महाराष्ट्र मंडळ, शिकागो कार्यकारिणीने जागतिक पितृदिनाच्या दिवशी प्रथमच पाच किलोमीटर धावण्याची/चालण्याची स्पर्धा आयोजित करून आणखी एक मानाचा तुरा मंडळाच्या शिरपेचात खोवला !
महाराष्ट्र मंडळ शिकागो कार्यकारिणीने गेल्या अडीच वर्षांपासून, वर्षातून फक्त चार-पाच नाटके किंवा गायन यासारखे नेहमीचे कार्यक्रम करण्याच्या ठरावीक साच्यातून बाहेर पडत वीसपेक्षा अधिक वेगवेगळे उपक्रम मराठी समाजासाठी सुरू केले आहेत. त्यातच या अभिनव उपक्रमाची भर पडली आहे. या उपक्रमाचे हे पहिलेच वर्ष असूनही त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे यात इतर अमराठी मंडळे व स्थानिक अमेरिकन लोकसुद्धा सहभागी झाले होते, हे अभिमानाने नमूद करावेसे वाटते.आणि हीच महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या उपक्रमांच्या यशस्वितेची खरी पोच पावती म्हणावी लागेल.
रविवारी, सकाळी सकाळी उत्साहवर्धक हवामानात बसे वुडज् पार्क – रोलिंग मेडोज्च्या (Busse Woods Park – Rolling Meadows) भव्य धावपट्टीवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शिकागो परिसरातील सर्व लोकांसाठी ही स्पर्धा खुली होती. मंडळाच्या या पहिल्या वहिल्या स्पर्धेत शंभराहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला.

स्पर्धेच्या आयोजनासाठी आणि तयारीसाठी विशाल नवलकर व त्यांच्या चमूने कित्येक आठवडे आधीपासून खूप मेहनत घेतली होती. स्पर्धेसाठी भव्य मोठी जागा निवडणे, शहर व सार्वजनिक उद्यानाची परवानगी घेणे, परिपत्रक तयार करणे, निमंत्रणे पाठविणे, स्पर्धेसाठी प्रायोजक मिळविणे, स्पर्धकांची नोंदणी करणे, जलपान, नाश्ता व खाण्याची व्यवस्था करणे, स्पर्धकांसाठी पदके, प्रत्येक गटातील विजेत्यांसाठी करंडक व पारितोषक चषक आणणे, या कार्यक्रमानिमित्त वाटल्या जाणाऱ्या खास शर्टांची आकर्षक रचना करणे, स्पर्धेदरम्यान सर्वांची देखभाल करणे अशा अनेक बारीक-सारीक गोष्टींची त्यांनी सुंदर व्यवस्था केली होती.
स्पर्धेच्या दिवशी स्पर्धकांना खास भारतातून मागविलेले टी-शर्ट व त्यावर लावण्यासाठी मोठे ठळक अक्षरातले स्पर्धक क्रमांक दिले गेले. ज्या ठिकाणी स्पर्धा सुरू होणार होती तेथे प्रायोजक, स्वयंसेवक आणि आयोजक जमले होते. स्पर्धेदरम्यान कोणाला शारीरिक इजा झाली तर प्रथमोपचारासाठी फिजिओथेरपिस्ट देखील उपस्थित होते
स्पर्धेचे नियम व इतर सूचना दिल्यावर कधी एकदा स्पर्धा सुरू होते याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते.
मंडळाच्या सजावट चमूने सुंदर व आकर्षक असा फलक तयार केला होता. बहुतेक सर्व स्पर्धक आपले फोटो त्या फलकासमोर काढत होते.
या प्रसंगी बालमित्रांनी छान राष्ट्रगीते म्हटली. अमेरिका व भारताचे राष्ट्रगीत झाल्यावर स्पर्धा सुरू झाली. “गेट… सेट… रेडी” असा स्पर्धा सुरू होण्याचा हुकूम आयोजकांकडून मिळताच दहा वर्षांच्या बालकांपासून ते सत्तर वर्षे वयापर्य॔तच्या स्पर्धकांनी धावण्यास अगर चालण्यास सुरुवात केली. त्यात काही मुरलेले, मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतलेले अनुभवी स्पर्धकही होते. धावपट्टीवर काही ठिकाणी जलपान व शीतपेयांची सोय केली होती. प्रेक्षक टाळ्या वाजवून स्पर्धकांना प्रोत्साहन देत होते.

