ट्रेकिंगचं वेड अनेकांना असतं तसचं मलाही आणि मी ज्या समूहासोबत आहे त्या समूहालाही आहे. कोविडनंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत ट्रेकला जायचं हे निश्चित होतं परंतु नक्की कुठे यावर काथ्याकूट करून अंतिम निर्णय घेतला तो म्हणजे उत्तराखंडमधील ‘दयारा बुग्याल’ या सोप्या आणि सुंदर ट्रेक ला जायचा !
थोडी थोडी तयारी करण्यात अनेक दिवस उत्साहात गेले आणि अखेर ८ एप्रिल २०२३ रोजी थेट विमानाने डेहराडून ला पोहचलो. दुस-याच दिवशी ट्रेकला सुरवात होणार होती बसच्या प्रवासाने. आठ ते दहा तासांचा प्रचंड वळणावळणांचा पर्वतांच्या कुशीतला रस्ता आपण “नतीन” गावात बेस कॅम्प ला चाललो आहोत हे मनोमन सांगत होता.
गाव कसं असेल याची एक पुसटशी झलक वाटेत नाश्त्याला थांबलो तिथे मिळाली. दुपारच्या जेवणानंतर वळणावळणाच्या वाटेला आम्ही जरा वैतागून गेलो होतो तोच हिमालयाने आपलं अस्तित्व आम्हाला दाखवून दिले. साधारण दुपारी ३.३० ची वेळ आणि वातावरणात मातीचा सुगंध दरवळला. थंड वारा शरीराला गुदगुदल्या करू लागला आणि रस्त्याच्या बाजूनेच वाहणारी शांत, शीतल भागीरथी साद घालू लागली.
आता राहिलेल्या प्रवासासाठी निसर्ग सौंदर्याचा बुस्टर डोस मिळाला आणि बर्फाच्छादित पर्वतरांगांच्या जणू मांडीवर बसलेल्या उत्तराखंडमधील “नतीन” गावात आम्ही येऊन पोहचलो. ९ एप्रिल च्या संध्याकाळी प्रवासाने आलेला सारा शीण नतीनच्या प्रसन्नतेने घालवून टाकला. ट्रेक लीडरच्या सर्व सूचना ऐकून नुसतं आराम करत बसण्यापेक्षा गावात फेरफटका मारणं आम्ही पसंत केलं. गावातला हा फेरफटका ट्रेक साठी आणखी ऊर्जा देऊन गेला. ट्रेक सुंदर नियोजनामुळे अवर्णनीय झाला. पण बेस कॅम्प च्या निमित्ताने ज्या गावची ओळख झाली ते नतीन गावं तर चिरकाल लक्षात राहण्यासारखे आहे.
९ एप्रिल नंतर ट्रेकचा आनंद घेऊन परतीच्या १३ एप्रिल ला दुपारच्या जेवणासाठी परत आम्ही नतीनला पोहचलो. नतीन ला पोहचत असतानाच थकून भागून आलेल्या आम्हांला नतीनच्या उंबरठ्यावरच छान थंड पाणी आणि आरामाला निवांत जागा मिळाली. तेथील स्थानिक लोक इतके मनमिळाऊ आहेत की आपण त्यांच्यासोबत कसे मिसळून जातो तेही समजत नाही.
रोडोडेंड्रोन (बुरांश चे फूल) या फुलाच्या तेथील राज्य वृक्षाखाली बसण्याचा आनंद काही वेगळाच होता. वाटेत याच फुलाचा रस सुद्धा आम्ही प्यायलो. या फुलाचा रस अनेक औषधी गुणांनी युक्त आहे. रक्ताभिसरण, चयापचय क्रिया याने उत्तम होते.
गावात फेरफटका मारताना एक गोष्ट जाणवली की येथील लोकांचे आयुष्य अतिशय कष्टाचे, काटकसरीचे, नैसर्गिक आहे. घराभोवती मिळालेल्या लहानशा जागेचाही वापर कसा करावा हे येथील लोकांकडून शिकावं. आपण सफरचंद आणून खातो पण हे झाड, आणि हे फळ लहान असताना अगदी गुंजेएवढं दिसतं हे जवळून पाहिलं.
