संत निर्मळाबाई
भक्तीच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचे कार्य या प्रवाहाने केले.. समाजाच्या सर्व स्तरातील असंख्य स्त्री- पुरूष तेथे एकत्र आले.. वर्णभेद, जातीयता, स्त्रीला कोणतेच स्थान नाही अश्या परिस्थितीमध्ये कसलाही विचार न करता आत्मोन्नतीसाठी संत कवयित्रींनी जी परमेश्वराची भक्ती केली ती अत्यंत महत्त्वाची आहे.. या संत कवयित्रींच्या अभंगातून प्रतिबिंबित होते..
मराठी साहित्य विश्वातील संत कवयित्री संत निर्मळाबाई यांची आज ओळख करून घेऊया…
संत निर्मळाबाई
संत निर्मळाबाईंचे अभंग खूप महत्त्वाचे आहेत कारण संसार हीच बाईची नियती हा प्रचलीत समज, खरेतर गैरसमज दूर करण्याचे काम त्यांच्या अभंग रचनेतून होते..
संत निर्मळा या चौदाव्या शतकातील एक संत व कवयित्री होत्या..
मंगळवेढ्याचे रहिवासी असलेल्या संत चोखोबांची ही धाकटी बहिण निर्मळा
बुलढाणा जिल्यातील मेहुणाराजा येथे त्यांचा जन्म झाला.. मेहुणाराजा येथे निर्मळा नावाची नदी आहे त्यावरून निर्मळा हे नाव देण्यात आले..
संत निर्मळा ह्यांचे गुरू संत चोखोबा
निर्मळा म्हणे सुखाचे सागर
लावण्य आगर रूप त्याचे
मनानं अत्यंत निर्मळ व भावूक असलेल्या निर्मळेला मंगळवेढ्याला माहेरी असताना बंधू चोखोबांच्या संगतीत विठ्ठल भक्तीचा विलक्षण लळा लागला व त्यांनी आपले बंधू चोखोबांनाच आपले गुरु मानले..
त्यांच्याकडून चिरंतन सुखाचा नाम मंत्र मागून घेतला आणि पुढे आयुष्यभर तो मनोभावे अनुसरला… संत निर्मळा या चोखोबांच्या अनुचरिता..
निर्मळा यांनी संत बंका यांच्याशी विवाह केला होता.. त्यांचे पती बंका हे विठ्ठलाचे भक्त होते… त्यांचे संपूर्ण कुटुंब भाविक होते..
चोखोबा आणि निर्मळा यांचे भक्त सौहार्द कसे आहे याचे वर्णन निर्मळा यांचे पती संत कवी बंका यांनी केले आहे… ते म्हणतात..
!! चोखा तैसी बहीण, बहीण तैसा चोखा । सदा नाम मुखा विठोबाचे !!
नामस्मरणाच्या आनंदाने एकरूप झालेले बहीण आणि भावाचे नाते निर्मळा-चोखोबा यांच्या गुरू शिष्य या रूपाने दिसते हे कौतुकाने गौरवाने नमूद करणारी व्यक्ती ती म्हणजे निर्मळा यांचे पती बंका महाराज आहेत हे विशेष…
पत्नीच्या आध्यात्मिक विकासाचा सन्मान आणि आदर करणारे पती बंका हे देखील विठ्ठल भक्तच…
निर्मळा आणि चोखोबा यांचे नाते नामस्मरणाच्या भक्तीने एकरूप झाले होते.. असे असले तरीही परमार्थ मार्गावरील वाटचाल स्वतंत्र पद्धतीने झालेली दिसते.
संत निर्मळा यांचे एकूण चोवीस अभंग आहेत. त्यांच्या रचनांमधून निर्मळा यांच्या भक्त असण्याची स्वतंत्र ओळख स्पष्ट होते…
!! संसार सुख अणुमात्र नाही ।
सदा हावभरी रात्रंदिवस !!’
असे संसाराचे स्वरूप असल्याची जाण संत निर्मळा व्यक्त करतात म्हणूनच …
!! बहु मज उबग आला असे देवा !
धावे तू केशवा लवलाही !!
अशी तातडीने मदतीला धावून येण्याची विनंतीही त्या विठोबाला करतात…
!! न घडे न घडे नामाचे चिंतन
संतांचे पूजन न घडेचि
न बैसे मन एके ठायी निश्चल
सदा तळमळ अहोरात्र !!