आपापल्या शारीरिक क्षमतेप्रमाणे सर्व स्पर्धक धावत किंवा चालत होते. ज्या ठिकाणी स्पर्धा संपते त्या ठिकाणी अनेक प्रेक्षक व आयोजक आनंदाने जल्लोष करत त्या सर्व स्पर्धकांचे कौतुक करत होते. प्रत्येकाला अखेरची रेषा ओलांडण्यासाठी खास दोरी लावली जात होती. प्रत्येक स्पर्धक ती रेषा ओलांडण्याचा आनंद घेत होते. पाच किलोमीटर पूर्ण केल्यानंतर प्रत्येकाला खास बनविलेले पदक देण्यात येत होते. दमलेल्या स्पर्धकांसाठी खास शीतपेये, फळे व इतर पदार्थ अल्पोपहार म्हणून ठेवले होते.
अडीच वर्षापासून मंडळाचा कुठलाही कार्यक्रम असला तरी त्यात सगळे आयोजक खेळीमेळीने एकमेकांची चेष्टामस्करी करत आनंदी वातावरणात कार्यक्रम साजरे करतात. हा कार्यक्रम पण त्याला अपवाद नव्हता. सजावटीचा चमू आणि खाद्यपदार्थांचे प्रायोजक देखील स्पर्धेच्या आनंदी वातावरणात सहभागी झाले होते. शेवटच्या स्पर्धकाने स्पर्धा पूर्ण केल्यानंतर ज्याची सर्वजण वाट पाहत होते तो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू झाला. मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अथणीकर व मुख्य आयोजक विशाल नवलकर आणि चमू यांनी प्रायोजकांना धन्यवाद दिले, आणि त्यांना आपल्या उपक्रमाबद्दल माहिती देण्यास सांगितले.
एकल विद्यालयाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व विभागीय अध्यक्ष डॉक्टर निशेंदु बक्षी यांच्या हस्ते स्पर्धेच्या वेगवेगळ्या गटातील विजेत्यांना पारितोषके व चषक देण्यात आले. या प्रसंगाला उत्साहवर्धक संगीताची साथ होती. एकंदरीत वातावरण अगदी जल्लोषमय झाले होते.

यशस्वी विजेते स्पर्धकांची नावे
अठरा वर्षाखालील युवा गट – अजय विरामिथु
एकोणीस ते साठ वर्षे पुरुष गट – विरामिथु करूप्पूसामी
साठ वर्षेवरील पुरुष गट – माधव ना.गोगावले
अठरा वर्षाखालील युवती गट – धितिक्षा
एकोणीस ते साठ वर्षे महिला गट – रत्नांगी निलेश मालपेकर
साठ वर्षेवरील महिला गट – ज्योती माधव गोगावले
बक्षीस वितरण समारंभानंतर सर्व स्पर्धक व स्वयंसेवकांनी पिझ्झा, चहा, शीतपेये आणि फळांचा आस्वाद घेत परस्परांशी संवाद साधला. या स्पर्धेसाठी एकल विद्यालयाचे स्वयंसेवक, अन्य तीन संस्थांचे प्रायोजक, महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणीचे सदस्य आणि स्वयंसेवक सभासदांनी वेगवेगळ्या आघाड्यांवर केलेल्या मदतीमुळे, महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या इतिहासातील हा पहिला वहिला कार्यक्रम यशस्वी होण्यास मोलाची मदत झाली.

जागतिक पितृदिन (फादर्स डे), मस्त आल्हाददायक हवामान, उन्हाळ्याची सुट्टी अशा अनेक गोष्टींमुळे कार्यक्रमास कितपत प्रतिसाद मिळेल, अशी आयोजकांना काळजी लागली होती, परंतु शुभ संकल्प, सर्व कार्यकर्त्यांची सकारात्मक वागणूक, लागेल तेथे झटून कामे करत मनापासून एकमेकांना मदत करण्याची प्रवृत्ती या सगळ्या सकारात्मक गोष्टींमुळे शंभराहून अधिक स्पर्धकांची पाच किलोमीटर धावणे वा चालण्याची ही स्पर्धा यशस्वीरीत्या धूमधडाक्यात पार पडली.

— लेखन : माधव गोगावले. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800
शिकागो महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेला नवा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे.
लेख छान लिहिला आहे.
माधव आणि ज्योती तुमचे खास अभिनंदन!