“वाचक पुस्तकातून आपला आनंद शोधत असतो. वाचकांचे समाधान करणे हेच लेखकाचे ध्येय असायला हवे. जोपर्यंत वाचक समाधानी होत नाही तोपर्यंत लेखकाने लिहित राहावे.” असा सल्ला ज्येष्ठ लेखक श्री शिरीष कणेकर यांनी दिला. शारदा प्रकाशन आणि तेजस्वी महाराष्ट्र ग्रंथ वितरण यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे येथे आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सुप्रसिद्ध लेखिका आणि निवेदिका प्रा. प्रज्ञा पंडित आणि विनोदी लेखक ऍड. चंद्रशेखर राणे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ऍड. चंद्रशेखर राणे यांच्या ‘टेक इट इझी‘ आणि प्रज्ञा पंडित यांच्या ‘दिनविशेष‘, ‘दिवसविशेष‘, ‘पानांवरचे जग’, ‘राष्ट्ररत्ने‘, ‘गुलमोहोर नेक्स्ट’ या पुस्तकांचे प्रकाशन कणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना कणेकर पुढे म्हणाले, “जे लेखन हातात घेतल्यावर वाचक अथ पासून इति पर्यंत एका दमात वाचतात ते लेखन निश्चितच चांगले आहे असे समजावे. वाचताना जर वाचकाला आपण खिळवून ठेवू शकलो नाही तर आपल्या लिखाणात अजून सुधार करण्याची आवश्यकता आहे असे समजावे.”
यावेळी बोलताना लेखिका प्रा. प्रज्ञा पंडित म्हणाल्या की, “नवीन पिढीत वाचनसंस्कृती रुजण्यासाठी पुस्तके विकत घेऊन वाचणे गरजेचे आहे. आजची पिढी इंटरनेट वापरते पण इंटरनेट चा योग्य वापर कसा करायचा हे त्यांना माहीत करून देणे गरजेचे आहे. नोटिफिकेशन्स मुळे ऑनलाईन वाचनात अनेकदा वाचक भरकटले जातात त्यामुळे स्क्रीन्स ऐवजी छापील आवृत्ती घेऊन वाचणे अधिक चांगले असते. पुस्तक वाचनाची आवड आपल्या आणि पुढच्या पिढीत पुन्हा रुजविण्यासाठी आपण पुस्तके विकत घेतली पाहिजेत, वाचली पाहिजेत आणि इतरांनाही भेट म्हणून पुस्तकेच दिली पाहिजेत.”
“गेली अनेक वर्ष विविध विनोदी कथा लिहित असल्याचे सांगून लेखक चंद्रशेखर राणे म्हणाले की, “माझे विनोदी लेखन चांगले माझ्या परिवाराचा, मित्रांचा आणि आजूबाजूच्या माझ्या लोकांचा मोलाचा वाटा आहे. मला निरीक्षणातून अनेक विषय सुचत गेले. जसे जमेल तसे लेखन करीत गेलो. छापील पुस्तक यावे असे अनेक वर्ष वाटत होते. ती इच्छा शारदा प्रकाशनाने पूर्ण केली.
यावेळी ठाण्यातल्या यशस्वी उद्योजिका श्यामली रोशन पाटोळे आणि तृप्ती मोकाशी कोलाबकर यांना ‘तेजस्वी उद्योजिका पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उद्योजक अनिल आयरे यांना ‘तेजस्वी ग्रंथ मित्र’ पुरस्काराने गौरविण्यात आले. लेखक आणि निवृत्त एसीपी व्यंकट पाटील यांचाही त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या सर्जा या कादंबरी बद्दल सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी अरुण कदम आणि प्रज्ञा बिर्जे यांचीही भाषणे झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चित्रपट समीक्षक श्री. मनिष पंडित यांनी तर निवेदन ज्योत्स्ना धुरी आणि प्रार्थना केंगार यांनी केले.
या प्रकाशन सोहोळ्याला श्री. विद्याधर ठाणेकर, श्री. चांगदेव काळे आणि इतर अनेक मान्यवर, रसिक उपस्थित होते.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800