रमा आवश्यक आहे.
नंतर भरुचला निलकंठेश्वर मंदिराचे दर्शन केले. ह्या मंदिराची मुळ रचना हजारो वर्षे जुनी आहे. मंदिराच्या भिंतीवर 1008 शंकराची नावं कोरलेली आहेत. त्यानंतर आम्ही नारेश्वर धाम मंदिराचे दर्शन घेतले. येथील दृश्य खूपच आकर्षक आणि मनमोहक होते. मोठमोठे वृक्ष त्यावरील पक्षांची किलबिल त्यातच वानरसेना खुप प्रसन्न वाटतं होतं.
नारेश्वरचे मुख्य मंदिर आहे पुज्य रंगावधुत स्वामींचे. त्या मंदिरा समोरच त्यांच्या मातोश्री रुकाम्बा देवी चे मंदिर आहे.रंगावधुत स्वामींचा जन्म मराठी कुटुंबात झाला. ते नेहमीच भक्ती मध्ये लीन असतं.संसार सोडून संन्यासी बनले आणि नर्मदा नदी च्या किनाऱ्यावर वस्ती केली. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी त्यांचे गुरु होते. त्यांनी दत्तात्रयांची आराधना केली आणि दत्त संप्रदायाचा गुजरात मध्ये प्रसार केला. पूज्य रंगावधुत स्वामीं दत्त बावनी चे रचनाकार आहेत.
ह्या मंदिरात दानपेटी नाही. पैसे आणि अक्षता अर्पण करु नये असे स्पष्ट शब्दात लिहिले आहे. नारेश्वर चे जमिनदार सरदार नारोपंत यांच्या स्वप्नात शंकराने दर्शन दिले आणि सांगितले माझे कपर्दीक स्वरुप मैय्या मध्ये आहे त्याचा उध्दार कर. त्या शिवलिंगाचा उध्दार केला म्हणून नारेश्वर.
इथे धूप, अष्टगंध, गुलाल, अबीर इत्यादी उत्तम प्रकारची पूजा सामुग्री मिळते. आमच्या मधील एका परिक्रमावासी ने पंडित अनयजींना विचारले की उदबत्ती मिळत नाही का ?. तेव्हा पंडितजींनी सांगितले की आपल्या पूजे मध्ये धूप दीप याचा उल्लेख आहे उदबत्ती कुठेही सांगितली नाही. उदबत्ती किंवा अगरबत्ती मध्ये वापरली जाणारी काडी यात बांबूचा वापर केला जातो. बांबू हा बास याचा अपभ्रंश आहे. बास-वंश 18 वर्षात एकदा बांबूच्या झाडाला बीज येतं. बांबू मधून निघणारा आर्सेनिक गॅस महिलांसाठी हानिकारक आहे. आपल्या धर्मात बांबूने बनलेली तिरडी सुध्दा आपण स्मशानभूमीत सोडुन येतो. आणि ह्याच बांबूच्या काड्या अगरबत्ती मध्ये वापरल्या जातात. म्हणूनच आपल्या धर्मात धूप दीप याचा उल्लेख आहे. ह्या नारेश्वर धाम मंदिरात सोन्याच्या पत्र्यावर पूर्ण गुरुचरित्र लिहिले आहे.
नंतर आम्ही कुबेर भंडारी ला गेलो. येथील पौराणिक कथा अशी आहे शिव पार्वती पायी यात्रेला निघाले होते. पार्वती मातेला भूक लागली तिने शिवाला सांगितले की मला भोजन आणि पाणी पाहिजे. इथे तिथे फिरुन जेवण काही मिळाले नाही तेव्हा नर्मदा किनारी थांबले आणि हे मंदिर निर्माण झाले. म्हणून ह्या मंदिराला भोजन आणि धन देणारे मंदिर अशी मान्यता आहे.
अजून एक कथा अशी आहे जेव्हा कुबेराच्या सावत्र भाऊ रावणाने कुबेराची राजगादी हिसकावून घेतली तेव्हा महर्षी नारद मुनी ने कुबेराला ‘करनाली’ ला जाऊन तपश्चर्या करण्याचा सल्ला दिला. तेव्हा कुबेराने नर्मदा किनारी शिव शंकराची कठीण तपश्चर्या केली. शिव शंकराने प्रसन्न होऊन कुबेराला देवांचे कोषाध्यक्ष पद सोपवले. इथे स्वयंभू प्रकट शिवलिंग आहे. लंकेचे राज्य परत करु शकत नव्हते म्हणून देवतांच्या धनाच्या रक्षणाची जबाबदारी देण्यात आली. म्हणून कुबेराला धनाची देवता कुबेर भंडारी बोलले जाते. शिव शंकराने स्वतःचं स्थान दिले आणि ह्या स्थानावर प्रकट झाले. तेव्हा पासून लोकांच्या आस्थेचे केंद्र बनले.