एका झाडाला ५० ते ६० सफरचंद साधारण जुलै, ऑगस्ट महिन्यात येतात. तेव्हा तर ह्या वृक्षाचे सौंदर्य वर्णावे ते कमीच ! घराच्या बाहेर कुंपण म्हणून ही झाडे लावली आहेत जी उदरनिर्वाहासाठीसुद्धा मदत करतात. आजूबाजूने डोकावत असलेली ट्युलीपची फुले खुडून परडीत घेण्याचा मोह आवरता येत नाही.
येथील लोकांना दळणवळणासाठी आपल्या दोन पायांचाच वापर करावा लागतो पण त्यातल्या त्यात बुडत्याला काडीचा आधार म्हणावा तसा येथील लोकांना आधार आहे खेचरांचा! लाखभर रुपयांना मिरवणारे हे खेचर लाखमोलाचे काम करतं. मऊ, लुसलुशीत, हिरवंगार गवत हवं तेव्हा मनसोक्त खात, काबाडकष्ट करणारी ही खेचर थकली की मात्र छान गवतावर पडून आराम करतात, चक्क कधीकधी लोळतात.
आमच्या ट्रेक च्या बॅगा, इतर सगळं सामान वाहूनन नेणा-या या खेचरांना खरचं सलाम !
या गावात मोजून ५०-६० घरेच असतील पण ती सुद्धा अतिशय सुंदर, शिस्तबद्ध. ऐन थंडीत बर्फवृष्टी होत असल्याने घराबाजूने बर्फालाही वाट करून द्यायला रस्ता आहे. घराला लागूच स्टेप फार्मिंग चा प्रकार आपल्याला पहायला मिळतो. बटाटे, वाटाणे, कोथिंबीर आणि विशेषत्वाने आपल्या रोटीचा गहू हे येथील मुख्य पिक आहे. आजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात आपण खूप उपभोक्तावादी झालो आहोत हे तेथील गढवाली माणसांच्या अत्यल्प गरजांतून जाणवतं. साधे छोटुसं टाॅफी मिळाल्यावर येथील लहान मुलांच्या निरागस चेह-यावर उमटणारे आनंदाचे भाव फक्त आपल्या मनात साठवावे आणि नेत्रचक्षुंनी टिपावे.
आपल्या गरजेपुरती सखोल शेती येथे केली जाते. अन्न, वस्त्र आणि निवारा याच ख-या अर्थाने इथल्या मुलभूत गरजा आहेत. गप्पा, गाणी, बैठे खेळ ही काय ती मनोरंजनाची माध्यमे. आणि रक्षण करायला प्रचंड केसाळ, तगडे कुत्रे आणि हिमालयाची पहाडी छाया.
सध्या ट्रेकची वाढणारी संख्या, वाढणारे पर्यटन यामुळे येथील लोकांचा संबंध शहरी माणसांशी येत आहे.तरीही आपली संस्कृती, रूढी, परंपरा या देवभूमीत त्यांनी जपल्या आहेत. या गावाची उंची साधारण ७००० फूट आहे. सर्वेक्षणानुसार उत्तम आरोग्यासाठी येथील हवामान अतिशय अनुकूल आहे.
आम्ही अगदी दोन दिवस इथे होतो पण कधीही विसरता येणार नाही असं हे नतीन. एकदा तरी अवश्य भेट देऊन स्वानुभव घ्यायलाच हवा.नतीन ला बाय बाय करताना हे हिमालयीन सौंदर्य डोळ्यात किती साठवू आणि किती नाही असे झाले. अखेर निरोप दिला नतीनला फक्त शरीराने; पण नतीनने निर्माण केलेले स्थान मात्र ध्रुवता-याप्रमाणे अढळ आहे हे नक्की.

– लेखन : चैताली कानिटकर. दूरदर्शन निवेदिका. मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सुंदर
अप्रतिम!!👍
वाह, सुंदर.