भक्तीची ओढ, ध्यास लागलेल्या निर्मळा यांना संसार करण्याची, संसारात रमण्याची मुळीच आवड, इच्छा नाही. मनात भक्तीची आस आणि देहाने संसार करत राहणे अशी तारेवरची कसरत करताना काय होते हे त्या सांगतात… नामस्मरण होत नाही.. संतांचे पूजन होत नाही…
थोडक्यात मनाची एकाग्रता, चित्त स्थिर होणे ही भक्तीची पूर्व अट आणि गरज संसारात राहून पूर्ण होत नाही. मग ‘”संसारात सदा तळमळ अहोरात्र'” असाच अनुभव येतो…
निर्मळाबाईंचे अभंग खूप महत्त्वाचे आहेत कारण संसार हीच बाईची नियती हा प्रचलीत समज खरे तर गैरसमज दूर करण्याचे काम त्यांच्या अभंग रचनेतून होते. घर, भांडी, स्वयंपाक, मुले, माणसे हेच बाईचे जग तिला काय हवे असते तर घर-संसार तिच्या रमण्याची, जगण्याची हीच कक्षा अशा सर्वसाधारण समजुतीला छेद देण्याचे काम निर्मळाबाईंनी चौदाव्या शतकात केले. स्त्रीच्या स्वतंत्र इच्छा, अपेक्षांची तिला स्वत:लाच झालेली जाणीव निर्मळाबाईंनी अध्यात्माच्या संदर्भात व्यक्त केली आहे…
त्यांची जाणीव आत्मविकासाशी आणि आत्मस्वातंत्र्याशी संबंधित होती… हे स्त्री मुक्ती वर्ष उजाडण्याच्या आधीच हे सारे घडलेले आहे…
निर्मळाबाईंच्या मनात जागलेली तीव्र, जबरदस्त अशी परमार्थ साधना करायची इच्छा आणि त्याच्या बरोबरीनेच लौकीक जीवनात करावा लागणारा भांड्यांचा, अन्नधान्याचा, सवयींचा, मुला-माणसांचा संसार यांचे द्वंद्व सातत्याने व्यक्त होते. संसार बाजूला सारून केवळ भक्त होऊन जगता येत नाही आणि संसारात रमणारे, गुंतणारे मन संसाराच्या बंधनात अडकू शकत नाही अशी मनाची द्विधा स्थिती निर्मळाबाई अनेकदा वर्णन करतात.. त्या म्हणतात…
!! कांही पांडुरंगा मज मोकलिले
पराधीन केले जिणे माझे
किती हे जाचणी संसार धसणी
करिती दाटणी कामक्रोध
अशा मनशा तृष्णा बहू या वोढाळ
लाविलासे चाळा येणे मज
निर्मळा म्हणे जीवीच्या जीवना
येऊ द्या करुणा देवराया
अशा मनशा तृष्णा बहू या वोढा
लाविलासे चाळा येणे मज !!
अशी स्पष्ट प्रामाणिक कबुली निर्मळाबाई देतात. मोहवश होणारे स्वत:चे मन हा प्रकार “‘किती हे जाचणी संसार धसणी'” अशा प्रकारचा आहे हे सारे समजते पण आशा- तृष्णेच्या मनाला लागलेल्या चाळ्यावर स्वत:चा अंकुश नाही म्हणून जाणविणारी अगतिकता, असहाय्यता निर्मळाबाई आपल्या अभंगातून प्रांजळपणे मान्य करतात.. व्यक्त करतात आणि यातून व्यक्त होणारे माणूसपण, माणसाची अपूर्णता निर्मळाबाई अभंगातून व्यक्त होताना तसेच या मधून मानवी मनाचे व्यवहार स्पष्ट झाल्याचे दिसते.. दिसून येते..
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुकोबांची शिष्या बहिणाबाई शिऊरकर यांनी प्रपंच व परमार्थ यांचा समन्वय साधत सदेह मुक्तीचा अनुभव घेतला. बहिणाबाईंची संसाराप्रती असलेली अनासक्ती हा त्यांच्या भक्तिप्रवण व्यक्तिमत्त्वाचाच भाग होता. त्याचप्रमाणे उदासीन वृत्तीने संसार करणे आणि मनातील भक्ती लालसा जागती ठेवून परमार्थ साधणे ही निर्मळाबाईंची जीवनवृत्ती बहिणाबाईंना पाठबळ देऊन गेली. या अर्थाने सतराव्या शतकातील बहिणाबाई या चोखोबांच्या शिष्या निर्मळाबाईंच्या वारसदार आहेत.
निर्मळा आणि बहिणा यांची अनासक्त जीवनदृष्टी ही वारकरी संप्रदायातील संत कवियत्रींच्या परंपरेचा भाग आहे. संप्रदायातील संत कवयित्रींच्या भक्ती परंपरेतील बंध-अनुबंध पुन्हा नव्याने जोडण्याची गरज आहे..
आपण आत्मविकासाची मागणी व्यक्त करणाऱ्या स्त्री संतांच्या विचारांकडे पुरेशा गांभीर्याने पाहिलेले नाही. आपल्याच आत्मविकासाची ओढ लागलेल्या, त्यासाठी स्वत:शी, कुटुंबाशी, समाजाशी झगडणा-या स्त्री संतांचा आपल्याला विसर पडला.
आपण आतला आवाज ऐकण्याचा प्रयत्न करणाऱ्या या स्त्रियांना धर्म, अध्यात्म या क्षेत्रांमध्येच बंद करून टाकले. आधुनिक होण्याच्या घाईत आणि नादात आपल्या प्रगल्भ परंपरेचा आपण त्याग केला हे निर्मळाबाईंचे अभंग वाचल्यानंतर जाणवते…
निर्मळाबाईंच्या अभंगरचनेचा अभ्यास मानसशास्त्राच्या अंगाने केला पाहिजे. निर्मळाबाईंचे अभंग मनोविश्लेषण प्रधान आहेत…
निर्मळाबाई चौदाव्या शतकातील आहेत परंतु तरीही स्वत:च्या मनाचे व्यवहार तटस्थपणे जाणून घेणाऱ्या त्या मनोविश्लेषक आहेत, असे मला इथे मनापासून नमूद करावेसे वाटते.. त्या सोप्या भक्ती पंथाच्या एकनिष्ठ प्रचारक म्हणून संत निर्मळा यांच्याकडे पाहिले जाते..
संत निर्मळा बाई यांची निर्मळा नदी तीरावर समाधी आहे.
क्रमशः

– लेखन : संगीता कुलकर्णी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
संत निर्मळा बाई बंका यांचा परिचय खूप आवडला. नवीन माहिती मिळाली. धन्यवाद.