ह्या मंदिराचे दर्शन करुन आम्ही निघालो गरुडेश्वरी. श्री क्षेत्र गरुडेश्वर हे नंदोड गुजरात इथे आहे. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींचे हे समाधी स्थान आहे. इथे दत्त मंदिर, गरुडेश्वर महादेव, करोटेश्वर महादेव मंदिर आहे. इथे महाबली गजासूर राक्षस रहात होता. त्याने हत्तीचे रुप घेऊन गरुडाशी युद्ध केले. गरुडाने गजासूराचा वध केला त्याच्या अस्थि नर्मदा नदी मध्ये फेकल्या म्हणून गजासूराचा देह पवित्र झाला. त्याची कवटी चोचीत धरून गरुड देवता उडाले त्यांच्या चोचीतुन कवटी नर्मदा नदी च्या धारेत पडली आणि तो यक्ष बनला तो आहे “करोटेश्वर”.
इथे जाऊन जो कोणी भक्तिभावाने पूजन करेल त्याला इच्छीत फलप्राप्ती होईल.ह्या स्थानावर पूर्व दिशेला नारद मुनी ने तपश्चर्या केली ते आहे नारदेश्वर महादेव.इथे पूजा करणार्याला शिवपद प्राप्त होते.
श्री दत्त प्रभु उपासक परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज शके 1835 साली गरुडेश्वरला आले. इथे ध्यान जप केले त्यांचे भक्त त्यांचे दर्शन घेण्यासाठी इथे येऊ लागले. ते वेदान्त, धर्माचरण, ज्योतिष विद्या, आयुर्वेद यावर प्रवचन करत होते. ह्या स्थानी टेंबे स्वामींची एक पर्णकुटी आहे. एका भक्ताने दत्त मुर्ती आणून स्वामींना अर्पण केली तिथे प्राणप्रतिष्ठा केली आजही त्या मुर्तीची पूजा अर्चना मंदिरात होते.
ह्या मंदिरा समोरच परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींचे समाधी स्थान आहे. गरुडेश्वर मंदिरा मध्ये दत्त प्रभु आद्य शंकराचार्य आणि सरस्वती मातेची मूर्ती आहे. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींच्या अंतिम समयी सेवा करणार्या एका सेवेकर्याने पादुकां साठी हट्ट केला. स्वामी म्हणाले मी कधीच पादत्राणे घातली नाहीत. तरीही त्या सेवेकर्याच्या जिद्दीसाठी नर्मदा मैय्या मधून दगड आणून त्यावर एक प्रहर (तीन तास) स्वामी उभे राहिले.त्या वर स्वामींचे चरणांचे ठसे उमटले. त्या भक्ताने त्या पादुका ह्या मंदिरात सर्वांना दर्शनासाठी ह्या मंदिरात आणून ठेवल्या.
प्रमुख दत्त स्थानामध्ये गरुडेश्वर मंदिराचा उल्लेख आहे. गरुडेश्वर येथे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींच्या संन्यस्त जीवनातील चातुर्मास केले. भारतभर भ्रमण करुन दत्त संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. नर्मदा मैय्या वर स्वामींची अपार श्रद्धा होती. मैय्या ने कुमारी स्वरूपात स्वामींना दर्शन दिले.इथेच स्वामींनी आपला देह त्याग केला.ह्या पवित्र मंदिराच्या शेजारती मध्ये सहभागी होण्याचे सौभाग्य आम्हाला मिळाले.प्रसन्न मनाने आम्ही गरुडेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. परत येऊ असं बोलून आम्ही तिथून निघालो.
आता मला पण आज्ञा द्यावी परत भेटूच पुढील भागात.
काल हर दुःख हर दारिद्र्य हर संताप हर क्लेश हर मॉं सबका भला कर
नर्मदे हर जिंदगी भर……
क्रमशः

– लेखन : सुलभा दिवाकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800