सौ. रश्मी हेडे यांनी लिहिलेले समाजभूषण २, हे पुस्तक “न्यूज स्टोरी टुडे” या प्रकाशन संस्थेने अतिशय मेहनत घेऊन प्रकाशित केले आहे.
सदर पुस्तक म्हणजे कासार समाजातील कर्तृत्ववान, अनेक मौलिक हि-यांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे.
सौ. रश्मी हेडे, या स्वतः एक प्रयोगशील शिक्षिका आहेत. खाजगी शिकवणी क्लासच्या माध्यमातून त्यांच्या विद्यार्थ्यांना संस्कारित करीत, मार्गदर्शन करीत अनेक विद्यार्थी घडविण्याचे काम त्यांनी केले आहे.
या पुस्तकात कासार समाजातील एकूण ३७, मान्यवर, कर्तृत्ववान व्यक्तींच्या (काही महिलांसह) प्रत्यक्ष मुलाखती घेऊन, त्यांच्या खडतर, अनेक कठीण प्रसंगाला तोंड देत, मोठी झेप घेण्याची ऊर्मी मनात ठेवून आपले इप्सित साध्य करण्यासाठी ते संघर्ष करत राहिले. परंतु हे यश – किर्ती, मान – सन्मान प्राप्त झालेले क्षण त्यांना सहज शक्य झाले नाहीत. त्यांच्या संघर्षमय जीवन प्रवासाचा धांडोळा या पुस्तकातून घेतला आहे.
सौ. रश्मीताईंनी त्यांच्या शोधक नजरेतून शोधून लिहिलेली ही व्यक्तीचित्रणें – विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांच्या – उद्योजकांच्या – व्यावसायिकांच्या, राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या, अधिका-यांच्या, विद्यार्थ्यांच्या यश कथा “समाजभूषण” म्हणून वाचकांसमोर मांडल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !!
सदर पुस्तकातील सर्वच यश कथा वाचताना आपले मन भारावून जाते. कारण कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी लागणारी जिद्द, समर्पण, काही प्रसंगी अपयश आले तरी, हार न मानता आलेले अपयश कशामुळे आले याचा शांतपणे विचार करून, अपयशाची मिमांसा करून ह्या व्यक्तींनी घेतलेला व पुढे जाण्याचा वसा अखंडपणे- चालू ठेवला. म्हणतात ना, “यशस्वी माणूस तोच की, आपल्याला आलेल्या अपयशातून खचून न जाता, गगनात उंच भरारी घेण्यासाठी आपले निर्धाररूपी पंख पसरून झेप घेतात, अशीच माणसे आपल्या जीवनात यशस्वी होतात”
अशी ही कासार समाजातील यशवंत, नामवंत, कीर्तीवंत आणि ज्ञानवंत मंडळींच्या यश कीर्तीची गाथा सातासमुद्रापार असलेल्या बांधवांना नक्कीच आवडेल व प्रेरणादायी ठरेल असा विश्वास वाटतो.
सौ. रश्मीताईंच्या सकस लेखणीतून अशीच दर्जेदार साहित्य रचना वाचकांना वाचायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून, त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो.
— परीक्षण : राजाराम जाधव. सहसचिव (सेनि) महाराष्ट्र शासन
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
समाजातील दीपस्तंभ अशा व्यक्तींचे सुंदर संकलन.
परीक्षण वाचताना आपले लेखन असलेले पुस्तक मनात आले . समाजकर्तव्य म्हणून आपले ही काही कर्तव्य असते , याची आठवण होते . समाज उद्बोधन म्हणून कोणत्याही प्रकारचे कार्य हे तितकेच मोलाचे असते. रश्मी हेडे ह्या शिक्षिका आहेत . त्यांचे हे कार्यही स्तुत्य आहे .
त्यांच्या कार्याला सदिच्छा ….